दिसते की, दिसणार नाही!

sahilesh-tribhuvan
sahilesh-tribhuvan

मन माझे गलबलून गेले आहे. मला जगाकडे पाहण्याची दृष्टी देणारे डोळे काही दिवसांनी सृष्टीही बघू शकणार नाहीत म्हणून मन माझे गलबलून गेले आहे. माझे वडील, विश्‍वनाथ भिवाजी त्रिभुवन त्र्याहत्तर वर्षांचे आहेत. ते लहान असतानाच माझ्या आजोबांचे निधन झाले. घरातला कर्ता माणूस म्हणून वडिलांवरच आई, चार भाऊ व बहीण असा कुटुंबाचा गाडा चालविण्याची जबाबदारी आली. भावांचे शिक्षण पूर्ण करून व लग्न करून देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. माझे वडील सुरवातीला समाजवादी नेते किशोर पवार यांच्याकडे घरगडी म्हणून काम करीत होते. त्या वेळीच माझा जन्म झाला. नंतर त्यांनी सोमय्या विद्या मंदिर या शाळेत शिपाई म्हणून काम करायला सुरवात केली. किशोर पवार यांनी माझ्या आजीला बहीण मानले होते. त्यामुळे किशोर पवार हे माझ्या वडिलांचे आणि कुटुंबाचे मामा होते. तसे ते संपूर्ण साकरवाडीचेच मामा होते! औरंगाबाद जिल्ह्यातील खंबाळा हे गाव पोट भरण्याच्या निमित्ताने आजोबांनी सोडल्यानंतर नगर जिल्ह्यातील साकरवाडी या गावातच त्रिभुवन कुटुंबाच्या तीन पिढ्यांचा विकास होऊ शकला तोही किशोर पवारमामांमुळे! 

अगोदर गवंड्याच्या हाताखाली वाळू-सिमेंट कालवणारा पोरगा, नंतर शाळेत शिपाई, पुढे कारखान्यात कामगार, कामगार युनियन कार्यकर्ता, केमिकल्स कारखान्यात ऑपरेटर या पदावरून माझे वडील निवृत्त झाले. 

कारखान्यात काम करीत असतानाच त्यांना डोळ्यांचा त्रास होऊ लागला होता. मी दहावीला असताना वडील डोळ्यांच्या इलाजाकरिता मद्रासला दोन वेळेस जाऊन आले होते. नामवंत नेत्रतज्ज्ञांनी त्यांचे डोळे तपासले होते. तेव्हा डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले होते की, तुमच्या डोळ्यांचा रेटिना खराब झाला आहे. त्यावर आता तरी कोणताही इलाज होऊ शकत नाही. हळूहळू तुमची दृष्टी कमी होणार. डॉक्‍टरांनी सांगितलेले हे बोल तीस वर्षांनी पुन्हा आठवत आहेत. त्या वेळीही वडिलांच्या काळजात चरऽऽ झाले होते आणि आजही त्यांना तोच अनुभव आला. मी तर पूर्ण शहारूनच गेलो होतो. कारण ते मद्रासला ज्या काळात त्यांच्या पत्नीचे म्हणजेच माझ्या आईचे मंगळसूत्र मोडून गेले होते, त्या वेळी मी त्यांच्याबरोबर नव्हतो; किंबहुना त्यांनी मला बरोबर नेणे अशक्‍यच होते. आता मीच त्यांना नेत्रतज्ज्ञाकडे नेले होते.

वडील ज्या केमिकल कारखान्यात काम करत होते, त्या कारखान्यातील त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक कामगारांना डोळ्यांचे दोष निवृत्तीच्या वेळी उद्भवले होते. केमिकल्स कारखान्यातील गॅसमुळे अनेक कामगारांचे डोळे खराब होतात. तसेच वडील स्वत: कामगारांच्या युनियनमध्ये त्या वेळी काम करत होते. तरीही ते स्वत:साठी व इतर कामगारांसाठीही काही करू शकले नाहीत. इतकेच काय स्वत:ची निवृत्तीची पेन्शनदेखील ते मिळवू शकले नाहीत. डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार त्यांचे डोळ्यांचे दिसणे हळूहळू कमी होत होत आज त्यांना फक्त समोर अस्पष्ट चेहरा दिसतो. ते आवाजावरून समोरचा माणूस ओळखतात. त्यांची दृष्टी हळूहळू कमी होत होती; आणि मला जगण्याची किंबहुना माझे जगणे विकसित करण्याची दृष्टी प्राप्त होत होती. हा बदल म्हणजे त्यांनी आम्हा भावंडांना लावलेल्या शिस्तीचा व संस्काराचाच भाग मी समजतो. त्यांनी त्यांचे दु:ख त्याच वेळी स्वीकारले होते. ते त्या दु:खाला कुरवाळत बसले नाहीत. माझ्या डोळ्यांचे होईल ते होईल; पण मला, माझ्या आईला, भावांना व त्याही पुढे माझ्याच मुलांना शिकवून स्वत:च्या पायावर उभे करून त्यांचेही विकसित कुटुंब स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे असे ते सांगायचे. 

एकदा तर माझ्या दृष्टीत दोष निर्माण होऊ नये म्हणून लहान असताना मला इतके मारले होते की, तो मार आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. अर्थात ती माझीच चूक होती. गावात त्या काळात व्हिडिओ सेंटर नुकतेच सुरू झाले होते. मी आकर्षणापोटी आणि कुतूहल तृप्तीसाठी दररोज एक चित्रपट बघायचो. तेही शाळा बुडवून! आईच्या डब्यातून पैसे चोरून! सुरवातीला त्यांनी दुर्लक्ष केले होते. पण माझे अतिच झाले म्हटल्यावर मग मला त्यांनी एकदा ठरवून चोप दिला! त्यांना भीती वाटायची की, दररोज चित्रपट बघण्याने हा बिघडेल. शिवाय पुढे याच्या डोळ्यांमध्ये दोष निर्माण झाला तर? आता आज सर्व जगच टी.व्ही., मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीनवर आहे. हा बदल असला तरी माझ्या डोळ्यांत आज दृष्टिदोष नाही. हीच त्यांच्या आनंदाची आजची स्थिती आहे. मला दृष्टी देणाऱ्या माझ्या वडिलांसाठी आज कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांना दृष्टी देऊ शकत नाही. किंबहुना काही दिवसांनी ते मलाच काय, पण या सृष्टीलाही बघू शकणार नाहीत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com