देव परीक्षा पाहतो...

देव परीक्षा पाहतो...

देव पाहायासी गेलो, तर देवच परीक्षा घेऊ पाहात होता. वाटेतील कठीण चढाचा मार्ग, खडकाळ वाट, ऑक्‍सिजनची कमतरता जाणवणारी, मध्येच चिखल, डोळे गरगरवणारी दरी सगळीच परीक्षा होती. परतीच्या रस्त्यावरही देवाने परीक्षा पाहिली.

कारगिल युद्ध नुकतेच होऊन गेले होते आणि आम्ही अमरनाथला निघालो होतो. जम्मूहून पुढे निघताना रणवीरेश्वराचे दर्शन घेतले. तिथे एक वयस्कर गृहस्थ राग जोगकंस गात होते. थोडा वेळ थांबून गायन ऐकले. दुसऱ्या दिवशी अमरनाथच्या यात्रेला सुरवात म्हणून पहाटे तीन वाजता निघालो. दोन ते तीन वेळा सामानाची तपासणी झाली आणि पहाटे पाचला गाडी सुटली. इथून पहलमागमार्गे चंदनवाडीपर्यंतचा प्रवास म्हणजे डोंगर-दऱ्या, पहाड, खळाळत्या नद्या, सूचिपर्णी वृक्ष, वळणाचे रस्ते, बनिहालचा अडीच किलोमीटरचा बोगदा, अनंतनागचे केशरमळे, पहलगाम येताच मार्गावरील बर्फाचे पहाड, सर्वत्र टेहळणी करणारे सैनिक असे चित्र. चंदनवाडीपासून चौदा किलोमीटरवर शेषनागपर्यंतचा पहिला टप्पा अतिशय कठीण होता. जरा बरा रस्ता संपून पूर्णपणे खडबडीत, उंच-सखल, अरुंद, वळणावळणाचा किंवा सपाटी नसलेला सुरवातीचा पहिला टप्पा. त्यातही सतत दगड-धोंडे, चिखलपाणी हे सगळे तुडवताना धड चालण्याचाही आनंद घेता येत नव्हता. चढ चढून जाऊ लागलो तशी हिरवाई कमी झाली, डोंगर रूक्ष दिसू लागले. याच दरम्यान दमवणारी पिसू घाटी लागली. मधेच भाऊ सांगत होता, ""ते वरती ठिकाण दिसतेय ना, तिथपर्यंत जायचेय. या सावकाश.'' धीराचे शब्द देऊन तो थोडा पुढे जाऊन थांबायचा. डोळ्यांना जवळ वाटणारे ते ठिकाण प्रत्यक्षात चढताना पायांची कसोटी पाहात असे. तिथपर्यंत पोचताना ऑक्‍सिजनची विरळता जाणवू लागे. चार पावले सावकाश जायचे व थांबायचे. मनाची तयारी झाली की पुढे जायचे. नाही तर दम लागायचा. पण, काही वेळात त्या वातावरणाशी जमू शकते, हाही अंदाज आला. पण तेवढ्यात बहिणीच्या छातीत दुखू लागले, तिचा जीव मेटाकुटीला आला. शेवटी तिला मुक्कामाच्या अलीकडे तीन किलोमीटरवर घोडा करून दिला. अर्थातच थोडे स्वस्थ वाटल्यावर ती व भाऊ घोड्यावरून गेले तेव्हा कुठे आम्हालाही बरे वाटले. अशावेळी काळजी वाटतेच, शिवाय आपलाही धीर सुटतो. रात्रीच्या मुक्कामी तंबूत शिरताच बहिणीला हुडहुडी भरली, दात वाजू लागले. मग भावाने बत्ती पेटवली, अंगावर ब्लॅंकेट टाकले. जरा ऊब आली तिला.

शेषनागला पोचण्यापूर्वी तिथे वाटेतील शेषनाग तळे पाहून श्रम सार्थकी लागले. तिथले सृष्टिसौंदर्य छानच. याचवेळी आमच्या दोघींच्या मनात एकच भावना आली, की आता योग्य वेळेत आपण या यात्रेला आलोय. कारण, त्रासाशिवाय ही यात्रा नाहीच. गाडीत असलो काय किंवा चालत राहिलो काय किंवा घोडेस्वारी, इतक्‍या उंचावरून अरुंद वाटेने खाली पाहतानाही छातीत गोळा यायचा. घोडा केला तेव्हा बहिणीच्या मांड्या दुखू लागल्या. हाच अनुभव आम्हालाही दुसऱ्या दिवशी पंचतरणीच्या टप्प्याच्या वेळी आला. त्यात घोड्यावर बसल्यावर भीती वाटते, कारण ते घोडे दरीच्या कडेने कसेही चालतात. घोडेमालक कसे निवांत; पण आपण कमालीचे घाबरलेले असतो.
शेषनागच्या मुक्कामी गाढ झोपेत मधेच जोरदार पावसाने जाग आली. प्रचंड थंडी व सर्वत्र पाणी यामुळे भीती वाटत होती. सकाळी उठलो, तेव्हा पुढे जायचा रस्ता पावसामुळे बंद केल्याचे कळले. आता अशा अवघड हवामानात थांबायचे हा विचारही नको वाटला. थोड्याच वेळाने पुढे जायला मिळणार अशीही बातमी थडकली. शेषनाग ते पंचतरणी हा टप्पा मात्र कुणालाही चालावासा वाटला नाही. कारण आदल्या दिवशी खडकाळ व डोंगराळ वाटेवरील चालण्यामुळे दमणूक झाली होती. घोड्यावरून गेलो; पण रात्री तंबूत पोचलो तेव्हा सर्वांच्या मांड्या छान दुखत होत्या. चालणे बरे की घोडेस्वारी हेच कळत नव्हते. तिसऱ्या दिवशीचा सहा किलोमीटरचा टप्पा सर्वांनाच चालावासा वाटला. आता हिमालयातील वातावरण आमच्या शरीराला सहन होत असावे. आता अमरनाथचे दर्शन होणार याचाही उत्साह होता. मजल- दरमजल करत गुहेत पोचलो. छान दर्शन घेतले.

बालतलकडे जाणारा रस्ता प्रचंड उतरणीचा, वाटेत पुढे आलेले पहाड, तर मधेच एका वळणावर वाकून जायचे, अशा विचित्र अवस्थेचा क्षण अनुभवला. आम्ही तंबूत पोचेस्तोवर काळोख झाला होता. पायी निघालेले साथीदार वाटेतील चिखलामुळे अगदी सावधपणे, सावकाश उतरत होते. ते खूपच उशिरा पोचले.

सकाळची उबदार उन्हे, उंच पहाड, वरच्या बाजूला कारगिलला जाणारा रस्ता, सैन्यदलाच्या गाड्या असे बालतलचे दृश्‍य होते. सोनमर्गकडून काश्‍मीरला पोचलो तो '15 ऑगस्ट' होता. सगळीकडे बंद. त्यामुळे थोडी भीती होती. पण, अगदीच असुरक्षित वाटले नाही. लाल चौकातूनही हिंडलो. शिकाऱ्यातून राहणे, हाउसबोटीतून प्रवास करणे, दललोक पाहणे, शिवाय सुंदर सजवलेल्या खोलीत राहणे यामुळे काश्‍मीरचा मुक्काम सुखाचा वाटला. वैष्णोदेवी यात्राही सुखावह झाली. परतीचा प्रवास सुरू झाला; पण परीक्षा संपली नव्हती. वाटेत मालगाडी घसरल्याने अचानक मार्ग बदलून नागपूरमार्गे पुण्यात पोचलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com