अब्दुल

डॉ. प्रकाश नारायणराव जाधव
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

तुमचं आमचं जीवन स्वच्छ ठेवणारी ही अब्दुलसारखी माणसं मैला खांद्यावर - डोक्‍यावर घेऊन चालली, की नाकाला पदर लावणारे आम्ही, त्यांच्या नरकयातना कधी समजून घेऊ शकलोच नाही.

तुमचं आमचं जीवन स्वच्छ ठेवणारी ही अब्दुलसारखी माणसं मैला खांद्यावर - डोक्‍यावर घेऊन चालली, की नाकाला पदर लावणारे आम्ही, त्यांच्या नरकयातना कधी समजून घेऊ शकलोच नाही.

अब्दुलचा चेहरा समोर आला, की मला एका देवमाणसाचा चेहरा समोर आल्यासारखा वाटतो. गेल्या अनेक वर्षांपासून अब्दुलचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही. वय झालेला. शरीराने अगदी किरकोळ, कृश बांध्याचा. उंची फार नाही. थोडा वाकलेला. गोरा गोमटा. चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा. विस्कटलेले काळे-पांढरे केस. फाटकी चप्पल असलेले अनवाणी पाय. दिवसभर फक्त चालत राहायचं. एवढंच त्याचं काम. विश्रांती कधी नाहीच. पायजमा आणि अंगात असलेला सुखी माणसाचा फाटलेला सदरा हा अब्दुलचा पेहराव. धीर-गंभीर. चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळलं होतं कोणास ठाऊक; परंतु कसलीही अपेक्षा मनात नसलेला, एकदम निरागस व भोळा अब्दुल काळाच्या पडद्याआड कधी गेला कळालंसुद्धा नाही. बरेच दिवस साफ-सफाई साठी न आल्याने समजलं, की अब्दुल आता या जगात नाही. खूप वाईट वाटलं. मन खिन्न झालं. त्याचं अनाहूतपणे जाणं मनाला यातना करून गेलं. आजारी होता का तो? माहीत नाही. किती वेदना सहन केल्या असतील त्या माणसाने आयुष्यभर? कोण होता अब्दुल? का प्रश्‍न पडतात त्याच्याविषयी माझ्या मनात? अब्दुलचं पूर्ण नाव? माहीत नाही. फक्त अब्दुल! एवढंच नाव माहीत आहे मला.

अब्दुल उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावचा रहिवाशी. अख्ख्या गावासाठी साफ-सफाईचं व्रत घेतलेला. माणूस नाही देवता. खांद्यावर किंवा डोक्‍यावर मैल्याची बादली आणि हातात झाडू घेऊन गल्लोगल्ली संडासची साफ-सफाई करणारा. काही वर्षांपूर्वी आजच्यासारखे सेफ्टी संडास नव्हते. त्याकाळी खांद्यावर- डोक्‍यावर मैला वाहणारी माणसं होती. गावातील गल्ली-बोळांमध्ये मैला गोळा करून तो गावाच्या बाहेर दूर घेऊन जाणं किती महत्‌ कार्य होतं? आज विश्‍वास बसत नाही, की एकेकाळी भंगी- मेहतर ही जमात आपल्या घरच्या बायका माणसांसह हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करून आपला उदरनिर्वाह करीत असत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी हा महायज्ञ संपन्न करीत होती; परंतु त्याबद्दल कोणालाही काहीही वाटत नव्हतं. त्यांचंच हे काम आहे असं समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करीत असत. तुमचं आमचं जीवन स्वच्छ ठेवणारी ही अब्दुलसारखी माणसं मैला खांद्यावर - डोक्‍यावर घेऊन चालली, की नाकाला पदर लावणारे आम्ही त्यांच्या नरकयातना कधी समजून घेऊ शकलोच नाही. अनुभव घेतल्याशिवाय नरकयातना काय असतात हे माणसाला कळणार कसं?
स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षं मैला डोक्‍यावर वाहून नेण्याची प्रथा आपल्या भारतात होती. भारत सरकारने या प्रथेचं आता समूळ उच्चाटन केलं आहे, त्यामुळे आजच्या पिढीला याची कदाचित कल्पना नसेल; पण माझ्यासारख्या प्रत्यक्षदर्शी माणसाला आजही ही गोष्ट खटकल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच मला आजही अब्दुल आठवतोय, त्याच्या नरकयातना आठवतात, त्याची वेदना व दैन्यावस्था आठवते. हे सारं आठवलं, की मन हेलावून जातं आणि नकळत डोळे पाणावतात. पृथ्वीतलावरील स्वर्गनिर्मितीच्या या महान कार्याबद्दल अब्दुलला माझा सलाम!

साबरमतीचे संत महात्मा गांधी या महान देशभक्ताने डोक्‍यावर मैला वाहून नेणाऱ्या समाजाच्या वेदना जाणल्या आणि त्यांनी हातात बादली व झाडू घेतला. डोक्‍यावर मैला वाहून नेण्याची प्रथा बंद पाडण्यासाठी त्यांनी देशभर फार मोठी चळवळ राबविली, त्यात त्यांना यशही आलं. संत गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन गावंच्या गावं स्वच्छ केली. लोकजागृतीच्या माध्यमातून लोकांची मनं निर्मळ केली. किती मोठा हा उपक्रम? सुरवातीला त्यांचं महत्त्व लोकांना पटलं नाही; परंतु हळूहळू करोडो लोक त्यांचे अनुयायी झाले आणि त्यांनी स्वच्छतेचा- ग्रामसफाईचा विडा उचलला. महाराष्ट्राचे माजी ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांनी "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान', तसेच "हागणदारीमुक्त गाव' ही संकल्पना महाराष्ट्रभर राबविली आणि ती यशस्वीही केली. आज भारत सरकारसुद्धा "स्वच्छ भारत' अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद येथील "तेरणा कॉलेज'चा प्राचार्य म्हणून काम करीत असताना दरवर्षी "राष्ट्रीय सेवा योजने'च्या माध्यमातून आम्ही "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान', "हागणदारीमुक्त गाव' आणि "वृक्ष लागवड' हे महत्त्वाचे अभियान राबवित असू. ज्या गावात आमचं शिबिर असायचं, त्या गावामध्ये आमचे विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक आणि कार्यक्रमाधिकारी तेथील गावकऱ्यांच्या साहाय्याने शोषखड्डे घेत. त्यामुळे गावकरी मोठ्या उत्साहाने श्रमदानात भाग घेऊन गाव स्वच्छ करीत, आपल्या घरी संडास बांधत आणि झाडं लावून त्यांचं संगोपन करीत असत. हा उपक्रम म्हणजे आमचा खारीचा वाटा असे; पण त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान मात्र आकाशाएवढं असायचं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr prakash jadhav's muktapeeth article