बुद्धिबळाचे घर

डॉ. सतीश फडके
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे.

बुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे.

माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा यांना तरुण वयातच बुद्धिबळाची गोडी लागली. त्या वेळी ते आपली आवड भागवण्यासाठी मामा व इतर भावंडे यांच्याबरोबर डाव मांडून बसायचे. त्यानंतरच्या काळात त्यांना पुण्यातील मुंजाबाच्या बोळातील "जॉली क्‍लब' येथे चांगले बुद्धिबळ पटू भेटले. चांगल्या खेळाडूंच्या एकमेकातील लढतींमधूनच खेळाचा दर्जा उंचावू शकतो याची जाणीव त्यांना तेव्हापासूनच होती. पुढे नारायण पेठेतील कर्ल ऑन एजन्सीचे मालक बाबासाहेब गोखले हे त्यांना बुद्धिबळ खेळण्यासाठी बोलावत. त्यांचे डाव तासनतास रंगत. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशही मिळवले. पुढे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या जिमखाना विभागात नोकरी करताना त्यांनी बुद्धिबळ प्रशिक्षक पदाची जबाबदारीही काही काळ स्वीकारली.
मी व माझी बहीण अंजली व्यावसायिक अभ्यासक्रमात गुंतल्यानंतर त्यांना एकदा बुद्धिबळ प्रशिक्षणाविषयी काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विचारणा झाली आणि एका नव्या अध्यायास सुरवात झाली.

बुद्धिबळ प्रशिक्षण हेच आपले खरे क्षेत्र आहे याची अण्णांना जाणीव झाली. आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याने घरीच क्‍लासची सुरवात झाली. दिवसेंदिवस त्यात भरभराटच होत गेली. माझ्या आईचे, मंदा फडके, बहुमोल सहकार्य अण्णांना नेहमीच मिळत गेले. परदेशात असे प्रशिक्षण अतिशय लहान वयातच सुरू केले जाते हे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे आपल्या क्‍लासमध्ये सात-आठ वर्षे वयापासूनच्या मुलांना व मुलींना हे शिक्षण देण्यास सुरवात करावी, असे त्यांनी ठरविले. त्यानुसार त्यांना प्रतिसादही मिळत गेला. सुरवातीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रकर्षाने लक्षात राहाण्यासारखी नावे म्हणजे मिलिंद बापट, जयंत गोखले, चंद्रशेखर गोखले, अभिजित कुंटे, मृणालिनी कुंटे. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढतच गेली व आजतागायत सुमारे सतराशेच्या वर मुलांना त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक यशाचे कौतुक हे केलेच पाहिजे असे अण्णांचे ठाम मत होते. त्यानुसार प्रत्येक विजयी विद्यार्थ्यास क्‍लासमध्ये बक्षीस दिले जाई. अण्णांनी क्‍लासमध्ये वेळोवेळी नवनवीन प्रयोगही केले. आंतरराष्ट्रीय गुणांक पद्धतीनुसार त्यांनी आपल्या क्‍लासपुरती एक गुणांक पद्धती तयार केली. रविवार सकाळच्या मोठ्या वर्गानंतर "रेटिंग' तयार करण्यात त्यांचा बराच वेळ जात असे. दर आठवड्याच्या रविवारी मानांकित खेळाडूंसाठी एक "रेटिंग टुर्नामेंट' असे व त्यासाठी मोठे बक्षीस दिले जाई. बुद्धिबळ हा बुद्धी लावून डावपेच लढवण्याचा खेळ आहे, तसा तो भावनिकही खेळ आहे. हरणे व जिंकणे हे ओघाओघाने आलेच. मोठमोठ्या मुलांनासुद्धा हार पत्करल्यानंतर रडू फुटे. अशा मुलांना गोळी देऊन आई त्यांचे सांत्वन करीत असे. पुढील खेळात गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन देत असे.

एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुण्याचा जयंत गोखले व दक्षिणेकडील एन. सरिता या दोन विद्यार्थ्यांबरोबर अधिकृत प्रशिक्षक म्हणून अण्णांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. दोन्ही विद्यार्थ्यांनी आपली चुणूक तेथे दाखविली. दोन लहान वयाच्या विद्यार्थ्यांबरोबर परदेशी जाण्याची त्यांना थोडीफार भीती वाटत होती, पण माझ्या पत्नीने, डॉ प्रतिभा यांनी दिलेले प्रोत्साहन व मदत यामुळेच ते परदेशी जाऊ शकले असे ते कौतुकाने सांगतात.

त्याकाळी विश्वनाथन आनंद हा एकमेव भारतीय ग्रॅंड मास्टर होता. पुण्यामध्ये इतके हुशार विद्यार्थी असताना आपल्या पुण्यातून व आपल्या क्‍लासमधून एकतरी ग्रॅंड मास्टर व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. ही इच्छा ते सर्व विद्यार्थ्यांसमोर सतत व्यक्त करीत असत. त्याकाळी फार जणांकडे संगणक नव्हते. म्हणून अण्णांनी नेटाने संगणक घेऊन त्यावर "चेस प्रोग्रॅम सॉफ्टवेअर' उतरवून घेतले व विद्यार्थ्यांना संगणकीय बुद्धिबळ प्रशिक्षणाची सोय करून दिली. अभिजित कुंटे ग्रॅंड मास्टर झाला व अण्णांची इच्छा पूर्ण झाली. त्यानंतरच्या काळात अण्णांचे आणखीही काही विद्यार्थी "इंटरनॅशनल मास्टर', "वुमन मास्टर' व "ग्रॅंड मास्टर' झाले. आता अण्णांचे अनेक विद्यार्थी बुद्धिबळ प्रशिक्षणाचे काम यशस्वीरीत्या करीत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांचे यश पाहताना, ते प्रशिक्षण देतांना पाहताना, बुद्धिबळाची प्रगती होत असलेली पाहताना अण्णांना अतिशय आनंद होतो. अण्णा आता 86 वर्षांचे आहेत. मात्र अजूनही फडके यांच्या घरात बुद्धिबळाचा पट नेहमी मांडलेला असतो आणि ते बुद्धिबळ खेळण्यास किंवा शिकविण्यास कायम तयार असतात. हत्ती, घोडे, उंट यांच्यासह ते घर घर लढवत असतात. नातवंडांना पटावर खेळवत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr satish phadke write article in muktapeeth