सुखद अनुभव

डॉ. स्नेहा जोशी
शुक्रवार, 22 मार्च 2019

संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही.

संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही.

आपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्‍सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत होते. प्रभात रस्त्यावर मला घरी जायचे होते. इतक्‍या दूर येण्यासाठी टॅक्‍सीच बरी वाटते. गर्दी होती; पण रहदारी व्यवस्थित सुरू होती. उतरण्यापूर्वी पाच मिनिटे आधी मला माझ्या वहिनीचा फोन आला. फोनवर बोलतच मी टॅक्‍सीचे बिल चुकते केले. माझी ऑफिस बॅग घेऊन मी घरी आले. जेवण वगैरे झाल्यानंतर आपला डबा स्वच्छ करून ठेवावा म्हणून डबा-बाटलीची पिशवी बघू लागले, तर पिशवी सापडेना. मग मला आठवले की, फोनवर बोलण्याच्या नादात मी डब्याची पिशवी टॅक्‍सीतच विसरले होते. मनाशी म्हटले, जाऊ दे. क्षुल्लकच गोष्टी राहिल्या. एक-दोन दिवसांत आणू दुसरा डबा. कारण, आठवडा अखेरच होती त्या दिवशी. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. ""मॅडम, मी तुम्हाला संध्याकाळी सोडले. तुमची बॅग माझ्या गाडीतच राहिली आहे; पण मी आता लांब आहे. तुम्हाला उद्या देतो.'' मी म्हटले, ""ठीक आहे, काही घाई नाही.''

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला माझी बॅग घरपोच मिळाली. मी चालकाचे आभार मानले. त्यावर उलट त्यांनीच "एक दिवस उशीरच झाला. तुम्हाला डबा कामाला जाताना लागणार म्हणून मी फोन केला', असे सांगून दिलगिरी व्यक्त केली. आपण म्हणाल, की डबा विसरला होता टॅक्‍सीत. तो परत केला त्यात काय विशेष? पण आजच्या धकाधकीच्या जीवनात माझ्यासारख्या शेकडो प्रवाशांची ने-आण करणाऱ्या त्या चालकाला माझ्या डब्याची त्या बॅगमुळे गैरसोय होऊ नये म्हणून काळजी होती. तो त्याचे पेट्रोल जाळत माझ्यासाठी पुन्हा आला होता. ही संवेदना आजच्या काळात नक्कीच कौतुकास्पद नव्हे काय? या चालकाचे नाव सचिन पवार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr sneha joshi write article in muktapeeth