उन्हाची होळी

डॉ. रविकिरण माळी
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

दीर्घकाळ टिकणाऱ्या उन्हाळ्याचा सांगावा घेऊन पळसफुले येतात. माळावरचा पळस मानवी जीवनात अटळ असणाऱ्या धगधगत्या दुःखाचा उत्सव करण्याची शिकवण देतो आहे असे मला मनोमन वाटते. ही उन्हाची होळी आता बहरू लागेल.

दीर्घकाळ टिकणाऱ्या उन्हाळ्याचा सांगावा घेऊन पळसफुले येतात. माळावरचा पळस मानवी जीवनात अटळ असणाऱ्या धगधगत्या दुःखाचा उत्सव करण्याची शिकवण देतो आहे असे मला मनोमन वाटते. ही उन्हाची होळी आता बहरू लागेल.

बालाघाटच्या डोंगररांगेत माझे गाव वसलेले आहे. उन्हाळा दीर्घकाळ टिकण्याचा हा प्रदेश. तब्बल पाच महिन्यांनी पावसाळा येणार असतो. तोवर पावसाची वाट पाहायची. जानेवारीतच ज्वारीची काढणीची लगबग सुरू होते. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ती जवळपास संपलेली असते. पिवळी ज्वारी निघाल्यानंतर शेतातले चैतन्यही निघून जाते. नांगरून उन्ह खात पडलेली शेते उदास वाटतात. तशीच एक गहिरी उदासीनता मनातही पसरायला सुरवात होते. सटीनंतर हळूहळू दिवस मोठा आणि रात्र लहान होण्याला सुरवात होते, पण हे जाणवत नाही. मकर संक्रांतीनंतर मात्र हा बदल स्पष्टपणे जाणवायला लागतो. संक्रातीनंतर दिवसाला ताण बसतो आणि दुपार लांबायला लागते तसा तो ताण आत्म्यालाही बसतो. मोठा झालेला दिवस आणि हाताला काम नाही अशा अवस्थेत दिवस सरता सरत नाही. आता दुपार सुस्त होऊन सरपटत चालायला लागते. दीर्घ दुपारीमुळे दिवसाचे दोन तुकडे होतात. गेल्या दोन दशकभरात भारनियमन आणि पाणीटंचाई हे शब्द जगण्याची अपरिहार्यता बनलेले आहेत. उन्हाळ्यात हे शब्द उरात धडकी भरवतात. कधी एकदा उन्हाळा संपून पाऊस सुरू होतो याचीच ओढ लागते. "दीर्घ आजारासारखे सारे आयुष्य चालले। कोणी भेटाया ना आले । नाही निरोपाची फुले' अगदी असेच होत नाही. तहसीलदार, जिल्हाधिकारी, कधी मंत्री दुष्काळाची पाहणी करायला येतात. फक्त फुले आणत नाहीत. फुले आणतात ते दोनच वृक्ष पळस आणि गुलमोहर. दीर्घकाळ चालणारा उन्हाळा सुसह्य करणारे हे दोन मित्र.

पळसाची आणि माझी भेट पहिल्यांदा झाली ती चौथी शिष्यवृत्तीला असलेल्या 'पळसाला पाने तीनच' या म्हणीतून! पुढे या म्हणीबद्दल आणि अचूकपणे तीनच पाने असणाऱ्या या झाडाबद्दल कुतूहल वाढत गेले. पण माझी आणि पळसाची पहिली भेट झाली ती दहावीच्या उन्हाळा सुटीत. बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेल्या माझ्या गावाला डोंगराचा आणि छोट्या छोट्या टेकड्यांचा अगदी वेढा पडलेला आहे. या छोट्या डोंगरावर पळसाची खूपच झाडे आहेत. फुलांनी लगडलेला निष्पर्ण वृक्ष हे या वृक्षाचे पहिले दर्शन मनावर कायमचे कोरले गेले. केशरी रंगाच्या फुलांनी मनाचा ठाव घेतला. पक्ष्याच्या चोचीसारखी असणारी त्याची देखणी रचना आकर्षक वाटली. फुलांचा कडेला फिक्कट असणारा रंग मध्येच गडद होतो तेव्हा निसर्गाइतका मोठा चित्रकार कोणी नाही हेच कळते. उन्हाळ्याचा उत्सव साजरा करणारा हा वृक्ष आहे.
आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी एकाच मार्गावर पंधरा वर्षांहून अधिक काळ मी प्रवास करत आहे. या सर्व काळात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पळसाच्या झाडांनी खूपच आनंद दिला आहे. यातले एक झाड ओढ्याच्या काठी आहे. ओढ्याच्या कोरड्या पात्रात फुलांचा पडलेला सडा हे दृश्‍य मनात घर करून राहते. आता अनेक वेलींमुळे झाकले गेल्यामुळे हे झाड पूर्वीइतके देखणे वाटत नाही. पण त्यामुळे या झाडाकडे नजर वळत नाही असे मात्र होत नाही.

रस्त्याच्या कडेला विरुद्ध बाजूला असलेल्या दोन पळस वृक्षांचा संवादही असाच लक्षात राहतो. त्यातला एक एकटाच दिमाखात बहरतो आहे, तर दुसरा झाडांच्या बेचक्‍यात उभा आहे. त्याची एकच बाजू बहराचा आनंद देते. हिरव्यागार पानांनी लगडलेला वृक्ष जानेवारीच्या शेवटी हळूहळू पिकू लागतो. एका फांदीपासून झालेली सुरवात वृक्षभर पसरते आणि पानगळीबरोबरच झाडांची वेडीवाकडी टोके माश्‍या चिकटल्यासारखी काळ्या कळ्यांनी लगडलेली दिसू लागतात. आठवडा दीड आठवड्यात या काळ्या कळ्यांतून नारंगी कळ्या उमलायला सुरवात होते आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा उत्सव सुरू होतो. दाट पर्णसंभार असल्यामुळे सुगीच्या दिवसात या वृक्षावर हमखास मधाचे पोळे आढळून येते. वर्षभर मधाच्या पोळ्यांना आश्रय देणारे झाड आता मधमाशांना मधच पुरविते आणि अनेक प्रकारच्या कीटकानांही रसवंतीने तृप्त करते. भक्ष्य आणि भक्षक कीटक पक्ष्यांनी गजबजून जाते. खरेच संन्याशाच्या वस्त्रासारखी फुले धारण करणारा हा वृक्ष सर्वसंग परित्याग करतो. आधी पानांची, मग फुलांची उधळण करावी ती पळसानेच. रंगपंचमी खेळावी ती पळसानेच. मानवाला होळी या सणाची कल्पना पळसापासून तर सुचली नसेल! उन्हाची होळी पेटवावी ती पळसानेच.
पानाफुलांचा उत्सव संपल्यानंतर पळसावर बियांचाही उत्सव सुरू होतो. एकच बीज असणाऱ्या शेंगांनी, "पळसपापडी'ने तो लगडून जातो. आता अगदी थोड्याच काळात या शेंगांच्या पाठीमागून पानांची हिरवी लव दिसायला लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr ravikiran mali's article in muktapeeth