...ते गेले

डॉ. सुभाष मेहता
शुक्रवार, 13 जुलै 2018

नदीकाठी ते वाढले, नदीच्या पाण्याशी खेळले. अखेर त्यांना नदीच्या पुरानेच वाहून नेले.

नदीकाठी ते वाढले, नदीच्या पाण्याशी खेळले. अखेर त्यांना नदीच्या पुरानेच वाहून नेले.

नारायण पेठेत नदीकाठी आत्याचे घर होते. फुवांचे वय 75. महिन्यापूर्वी घरातच पडल्यामुळे त्यांच्या उजव्या खुब्याचे हाड "फॅक्‍चर नेक फीमर' मोडल्याने त्या पायाला प्लॅस्टर केलेले. मी त्या वेळी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होतो. वसतिगृहात राहात होतो. त्यादिवशी सकाळी दहाच्या सुमारास नदीचे पाणी शहरात घुसल्याचे समजले. होस्टेलच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर नजरेवर विश्‍वास बसेना. संगम पुलावरून पाणी वाहत होते. छातीत धस्स झाले. फईचे घर नदीला लागून. फुवांचा पाय प्लॅस्टरमध्ये. ते बाहेर पडले असतील का? आतेबहीण शांता व तिची चार लहान मुले फईकडेच असायची. त्यांचे काय झाले असेल? मी तडक सायकलने गावात जायला निघालो. मी लक्ष्मी रस्त्याने गोखले हॉलपर्यंत गेलो. पुढे जाणे शक्‍य नव्हते. चिंचेच्या तालमीजवळ माझ्या दुसऱ्या आतेबहिणीचे घर आहे. तिथे सातवीत शिकणारा आतेभाऊ जगन्नाथ व शांताबाईचा मोठा मुलगा शशी यांची गाठ पडली. त्यांना पाहून दिलासा वाटला. बाकीची मंडळीही कोठे तरी नक्की असतील अशी आशा वाटली.

नारायण पेठेतील घराच्या जागी फक्त जोत्याचे दगड शिल्लक राहिले होते. या रांगेतील एकच सिमेंट क्रॉंक्रीटचे तीन मजली घर शिल्लक राहिले होते. बरेचसे शेजारी नावंदरांच्या या इमारतीच्या गच्चीवर गेले होते. फुवांचे संपूर्ण आयुष्य नदीकाठी या घरात गेलेले होते. पाणी वाढू लागले तसे घरातल्या स्त्रियांनी फुवाना महत्‌प्रयासाने उचलून पहिल्या मजल्यावर नेले. तिथपर्यंत पाणी आल्याने खोलीसमोर उघड्या पत्र्यावर गेले. पण पुराच्या लोंढ्याने घर क्षणार्धात कोसळले. शांता, मुले व फई पाण्यात बुडून वाहून गेली. पत्र्यावर झोपलेले फुवा पत्र्याबरोबर वाहत जाताना नावंदराच्या इमारतीवरील लोकांनी पाहिले. त्या लोकांना पाहून फुवांनी हात जोडून त्यांचा निरोप घेतला व काही क्षणातच तेही दिसेनासे झाले.

जगन्नाथ व शशी हे जेव्हा पाणी पहिल्या मजल्यापर्यंत आले तेव्हा घरासमोरील अनाथ हिंदू महिलाश्रमातील काही मंडळींनी टाकलेल्या दोराला पकडून पलीकडे गेले, म्हणून ते तेवढे वाचले. आज 56 वर्षांनंतरही तो प्रसंग आठवतो. मन बधीर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr subhash mehta write article in muktapeeth