शून्यातूनी शिखरी

डॉ. शैला काळकर
सोमवार, 3 जुलै 2017

तुम्ही खेड्यात राहता की शहरात, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत यावर तुमचं यश अवलंबून नसतं. एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छाशक्ती हवी. ती करण्याची क्रियाशक्ती हवी व कशी करावे याची ज्ञानशक्ती हवी, की यश तुमचेच.

तुम्ही खेड्यात राहता की शहरात, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत यावर तुमचं यश अवलंबून नसतं. एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छाशक्ती हवी. ती करण्याची क्रियाशक्ती हवी व कशी करावे याची ज्ञानशक्ती हवी, की यश तुमचेच.

राजगुरुनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मी प्राध्यापिका होते. मी राहात होते, तिथून जवळच एक शिवणक्‍लास चालविणारी कुणीतरी आहे एवढे कळले होते; पण माझ्या नवीन ठिकाणच्या पदवीपर्यंतच्या व एमएच्या तासांच्या वेळापत्रकात तिच्याकडे जाणे जमत नव्हते; पण एकदा वेळ काढून गेले व तिला भेटले तेव्हा भारावून गेले. तीच, वनिता काळे ही खेड (राजगुरुनगर) येथे फॅशन डिझायनर म्हणून गेली अनेक वर्षे शिवणक्‍लास यशस्वीरीत्या घेते आहे.

वनिता वयाच्या सतरा-अठराव्या वर्षापासून शिवणाची आवड असल्याने छोटे-मोठे कपडे शिवत होती. खेडमध्ये ओसवाल भाभींकडे जाऊन शिवण शिकली. भाभींनी तिच्या पायावर पाय ठेवून मशिन चालवायला शिकविले. इथपासून सुरवात झालेली ही मुलगी शिवण तर भराभर शिकलीच व कुटुंबाला हातभार लावू लागली. तिची प्रगती पाहून ओसवाल भाभींनी तिला चासकमान येथे शिवणक्‍लास काढायला सांगितला. आठवड्यातून एक दिवस भाभी तिथे जाऊन शिकवत; पण बाकीचा आठवडाभर वनिता शिकवत, शिकवत कमवत होती.

तिचा विवाह ज्ञानेश्वर काळे या शिक्षकाशी झाला व त्यांच्याबरोबर पाईट, कन्हेरसर जिथे-जिथे त्यांची बदली होईल, तिथे ती गेली व शिवण शिकविणे व शिवण करत राहिली. महत्त्वाचे म्हणजे अनेक स्त्रियांचे मोडू पाहणारे संसार तिने शिवण शिकवून सावरायला मदत केली. त्यांना त्यांच्या पायावर उभे केले. मी तिच्याशी बोलले, तेव्हा मला कळले, की तिच्याकडे येणाऱ्या बहुतेक स्त्रिया अर्धशिक्षित होत्या. त्यांना लिहिता-वाचतासुद्धा जुजबी येत होते. शिवण म्हटले, की वेगवेगळी मापे, एक चतुर्थांश, एक अष्टमांश, इंच, सेंटिमीटर, उंची इतकी असेल, तर मुंढा किती घ्यायचा, याचे प्रमाण, माप शरीर प्रकृतीनुसार बदलते; पण हा आकड्यांचा हिशेब त्यांना जमेना. शिवण तर येते; पण बेतताना आकड्यांमुळे पंचाईत होते. हे बघितल्यावर वनिताने कोष्टके तयार केली व ती वापरून त्या बायका व्यवस्थित कपडे शिवू लागल्या. एक नूर आदमी और दस नूर कपडा, शिवणाला मरणच नाही. हे जाणून असल्याने मी तिला सुचविले, की "तू पुस्तक का काढत नाहीस?' ती म्हणाली, ""मी फक्त दहावी शिकलेली. माझे पुस्तके कोण घेणार?'' मी म्हटले, ""अग, तू प्रयत्न तर कर आणि तू पुस्तकात स्पष्ट लिही की शिवणावरची खूप पुस्तके आहेत; पण मी कोष्टके तयार केल्यामुळे शिवणातले कसब सहज आत्मसात करता येईल, म्हणून मी पुस्तक तयार केले आहे.'' तिच्यामागे लागून हे पुस्तक तिला लिहायला लावले. हे पुस्तक 2009 मध्ये प्रकाशित झाले व आज 2017 मध्ये तिच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली, ही कौतुकाची गोष्ट आहे.

अनेक वर्षांपासून तिच्या क्‍लासमध्ये गर्दी होतीच. आता नंबर लावून, नंबर लागेपर्यंत वाट बघावी लागते. ती दोन बॅचेस घेते. एका बॅचमध्ये वीस-पंचवीस मुली असतात. मे महिना व दिवाळीच्या सुटीत विशेष गर्दी असते. ती घरातले काम स्वतःच करत असे. मी तिला अनेकदा सांगितले, की कौशल्याचे काम करतेस ना? हे कष्टाचे काम करू नकोस; पण ती ऐकत नसे. एकदा कसे-बसे ऐकले व एक मुलगी मदतीला ठेवली. ती आपले काम करताना कुतूहलाने या काय करतात हे बघत असे. ती पालात राहणारी मुलगी होती. एकदा ती वनिताला म्हणाली, "मला येईल का ओ? मला शिकवाल का?' वनिता म्हणाली, "येऊन बसत जा. पाहा.' काही दिवस नुसतीच बसली व हळूहळू शिकून ती आज फॅशन डिझाइन्सचे ब्लाऊज शिवते. ज्यांची शिलाई सहाशे रुपये असते, ती शिवू शकते. हे श्रेय विशेषतः शिकवणारी व शिकणारी दोघींचे आहे. एवढेच नव्हे तर या रेखा भोरपेचे बघून तिच्या भोवतालच्या झारखंडच्या, बिहारी, कन्नड मुलीदेखील शिवण शिकल्या व आपल्या पायावर उभ्या राहिल्या, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.

आजही वनिताचा क्‍लास जोरात चालू आहेच. वनिताला गेल्या वर्षी "रणरागिणी' पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्र- पुणेचा पुरस्कार यंदा मिळाला. ही केवढी अभिनंदनीय गोष्ट आहे!

तिच्या पुस्तकाचे श्रेय ती मला देते खरी; पण मी फक्त प्रेरणा देण्यासाठी निमित्त मात्र होते. उंचावत जाणारा कर्तृत्त्वाचा आलेख तिच्या अंगभूत कौशल्याचा व अपार प्रयत्नांचा आहे. एवढे करून आपल्या गावी गेली, की शेतात काम करायला उभी असते. एखादे व्यक्तिमत्त्व कसे सर्वांगांनी विकसित होऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. त्यासाठी इच्छाशक्ती हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr shaila kalkar wirte article in muktapeeth