esakal | प्रशंसेतून प्रोत्साहन..!
sakal

बोलून बातमी शोधा

young boy

क्षितिजे अपार : प्रशंसेतून प्रोत्साहन..!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

-डॉ. समीर दलवाई

samyrdalwai@gmail.com

सकाळी ब्रश, आंघोळ आणि जेवण या रोजच्या गोष्टी पार पाडणे त्याच्यासाठी जिकिरीचे. पालक त्याच्या भविष्याबद्दल चिंतीत... दुसरीकडे नातवाने चित्रपटात झळकावे, हे आजोबांचे स्वप्न होते...सकाळी माझ्या क्लिनिकमध्ये अकोल्यावरून एक कुटुंब आलं. आई-वडील चाळिशीतले होते. मुलगा १५ वर्षांचा आणि मुलगी आठ वर्षांची. मुलाला अभ्यासात जराही रस नव्हता. दहावीला होता. परीक्षेबद्दल जराही फिकीर नव्हती. तो आतापर्यंत काठावर पास होत गेला. सहसा, अशा कारणांसाठी मुलांना डॉक्टरकडे आणले जाते. तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावर काळजी, चिंता आणि संतापाचे भाव असतात. ‘मी वेडा आहे का?’ हा नेहमीचा प्रश्न असतो. इथे उलट होतं. मुलगा अतिशय शांत आणि संयमी होता.अभ्यासाव्यतिरिक्त माझ्या मुलामध्ये परिपक्वतेचा अभाव आहे, अशी चिंता त्याच्या आईने व्यक्त केली. तो आपल्या पायावर उभा नाही. मित्राबद्दल त्याचे ठाम मत नाही. मित्र होईपर्यंत तो त्यांच्यावर पैसे खर्च करतो. त्यासाठी तो आपली मतं बाजूला ठेवून मित्रांचे म्हणणे स्वीकारतो. त्याला पैशांची पर्वा नाही, स्वभाव लहरी आहे. (dr-sameer-dalwai-article-on-childrens-development-and-behavior-jpd93)

आता त्याला अभिनेता, गायक व्हायचे आहे. बारावीनंतर अभिनेता होण्यासाठी मुंबईला येण्याचा त्याचा प्लॅन आहे. त्याचे पालक त्याच्या भविष्याबद्दल खूप चिंतीत होते. त्याने किमान पदवीचे शिक्षण पूर्ण करावे ही त्यांची अपेक्षा होती. दुसरीकडे नातवाने चित्रपटात झळकावे, हे आजोबांचे स्वप्न होते. मी पालक आणि मुलासोबत चर्चा केली. त्या मुलात लर्निंग डिसॲबिलीटी नाही, हे लक्षात आले. शिक्षणात आलेल्या अडचणीमुळे त्याला अभ्यासाबद्दल तिटकारा निर्माण झाला. नेमकं त्यावेळी पालकांनी त्याच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं होतं, त्यामुळे पालक आणि पाल्यामध्ये कायम खटके उडायचे. या भांडणामुळे मुलगा अभ्यासापासून अधिक दूर दूर होत गेला. त्याला अभ्यासाबद्दल आता जास्तच तिरस्कार वाटायला लागला होता.

या गदारोळात मुलाच्या दैनंदिन जीवनाकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. तो वेळापत्रक पाळू शकत नाही, आळशी आणि मूर्ख आहे, हा समज सर्वांनी करू घेतला. मुलानेही प्रयत्न करणे थांबवले. मी त्याच्या पालकाला मुलाच्या आयुष्यातील तातडीचे आणि सर्वाधिक महत्त्वाचे काय आहे, हे ठरवायला सांगितले. तो शिक्षणात प्रगती करेल, असं वाटत नाही. मात्र किमान त्याने अधिक परिपक्व व्हावे एवढीच आमची अपेक्षा असल्याचे पालकांनी सांगितले. मी समुपदेशनाचा कार्यक्रम आखला. दिवसाचे वेळापत्रक तयार करायला मदत केली. मुलाला आवडणाऱ्या गोष्टींचा वेळापत्रकात अंतर्भाव केला. ब्रश करणे, शौचालय, आंघोळ करणे, ड्रेसिंग, खाणे असे वेळापत्रक केले. त्यामध्ये मुलाच्या वयानुसार तो करू शकतो असली घरघुती कामे जोडली.

वेळापत्रकाचे पालन केल्यावर मुलाची प्रशंसा करा, त्याला प्रोस्ताहित करा. मुलाच्या कामाचा आढावा घ्या, मात्र केवळ चुका शोधू नका. शेड्यूलमधील काही काम तो करत नसेल तर त्याला दोष देणे, नाव ठेवणे किंवा निष्कर्षाप्रती येण्याची घाई करू नका. अशा सूचना मी पालकांना केल्या. शेवटी पाल्याने दिलेल्या सबबी पालकांना कळतात. मात्र ते मला दोष देत नाहीत, पाठिंबा देतात, हे मुलाच्या लक्षात यायला सुरुवात होते. मग ते प्रयत्नपूर्वक वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा: वाट चुकून आला अन्‌ सहा दिवस थांबला!

संयम राखणे आणि प्रत्येक चुकांवर प्रतिक्रिया न देणे हा सल्ला आपल्या आयुष्यात जादूचे काम करतो. भांडणे थांबतात, प्रेम निर्माण होते. कुटुंब एकत्र येते, एकमेकांना पाठिंबा देतात. पालकांची चिंता कमी होते. आपला मुलगा काही तरी करू शकतो, तो अपयशी होणार नाही, याची त्यांना खात्री पटते. घरातील मोठी जबाबदारी मुलाकडे मोठ्या विश्वासाने सोपवायला ते सुरुवात करतात. दुसरीकडे आजोबांनाही हे पटले. त्यांनी आता नातवाकडून अपेक्षा करणे थांबवले. जे कुटुंब जे कायम दुःखी आणि तणावाखाली होते, ते आता अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. त्यांनी सर्व प्रश्न प्रेमाने आणि समजूतदारपणाने हाताळले. त्यामध्ये केवळ बाल मानसशास्त्राची काही मूलभूत तत्त्वे होती. शेवटी संयम, विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणा जगातील कुठल्याही औषधापेक्षा अधिक शक्तिशाली आहे.

(लेखक बालरोग तज्ज्ञ असून, न्यू होरायजन चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे संस्थापक आहेत. दोन दशकांपासून मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

हेही वाचा: श्रीमंतीचा दिखाऊपणा!

loading image