निळी झालर

गौरी महाडिक
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

उंच बर्फाच्छादित डोंगरांमधून वाट काढत पुढे गेलो, तर समोर सुंदर निळी झालर.

उंच बर्फाच्छादित डोंगरांमधून वाट काढत पुढे गेलो, तर समोर सुंदर निळी झालर.

एका सुंदर प्रवासाला सुरवात झाली. अनेक उंच बर्फाच्छादित डोंगरांमधून वाट काढत, मध्येच खळखळ वाहणाऱ्या नद्या ओलांडत आमचा प्रवास सुरू होता. अचानक लांबून एक सुंदर निळी झालर दिसली. काही क्षणात आम्ही त्या निळ्या, सोनेरी, हिरव्या, राखाडी तलावाजवळ पोचलो. आम्ही कधी त्या पाण्याला स्पर्श करतोय असे झाले आम्हाला, पण गाडी पुढेच चाललेली. शेवटी गाडी थांबली. व्वा ! किती छान ! किती सुंदर ! या पलीकडे शब्द सुचेनात. निसर्गाने किती छान निर्मिती करावी याचेंच जिवंत उदाहरण म्हणजे पॅंगॉंग. चोहोबाजूने उंच उंच डोंगरांनी घेरलेला, शांत, सुंदर, आल्हाददायी पॅंगॉंग आणि किती स्वच्छ अन्‌ पारदर्शक पाणी. आपण त्यात खोलवर बघू शकतो. त्या अफाट पसरलेल्या, निळसर पाण्यावर उडणाऱ्या सीगल्स पक्ष्यांचे दृश्‍य कॅमेऱ्यात टिपण्याचे माझे सर्व प्रयत्न विफल झाले. पण त्याचाही आनंदच मिळाला. सूर्य मावळतीला जातांना पॅंगॉंग वेगवेगळ्या रंगाची उधळण करत होता. पॅंगॉंगविषयीची एक श्रद्धा अशी, की त्या पाण्यात म्हणे जलपरी आहे आणि म्हणूनच त्यात कोणी अंघोळ करत नाही किंवा हातपाय धूत नाहीत. रात्रीची आमची सोय एका तंबूमध्ये करण्यात आली होती. तंबू अतिशय सुंदर आणि सर्व सोयींनी युक्त होता. इथला निवाससुद्धा एक वेगळा अनुभव होता. येथून आम्हाला पॅंगॉंगचे थेट दर्शन होत होते.

इथे सूर्य मावळला तरी अंधार खूप उशिरा होतो, त्यामुळे पॅंगॉन्गकडे बघत बघत आणि कधीही न अनुभवलेल्या गारठ्यात कुडकुडत आम्ही मध्यरात्रीपर्यंत तंबूबाहेर बसलो होतो. रात्री जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वाजणारा तंबू उडून तर नाही ना जाणार, अशी भीती मनात असताना एक मस्त डुलकीही काढली. पहाटे साडेचारलाच लखलखीत उजेड पडला होता. डोंगरमाथी सोनेरी झाली होती आणि पुन्हा एकदा पॅंगॉंगने सूर्योदयानंतरच आपलें नवें रूप आम्हाला दाखवायला सुरवात केली होती. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. निघताना मनातील हुरहूर काही केल्या लपवता येईना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gauri mahadik write article in muktapeeth