मॅनेजमेंट गुरू

डॉ. विलीना इनामदार
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

अनेक धर्म, वंश, भाषा, जातींच्या सुहृदांचे शांता आपल्या भोवती संमेलनच भरवते. एक भाजीवाला तिला न चुकता दोन जुड्या भाजीच्या नेमाने तशाऽऽच देतो. हवालदार, पोलिस ती कार्यालयीन कामासाठी गेल्यावर नावानिशी ओळखतात...

अनेक धर्म, वंश, भाषा, जातींच्या सुहृदांचे शांता आपल्या भोवती संमेलनच भरवते. एक भाजीवाला तिला न चुकता दोन जुड्या भाजीच्या नेमाने तशाऽऽच देतो. हवालदार, पोलिस ती कार्यालयीन कामासाठी गेल्यावर नावानिशी ओळखतात...

काचा, पत्रा गोळा करणाऱ्या मायाकडे आज जेवणासाठी 10 रुपये शिल्लक होते. गरमागरम वाफाळता भात आणि त्यावर खमंग रस्सा अशा जेवणानं ती शांताबाईंना मनोमन दुवा देत होती. शनिवारवाड्यापाठच्या देसाई महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या शे-दोनशे मीटर अंतरावर नानावाड्याच्या कोपऱ्यावर दोन फूट बाय दोन फुटांच्या जागेत फुटपाथवरील मॅनेजमेंटची गुरू शांताबाई सपकाळ भेटते संध्याकाळची.

बोलताना खूप शांत, समंजस वाटणारी शांता अंगात कमालीची धडाडी, जिद्द बाळगून आहे, असे वाटले. गोरगरिबांच्या हातावरील पोट असणाऱ्या कष्टकरी, कामगार महिला आणि पुरुषांच्या त्या भक्कम आधारस्तंभ असतात. स्वतः माळकरी असणाऱ्या शांता येणाऱ्याच्या खिशाला परवडणारा शाकाहारी आणि कधी कधी मांसाहारी आहार घरून तयार करून देतात. एखाद्‌ दुसरा गरमगरम पदार्थ येथेच स्टोव्हवर बनवूनही देतात. फुटपाथवर संध्याकाळी साधारण सांजवेळेला अगरबत्तीच्या मंद दरवळाबरोबर ही आगळीवेगळी खानावळ सुरू होते.

भाताचे पातेले, खमंग सुवास येणाऱ्या रस्स्याचे पातेले, पिठ पेरलेल्या मेथीची कढई, चपात्या व भाकरीच्या दोन टोपल्या आणि अवघी 15-20 ताटं, अशा भांडवलावर हा व्यवसाय सुरू होतो. पूर्वी शांताचे यजमान हा व्यवसाय करत होते. माफक भांडवलात संसार चाले. साधारण 40 वर्षांपूर्वी पतीची ड्रायव्हरची नोकरी अचानक सुटली. तीन मुलांची जबाबदारी या माउलीवर येऊन पडली. शांताच्या डोक्‍यावरचं आभाळ उसवलं. कामगार पुतळ्याजवळच्या दहा बाय आठच्या झोपडीशेजारील बेबी आणि प्रसाराम भाऊ तारू यांचा शेजार त्यांना लाभला. सरपणासहित 5 रुपयांचा शिधा त्यांनी दिला, बरोबर शांताची जिद्द आणि धडाडी होतीच.

आजच्या घडीला हजार रुपयांच्या भांडवलावर अवघा शे-दीडशे होणारा दिवसाचा नफा आणि त्यावर होणारी शांताची गुजराण मनाला थक्क करते. त्यातूनच रिक्षाने घरापासून भांड्यांची ने-आण करण्यासाठी द्यावे लागणारे रतिबाचे 60 रुपये बाहेर पडतात, याचा तिला मनस्वी आनंद होतो. उरलेल्या शंभराच्या नोटेत स्वतःचा उदरनिर्वाह, वीज बिल, पै-पाव्हणा, स्वतःचं दुखणं खुपणं ती निभावून नेते.
सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी पती स्वर्गवासी झाले. मोठा मुलगा दुर्धर आजाराने त्यांच्यातून वजा झाला. छोटा मुलगा काविळीने होत्याचा नव्हता झाला.

आघातामागून आघात शांताने लीलया पेलले. दुःखात सुख एकच मधला मुलगा स्वतःचा व्यवसाय जबाबदारीने करून त्याच्या कुटुंबाची धुरा सांभाळत आहे. मोठ्या लेकाची चार नातवंडे मोठी करून त्यांना मोठ्या पदांवर काम करताना बघायचं स्वप्न शांताबाईंचे आहे. सूनही एका मॉलमध्ये काम करून त्यांच्या घराचा भार पेलत आहे.
शांताला जागेचा बैठा परवाना नुकताच मिळाला. ध्रुवासासारखे अढळपद देणाऱ्या अनेकांचे मनोमन तिने आभार मानले. संध्याकाळी 6 ते रात्री कधी दोनपर्यंतही हा अन्न-यज्ञ चालू असतो. गोरगरिबांना आत्मियतेने आपल्या हातचं खाऊ घालणारी शांता आपल्या सौम्य दिवसांची आठवण ठेवून असते. इंदिरा गांधींच्या हत्येच्या काळातील बंद वातावरणात गिरणीवाल्याला मागून शटर उघडून दळून द्यायला लावी. भाजी, वाणी सामान घेतानाही गरिबांच्या पोटाला कोण देणार अन्न म्हणून त्यांना प्रश्‍न विचारून निरुत्तर करायची. स्वतः सातवी शिकलेली शांता मोबाईल लीलया वापरते. नशा पाणी करून आलेल्या गिऱ्हाइकशी खमकी वागणारी शांताच या परिसरात टिकून आहे. ती अनेक धर्म, वंश, भाषा, जातींच्या सुहृदांचे येथे संमेलनच भरवते. एक भाजीवाला तिला न चुकता दोन जुड्या भाजीच्या नेमाने तशाऽऽच देतो. हवालदार, पोलिस ती कार्यालयीन कामासाठी गेल्यावर नावानिशी ओळखतात.
कोणाला कसे परवडेल, त्याप्रमाणे ती समोरच्याला तृप्त करते. खिशात 20 रुपये असले, तर दोन चपाती भाजीमध्ये जेवण होते. 30 रुपयांत दोन भाकऱ्या आणि भाजीचे जेवण होते, तर 50 ते 60 रुपयांत चारीठाव जेवणाने तृप्ती येते. वयाची 64 वर्षे पूर्ण झालेल्या शांताबाई औषधोपचारासाठी पुंजी बाजूला ठेवतात. अनेक वर्तमानपत्रांनी तिच्या मुलाखती छापून दखल घेतली; पण तिच्या स्वप्नांची पूर्तता अवघ्या हातगाडीनेच तिला करायचीय. आपल्यासारख्या हृदयाला पाझर फुटणाऱ्या वाचकांच्या हाती असलेल्या औदार्यातून पूर्तता होईल; पण त्याआधी तिच्या व्यवसायातील व्यवस्थापनाचे गुरुत्व पाहून आलो आणि तिला मोबाईलवर संपर्क साधला तर आपल्याला "ये नंबर अभी व्यस्त है' असेच वाक्‍य ऐकायला आलं पाहिजे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr viliina inamdar's article in muktapeeth