घराबाहेरचं स्वातंत्र्य

डॉ. सुभाष तळेकर
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

अमेरिकेत गेल्यावर तेथील महत्त्वाची स्थळे तर पाहिली जातातच, पण एखादा तेथील समाज वाचू लागतो. कुटुंबपद्धती न्याहाळू लागतो. मग मनात तुलना होऊ लागते.

अमेरिकेत गेल्यावर तेथील महत्त्वाची स्थळे तर पाहिली जातातच, पण एखादा तेथील समाज वाचू लागतो. कुटुंबपद्धती न्याहाळू लागतो. मग मनात तुलना होऊ लागते.

अमेरिकेत साधारणपणे वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षी म्हणजेच हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुले आई-वडिलांपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे अन्यत्र राहतात. अर्थात यासाठी आई-वडिलांची संमती असते. आता मुलांनी स्वतंत्र होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशीच त्यांची अपेक्षा असते. या मुलांनी हायस्कूल स्तरावर शिक्षण घेत असतानाच एखादे व्यावसायिक शिक्षण घेतलेले असल्याने घराबाहेर पडण्याची त्यांची मानसिकता निश्‍चित झालेली असते. अशाप्रकारे अमेरिकेत पालक व पाल्य दोघांमध्येही जीवनाचे व जगण्याचे स्वातंत्र्य फार महत्त्वाचे जीवनमूल्य मानले जाते.

आईवडिलांपासून घराबाहेर पडत असताना या मुलामुलींनी आत्मविश्‍वास व स्वावलंबनाचा वस्तुपाठ गिरवलेला असतो. एकटे, स्वतंत्र राहावयाचे असल्याने त्यांना "रोटी, कपडा व मकान'साठी रोजगाराचा शोध घ्यावा लागतो. तिथे जीवनावश्‍यक सर्व गोष्टीचे भाव अत्याधिक असल्याने त्या खर्चाचा मेळ घालत असताना या मुला-मुलींना कमाई करणारा जीवनाचा जोडीदार शोधण्याचा त्यांचा उपक्रम सुरू होतो. जीवनाचा जोडीदार ते आईवडिलांच्या परस्पर स्वतःच्या मर्जीने निवडत असतात. ही तरुण मुले-मुली प्रारंभी "सहजीवन नाते' स्वीकारतात. काही वर्षे ते एकत्र राहतात आणि त्या काळात परस्परांशी जर जमले-पटले तर विवाहबद्ध होतात. अन्यथा परस्परांना मुक्त करतात आणि विवाहानंतरही जर बिनसले तर घटस्फोट घेतात आणि पुन्हा नवा जोडीदार शोधतात. खरे तर तिथे विवाह हा पवित्र संस्कार, करार किंवा विधी - बंधन मानला जात नाही. तेथील युगुलांच्या स्वतंत्रता वृत्तीमध्ये भारतीयांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास स्वच्छंदीपणा दिसेल. त्यांच्या दांपत्य नातेसंबंधात रेशीमगाठी किंवा आभाळमायेचा स्पर्श बहुधा नसतोच. "खाओ, पिओ, नाचो, गाओ, मौज करो' हा फंडा त्यांच्या बंधनमुक्त जीवन शैलीमध्ये अंगिकारलेला असतो. त्यामुळे तरुण मुला-मुलींना जन्मदात्याचे घर सोडताना एकमेकांविषयी ना ओढ, ना दुःख, ना हूरहूर वाटते. पालक व पाल्य दोघांनाही स्वतंत्र, स्वच्छंद जगण्यासाठी "स्पेस' हवा असतो. या संदर्भात एक महत्त्वाची बाब नमूद करावीशी वाटते, की अमेरिकेतील दांपत्य शक्‍यतो उतारवयात अपत्यांना जन्म देतात. याचे एक कारण उमेदीच्या काळात गाडी, घर व आर्थिकदृष्ट्या सुस्थिर, स्थावर व स्वयंपूर्ण झाल्यावर मगच अपत्य प्राप्तीचा विचार करतात. दुसरे म्हणजे पती, पत्नी (पालक) दोघेही नोकरी करीत असल्याने मुलांचे संगोपन व त्यासाठी लागणारा आवश्‍यक वेळ त्यांच्याकडे नसल्याने कुटुंब विस्तार विलंबानेच करतात.

अमेरिकेत स्त्री-पुरुष असा लिंगभेद किंचितही मानत नसल्याने पालक मुलगा व मुलगीच्या जन्माचे स्वागत समान मानसिकतेने करतात. घराण्याला वारस हवा, कुलदीपकच हवा, असा अट्टहास मुळीच नसतो. अठराव्या वर्षी अपत्य घर सोडून जाणार असल्याने मुलगा असो वा मुलगी, पालकांना फारसा फरक पडत नाही. अमेरिकेत मुला-मुलींना पदवी व पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर ते घराबाहेर पडल्यानंतर "कमवा आणि शिका' पद्धतीने शिक्षण पूर्ण करतात. कॉलेजच्या एकूण चार वर्षांपैकी दोन वर्षे त्यांना अनिवार्यतः विद्यार्थी वसतिगृहात राहावे लागते. हा सर्व प्रचंड खर्च ते सरकारकडून मिळणाऱ्या कर्जाऊ शिष्यवृत्तीमधून भागवितात. नंतर ते कर्ज नोकरी मिळाल्यानंतर परत केले जाते. पण जर एखाद्या पालकाची इच्छा व क्षमता असेल तर ते आपल्या पाल्यांना आर्थिक मदत करीत असतात. उच्च शिक्षणात खूप मोकळीक आहे. दोन वर्षे शिक्षण झाल्यावर जर वेगळाच विषय घ्यायचा असेल तर तो घेता येतो. न आवडत्या विषयात पदवी घेण्याची बळजबरी नसते. सर्वांना त्यांच्या योग्यतेनुसार गुणानुक्रमे महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. आरक्षण नसते. शुल्कामध्येही खासगी व शासकीय असा भेदभाव नसतो.

अमेरिकेत विभक्त कुटुंब पद्धती किंवा मुक्त विवाह पद्धती असल्याने तिथे सासुरवास, सूनवास किंवा हुंड्यासाठी छळवाद असा प्रकार अजिबात नसतो. जीवनाचा जोडीदार शोधताना श्‍वेत व कृष्णवर्णीय मुला-मुलींमध्ये वर्णभेद फारसा दिसून येत नाही. वृद्धपणी आपले घरदार व स्थावर-जंगम मिळकत विकून पालक घराबाहेर पडतात. घराची रक्कम व आपल्या पेन्शन, भविष्य निर्वाहनिधीमधील एकमुठी रक्कम राज्य शासनाला देऊन सरकारी पालनघरात जीवनसंध्या व्यतीत करतात. मुलांसाठी राखून ठेवण्याची पद्धती तिथे नाही. तिथे वृद्ध दांपत्याचे जेवण, निवास, मनोरंजन, आरोग्य सुविधा व अन्य अपेक्षित आवश्‍यक सर्वतोपरी देखभाल व संगोपन सरकार करते.
एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करणे अगत्याचे वाटते, की अमेरिकेतील भारतीय कुटुंबात संयुक्त पद्धती असल्याने किंबहुना पती-पत्नी, त्यांची मुले आणि आजोबा, आजी एकत्रित राहतात. त्यामुळे तेथील भारतीय मुले-मुली घराबाहेर पडून स्वतंत्र राहात नाही. बहिणाबाईंनी "येलातं येलं गुरफटलेली, पानी सोडीना चिखलाला आन चिखल सोडीना पान्याला' म्हटल्याप्रमाणे जगात कुठेही गेला तरी भारतीय कुटुंबांमध्ये अश्रु-रक्ताच्या नातेबंधाची वीण घट्ट असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr subhash talekar write article in muktapeeth