भिशीची पंचविशी

गौरी राजेंद्र जोशी
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

भिशीची पंचविशी श्रीलंकेतील सहलीने साजरी केली. घर-संसारापासून काही दिवस दूर राहत मैत्रिणींबरोबर "तरुणपण' अनुभवले. मग पुन्हा आहेच आपापले "स्वीट होम'.

भिशीची पंचविशी श्रीलंकेतील सहलीने साजरी केली. घर-संसारापासून काही दिवस दूर राहत मैत्रिणींबरोबर "तरुणपण' अनुभवले. मग पुन्हा आहेच आपापले "स्वीट होम'.

"ए, आपण नुसतीच भिशी करतो, गप्पा मारतो, ते पैसेही तसेच खर्च होत आहेत, त्यापेक्षा आपण कुठेतरी भारताबाहेर जायचे का सहलीला?' एक मैत्रीण. "ए खरेच जाऊया ना!" इतर मैत्रिणींचा आवाज. गेल्या पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त वर्षे सुरू असलेली ही भिशी आम्हाला एक नवीन कल्पना सुचवून गेली आणि आमच्या अंगात उत्साहाचे वारे संचारले. आम्ही पन्नाशीच्या बायका कॉलेजवयीन मुलींसारख्या सहलीला जायला अगदी उतावीळ झालो. त्याच भिशीपासून पैसेही एकत्र जमा करायचे ठरले. हे काम अंजलीने आनंदाने स्वीकारले. नंतर अर्चना आणि साधनानेही तिला साथ दिली. ही आमची भारताबाहेरची पहिलीच सहल होती.

पुढील काही भिशींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांसंबंधी चर्चा झाली आणि शेवटी रावणाच्या लंकेवर शिक्कामोर्तब झाले. कोणाबरोबर जायचे याची चर्चा, चौकशी आणि बैठका. एकदा तारीख आणि ठिकाण निश्‍चित झाल्यावर ड्रेसची चर्चा सुरू झाली. आम्ही काहीजणी फक्त पंजाबी ड्रेस वापरणाऱ्या; पण अंजलीची सक्त ताकीद... पंजाबी चालणार नाही. मग काय, पडत्या फळाची आज्ञा घेऊन गाउन्स, जीन्स वगैरेची एकत्रच जोरात खरेदी झाली. सहलीला महिना राहिला, आठवडा राहिला, म्हणता म्हणता "तो' दिवस उजाडला. पुणे-चेन्नई-श्रीलंका असा रात्रभर प्रवास होऊनही जागरण जाणवतच नव्हते. नवरा, मुले, संसार सर्व विसरून आम्ही चक्क बागडत होतो. सकाळी श्रीलंकेने आमचे स्वागत केले. आम्ही कोलंबोतील हॉटेलवर पोचलो ते गाइडकडून ऐकतच, की भारतीय बायका अजिबात पटापट आवरत नाहीत, खूप वेळ लावतात. पण त्याचा हा समज खोटा ठरवत आमच्या रात्रभर जागरणाचा "अवतार पांडुरंग' आवरून जेमतेम तासाभरातच, एकदम छानशा गाउनमध्ये अशा काही अवतरलो, की गाइड आमच्याकडे पाहताच राहिला.

आमच्या सहलीच्या पहिल्याच दिवशी आम्हाला गंगाराम टेम्पलमध्ये अगदी अचानक एक अविस्मरणीय भेट मिळाली. अत्यंत गोड आणि सुरेल आवाजाचा कलाकार सोनू निगम. त्याने आम्हाला छायाचित्रांसाठी अगदी आवाजाप्रमाणेच गोड हसून साथ दिली. त्या दिवशी रात्री, दुसऱ्या दिवशीच्या ड्रेस कोडची चर्चा झाली आणि ड्रेसवर मॅचिंग होणारे कानातले, गळ्यातले यांचीच काय, पण अगदी ड्रेसचीसुद्धा देवाणघेवाण झाली. असा आमचा रोजचाच कार्यक्रम झाला. इथेच आमच्या ग्रुपमधील अर्चनाचा वाढदिवस केक कापून अगदी उत्साहात साजरा केला.

श्रीलंकेतील राजाने बांधलेले सिगारिया येथे आम्ही भेट दिली. अतिशय उंचावरून श्रीलंका पाहताना याला "पाचूचे बेट' का म्हणतात ते समजले. सिगारियाला मी, साधना आणि सुषमा उन्हाच्या त्रासामुळे वरपर्यंत गेलो नाही; पण बाकी ग्रुप मात्र पुढे गेला. आम्ही त्यांची वाट बघत, ठरलेल्या ठिकाणी बसलो होतो. दीड-दोन तासांत येणारा ग्रुप जेमतेम अर्ध्या तासात खाली आला. आम्ही पावसामुळे थोडे आडबाजूला थांबलो होतो. त्यामुळे आमची चुकामूक झाली. आम्ही एकमेकांना शोधत बसलो. बराच वेळ आमचा ग्रुप दिसला नाही. नंतर मात्र काळजी वाटू लागली. तेथील सिम कार्डही आमच्याकडे नव्हते. तिघीही घाबरलो होतो, तरी एकमेकींना जाणवू देत नव्हतो. सुदैवाने अंजलीने अविनाशचा तेथील मोबाईल नंबर देऊन ठेवला होता. आम्ही एका श्रीलंकन मुलाला विनंती केली आणि त्यानेही लगेच त्याच्या मोबाइलवरून फोन करू दिला. अंजलीचा आवाज ऐकल्यावर अक्षरशः जीव भांड्यात पडणे म्हणजे काय या म्हणीचा पुरेपूर अनुभव आला. इकडे आमचा ग्रुप भेटल्याने त्या मुलाचाही जीव भांड्यात पडला. तो मुलगा ग्रुप मिळेपर्यंत आमच्याबरोबरच राहिला.

आमची जंगल सफारी सुरू असताना एका हत्तीने एक पाय उचलत आमच्यासाठी चक्क मॉडेलिंग केले. आमच्या जीपमध्ये सोंड घालून जणू काही तो आम्हाला सांगत होता, "अहो मॅम, माझेही शूटिंग करा ना!' याला ते हिक्कदुवा हा समुद्राबरोबर केलेला नितांत सुंदर प्रवास आठवतो. कित्येकदा लोहमार्ग, समुद्रमार्ग आणि आमचा रस्ता हे जणू काही सख्खे शेजारी असल्यासारखे चालले होते. एकदम समांतर!
या देशात आपल्यासारखी गरम जेवण ही संकल्पनाच नाही. जेवण गरम हवे असे सांगितल्यावर एके ठिकाणी आम्हाला इडलीबरोबर चक्क चटणीसुद्धा गरम खावी लागली आणि वर प्रेमळ आपुलकीचा प्रश्न, "इस एव्हरिंथिंग हॉट?' सर्वजणी हसत हसतच म्हणाल्या, "येस, येस!' निसर्गरम्य पाचूचा, सोनेरी शहाळ्याचा,आल्हाददायक प्रवासाचा हा देश. आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी मनाने श्रीमंत, साधी, प्रेमळ आणि हसरी माणसे. आता आमचा सहलीचा शेवटचा दिवस होता. रोज नाश्‍ता, जेवण काय मिळणार आहे हे उत्सुकतेने पाहणाऱ्या आम्ही उद्यापासून घरी आपल्यालाच काम करायचे आहे, या कल्पनेनेही उदास झालो होतो. इथल्या सुखद आठवणी उराशी बाळगत, पुढची सहल कधी यावर चर्चा करत आम्ही आपापल्या "स्वीट होम'मध्ये परतलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gauri joshi write article in muktapeeth