माझी अटलजींशी थेट-भेट आणि सहवास...

डॉ. प्रशांत मंजिरे prashantmanjire8189@gmail.com
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नमस्कार...
आपल्या सर्वांचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व असलेले तसेच सुप्रसिध्द जेष्ठ कविवर्य  आणि भारताचे मा. पंतप्रधान सन्माननिय जेष्ठ नेते श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांची एक खूपच छान अशी आठवण, जी आजतागायत मला सदैव तत्पर आणि प्रसन्न ठेवते व माझ्या मनात, त्यांच्या बद्दलचा आदर नेहमीच वाढत ठेवते...

नमस्कार...
आपल्या सर्वांचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व असलेले तसेच सुप्रसिध्द जेष्ठ कविवर्य  आणि भारताचे मा. पंतप्रधान सन्माननिय जेष्ठ नेते श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांची एक खूपच छान अशी आठवण, जी आजतागायत मला सदैव तत्पर आणि प्रसन्न ठेवते व माझ्या मनात, त्यांच्या बद्दलचा आदर नेहमीच वाढत ठेवते...

सन 1980 साली कला नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई, येथे भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रीय स्थापना अधिवेशन पार पडले. त्यावेळी, सम्पूर्ण भारतातील भाजपाचे सर्व लहान-थोर, जेष्ठ-कनिष्ठ कार्यकर्ते आणि सन्माननीय नेतेमंडळी या पहिल्या-वहिल्या अधिवेशनास प्रचंड प्रमाणात गर्दीने आणि उत्साहात अगदी आवर्जून उपस्थित होते. या अधिवेशनासाठी व उपस्थितांच्या स्वागतासाठी उभारलेला आणि सर्व सुख-सोयींनी सुसज्जपणे उभारलेला तो भव्य दिव्य पेंडॉल उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी अगदी भरगच्च भरून गेला होता.

या सर्वांच्या चोख सुव्यवस्थेसाठी, मुंबईतील काही ठराविक ठिकाणच्या काही निवडक आणि अतिशय विश्वासू अशा तरुण व जेष्ठ अशा खंद्या पक्ष कार्यकर्त्यांची निवड त्यावेळचे भाजपाचे तरुण व भारदस्त व्यक्तिमत्वाचे अखिल भारतीय नेते मा. श्री. प्रमोदजी महाजन साहेब यांनी स्वतः लक्षपूर्वक पद्धतीने केली होती.

अतिविशेष व अति महत्वाच्या अतिथींबरोबर त्यांच्या सर्व सोयींसाठीच्या मदतीला कोणी कुठे किती आणि कसे राहायचे व कसे वागायचे हे सर्व काही मा. प्रमोदजी यांनी ठरविले होते. त्यात, सुदैवाने माझे नाव त्या कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यावेळी माझे वय अवघे 18 वर्षांचे होते. आणि तरीही, मला VVIP नेते मंडळींच्या सुव्यवस्था कमिटी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले इतका माझ्यावर मा. प्रमोदजींनी आणि इतर बरोबरच्या सर्व कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला होता आणि तो आजतागायत मी टिकवून ठेवला आहे, असो.

तर, थोडक्यात माझी नेमणूक सन्माननीय आणि आदरणीय तसेंच त्यावेळचे भाजपाध्यक्ष "श्री अटलजी" यांच्या व्यवस्थापनेसाठी असलेल्या कमिटीमध्ये झाली, "हाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालेला माझा खूप मोठा सन्मान आहे' असे निदान मी तरी समजतो.

विशेष म्हणजे आमच्या या विशेष कमिटीतील इतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये वयाने सर्वात लहानही मीच होतो. त्यावेळी माझे बरोबर जे इतर अनेक कार्यकर्ते या कमिटीत काम करत होते, त्यांपैकी कितीतरी कार्यकर्ते आज याच भाजपाचे सन्माननीय मंत्री महोदय म्हणून आजही कार्यरत आहेत याचे मला विशेष कौतुक आणि आनंद देखील नक्कीच आहे. उदा. मा. मंत्री महोदय श्री. विनोदजी तावडे साहेब, मा. मंत्री श्री. प्रकाशजी महेता साहेब, तसेच, मा श्री. किरीटजी सोमय्या साहेब आणि इतर अनेक आजी माजी आमदार त्यात मा. कै. श्री. प्रमोदजी शिरवळकर साहेब यांचाही समावेश होता. आजही आम्ही सर्वजण एकमेकांचे अगदी पूर्वीसारखेच मित्र म्हणून टिकून आहोत हे इथे मुद्दाम आवर्जून नमूद करावेसे वाटते. तर, मा. अटलजी यांची आणि माझी प्रत्यक्ष थेट-भेट आणि सहवास हा सुयोग माझ्या आयुष्यात 1980 साली आला. सर्वांत लहान मीचं त्यामुळे अटलजी मला नेहमी प्यारे असे कौतुकाने पुकारायचे आणि त्यांचे काही काम असेल ते मला सांगायचे. आणि मग मी देखील ते तितक्याच उत्साहाने पार पाडायचे असे एकूणच खूप छान चालायचे. त्यांना आवर्जून भेटायला येणाऱ्या प्रत्येक उत्सुक कार्यकर्त्यांची यादी बनविणे, त्यावर मग मा. अटलजी परवानगीची सही करायचे, आणि मग मी त्या कार्यकर्त्यांना एकेक करून अटलजींच्या भेटीसाठी पाठवायचे, अटलजीं प्रमाणेच इतरही सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळींचीही व्यवस्था आम्ही सर्व उपस्थित कार्यकर्ते अगदी नेटाने आणि विशेष काळजी पूर्वक पार पाडायचो. आमच्या सर्व कार्यकर्त्याचे सर्व उपस्थित नेते मंडळींनीही अगदी आवर्जून कौतुकही खूप केले होते.    

अटलजी जेवताना न विसरता मला प्यारे...असे कौतुकाने हाका मारायचे आणि मलाही मुद्दाम त्यांच्या शेजारच्या खुर्चीवरचं तितक्याच कौतुकाने, आपुलकीने जेवायला बसवायचे.  सर्व उपस्थित नेते मंडळी आणि सोबतचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यानाही याची खूप मोठी मजा वाटायची आणि विशेष कौतुकही वाटायचे. अटलजींना गोड पक्वान्न खूप आवडायचे, त्यातही ते गुलाबजाम खूपचं आवडीने खायचे. त्या अधिवेशनाचे एके दिवशी तर, अटलजी यांनी मुद्दाम मला गंमतीने विचारले...         "प्यारे...क्या आपको भी गुलाब जामुन पसंद है? त्यावर, मी देखील न लाजता त्यांना,  जी हां...असे अगदी सहज उत्तर दिले. अच्छा...? तो फिर प्यारे आप अपने बाऊलमें दो-चार गुलाब जामुन ज्यादाही ले लेना क्यो कि, हमे भी गुलाब जामुन बहोतही पसंद है, हमारे बाऊलमेसे गुलाब जामुन खाकर खतम होने के तुरंत पश्चात, हम आपकें बाऊलमेसे वही अतिरिक्त गुलाब जामुन खा सकते हैं..." आता प्रत्यक्ष अटलजींनीचं मला असे म्हणावे, हे देखील मला खुपचं छान आणि आपलेपणाचे वाटले म्हणून, मी ही अगदी त्यांनी मला सांगितले तसेच केले. उपस्थित शेजारी पंगतीत बसलेली सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळी तसेच कार्यकर्ते मंडळीही अटलजींच्या या सर्व गोष्टींचा गमतीने आनंद घेत होती. (यामध्ये, सन्माननीय मा. उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणीजी साहेब, मा. मुरली मनोहर जोशीजी, सुंदरसिंह भंडारी, सिकंदरजी बख्त साहेब, मा. विजया राजे सिंधियाजी, मा. प्रमोदजी महाजन साहेब, सन्माननीय मा. केंद्रीय मंत्री व आत्ताचे राज्यपाल साहेब मा. श्री. राम भाऊ नाईकजी साहेब, तारा सिंहजी, हशूजी अडवाणी साहेब, इत्यादी सर्व मान्यवरांचा समावेश आहे) आणि, विशेष गंमतीचा भाग म्हणजे, खरोखरीच मा. अटलजींनी त्यांचे भोजन आटोपल्यावर चमच्याने माझ्या बाऊल मधील ते अतिरिक्त खास त्यांच्या साठीचं म्हणून आणि, त्यांच्या बरहुकूमच घेऊन ठेवलेल्या त्या गुलाबजाम पैकी दोन गुलाबजाम अगदी अगत्याने सर्वांसमोर उभे राहून जणू मलाच बहुमान देत अगदी कौतुकाने खाल्ले देखील आणि त्यावेळीं मी देखील क्षणाचाही विलंब न लावता त्वरित अगदी, विनम्रतेने वाकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वादही घेतले. उपस्थित सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते हा एक माझा कौतुक सोहळा म्हणूनच पहातही होते आणि, आनंदाने टाळ्या वाजवून माझी जणू कौतुकाने पाठ थोपटीत होते...

"ऑटोग्राफ बुक" मध्ये अटलजींची स्वाक्षरी घेण्यासाठीही उपस्थित त्यांच्या चाहत्यांची खूपच मोठी गर्दी जमायची. तेंव्हा, ते कामही बघण्याची जबाबदारीही मीचं सर्वांत लहान म्हणून, माझेवरच असायची. अगदीं खरं सांगायचं तर मला स्वतःला देखील ऑटोग्राफ बद्दल विशेष अशी काहीच माहिती नव्हती, (कारण, माझे बालपण हे जरी कॉन्व्हेंट शाळेतून दहावी उत्तीर्ण झाले होते तरीहि, त्याचबरोब मी माझ्या बालपणीच्या आयुष्यातील चौदा वर्षे ही कांची-कामंकोटीच्या प.पु.शंकराचाऱ्यांच्या वेदपाठशाळा अध्ययनातही व्यतीत केली होती, त्यामुळे तिथे असे ऑटोग्राफ देणे-घेणे कधीच दृष्टीस पडले नाही म्हणून असेल कदाचित, असो...)

मा. अटलजींनीच मला ऑटोग्राफचे महत्व आणि त्याची आवड असणे म्हणजेही नेमके काय या गोष्टी समजून सांगितल्या. त्यानंतर मग लगेचच, मी देखील त्यांची स्वाक्षरी ऑटोग्राफ म्हणून एका कोऱ्या कागदावर घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी, माझ्या हातातील तो कोरा कागद बघून ते पुन्हा माझ्याकडे बघत हसून मला म्हणाले, "प्यारे...क्या आपके पास कोई 'ऑटोग्राफ बुक' नहीं हैं?" त्यावर लगेचच माझेही उत्तर "नहीं हैं..." तेंव्हा पुन्हा अटलजींनी मला समजावून सांगितले की, कभी भी कोई भी व्यक्ती, किसिको भी कोरे कागज पर अपना ऑटोग्राफ नहीं दे सकता, आप अभी बहोत छोटे हो, जब आप बडे हो जाओगे तब आपको हमारी यह बात अपने-आप समझ आ जाएगी... फिलहाल, हम खुद आपको हमारी अपनी एक कविता संग्रह पर ही हमारी स्वाक्षरी ऑटोग्राफ के रूप में करके, आपको हमारी कविता संग्रह का पुस्तकही आपको भेट स्वरूप में प्रदान करते है, उसें स्वीकार करो...आणि मग मीही अतिशय आनंदाने त्यांचे ते कविता संग्रहाचे पुस्तक त्यांच्याच हातून आणि प्रत्यक्ष त्यांच्या स्वाक्षरीनेचं आशीर्वाद रुपानेचं घेतले. त्यानंतरच्या पुढल्याचं वर्षी म्हणजे सन 1981च्या 25 डिसेंबरला पुन्हा आमच्या त्याच कार्यकर्त्याच्या टीमला त्यानी वाढदिवसाच्या निमित्ताने खास भोजनासाठी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष आमंत्रित केले होते.  आम्हीही सर्व जणांनी त्यावेळी अगदी आनंदाने आणि विशेष कौतुकाने त्यावेळी तिथे आवर्जून हजेरी लावली होती. नवीनच नौकरी मुळे मला इतरांपेक्षा एक दिवस उशिरा निघावे लागल होते. त्यावेळी, सर्वांना त्यांनी अगदी आठवणीने विचारले "प्यारे अभी पहुंचा नहीं है क्या?" त्यांनी असे विचारायला आणि लगेचच तासाभराने मी पोहोचायला अशी वेळ झाली होती. त्या दिवशी देखील, अटलजींनी मला त्याचं मोठ्या कौतुकाने आणि अगदी अगत्याने पुन्हा एकदा त्यांचे शेजारीच मला जेवण्यासाठी मोठ्या मानाने बसविले आणि जणू, त्या महान सत्पुरुषाच्या हातून माझा पुन्हा एकदा मोठा सत्कारचं झाला. तर, अशा या थोर महान व्यक्तिमत्वाला सलाम...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr prashant manjire write atal bihari vajpayee article in muktapeeth