ट्रॅव्हल लाइट

डॉ. समीता टिल्लू
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

आयुष्याच्या प्रवासातही भार कमी करीत जायला हवे. म्हणजे चित्तशुद्धी अनुभवता येते.

आयुष्याच्या प्रवासातही भार कमी करीत जायला हवे. म्हणजे चित्तशुद्धी अनुभवता येते.

पर्यटनविषयीच्या जाहिराती वाचत होते. बहुतेक सर्व पर्यटनसंस्था अहमहमिकेने सहलींच्या जाहिराती करीत होत्या. हे सर्व वाचताना क्षणमात्र थबकले. सात-आठ दिवसांच्या प्रवासासाठी केवढी ही यातायात? प्रवासाला जाताना आपल्याकडे सामान आटोपशीर असावे आणि तेही अगदी लाइटवेट असे आपल्या सगळ्यांना वाटत असते. पण प्रत्यक्षात आटोपशीर म्हणता म्हणता सामान इतके काही वाढत जाते, की सारे काही अवघड होऊन बसते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या प्रवासाबद्दल हे झाले. पण आपल्या जीवनाच्या प्रवासाचे काय? आयुष्याच्या प्रवासामध्ये कार्गो बॅगेत ठेवल्याप्रमाणे भूतकाळातील अनेक आठवणी "असू दे' म्हणत मनात साठवतच जातो. अनेक कडूगोड प्रसंगांची गाठोडी मनात भरलेली असतातच. तीक्ष्ण, धारदार वस्तू केबिन लगेचमध्ये असता कामा नयेत, असा नियम आहे. पण आपण आपल्या धारदार जिभेने किती लोकांना कारण नसतानाही दुखावतो. अगदी आवश्‍यक तेवढ्याच गोष्टी घ्यायच्या परवानगी असते. पण गरज नसताना अनेक वस्तूंची खरेदी करून सामानाचे वजन वाढवीतच असतो. विचार केला तर आयुष्याच्या अनेक नको असलेल्या आठवणी मनात बाळगून त्यात मद, मोह, लोभ, मत्सर, काम, क्रोध हे षड्रिपू वसतीला आलेले असतात. त्यामुळे मन हलके होण्यापेक्षा जास्त जडच झालेले असते. चेक इनच्या वेळी विमानतळावर सुरक्षा तपासणी करून काही वस्तू बाहेर फेकून देतात. तसे आपण प्रत्यक्ष जीवनात फार क्वचितच करतो. तसे केले तर चित्तशुद्धी होईल.

माझ्या माहितीतल्या एक आजीना एका कानाने कमी ऐकू येऊ लागले. डोळ्यांनी कमी दिसू लागले. सकारात्मकतेने स्वीकारताना त्या याचे वर्णन "ट्रॅव्हल लाइट' असे करतात. म्हणतात, "अखेरच्या प्रवासात ओझी हलकी करायला हवीत आणि म्हणूनच एक डोळा, एक कान यांचा भार दूर केला आहे.' "ट्रॅव्हल लाइट' या शब्दाचा इतका सुंदर आणि समर्पक उपयोग मी तरी यापूर्वी कधी अनुभवला नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr samita tillu write article in muktapeeth