इंग्रजी ः संवाद अन्‌ स्टेट्‌स

गायत्री बोरावके
गुरुवार, 28 मार्च 2019

मैत्रिणीबरोबर एका वेस्टर्न हॉटेलमध्ये गेले होते. आमचं मराठीत संभाषण चाललं होतं. थोड्या वेळाने वेटरला बोलावले आणि ती सांगायला लागली, "आय वॉंट... ऍण्ड इन द ऍण्ड वी वूड लाइक टु हॅव...!

भाषा ही एक मनुष्य जातीला लाभलेली देणगी आहे. पण ती आज एक भाषा उरलेली नसून प्रगती होण्यासाठीचा अट्टहास बनलेली आहे.

मैत्रिणीबरोबर एका वेस्टर्न हॉटेलमध्ये गेले होते. आमचं मराठीत संभाषण चाललं होतं. थोड्या वेळाने वेटरला बोलावले आणि ती सांगायला लागली, "आय वॉंट... ऍण्ड इन द ऍण्ड वी वूड लाइक टु हॅव...! ती सगळं सांगत असताना मी एकटक तिच्याकडे बघतच बसले. दोन मिनिटापूर्वी हीच मुलगी माझ्याशी मराठीत संवाद साधत होती आणि अचानक इंग्रजी. समोरच्या माणसाला मराठी स्पष्ट कळत असूनसुद्धा. जिथे माणसांशी संवाद साधण्यापेक्षा इंग्रजी भाषेचा देखावा करणे आजच्या पिढीला जास्त महत्त्वाचं वाटतं. इंग्रजी ही भाषा आज कैक युवकांचा न्यूनगंड बनली आहे. इंग्रजी न आल्याने मित्रमैत्रिणी होणार नाहीत. चांगल्या कंपनीत नोकरी मिळणार नाही. अशा अनेक गोष्टी आज युवकांच्या प्रगतीआड येतात. एखादी परप्रांतीय व्यक्ती तोडकं मोडकं जरी इंग्रजी बोलत असली तरी ती परप्रांतीय किंवा फॉरेनर आहे म्हणून दुर्लक्षित केली जाते. पण हेच एका भारतीय व्यक्तीकडून झाले, तर ती अशिक्षित किंवा कमी दर्जा असलेली समजली जाते. ही एक ज्ञान भाषा आहे. पण आज त्याचा बाजार मांडला जातोय.

भाषेचा अभिमान असणाऱ्या व्यक्ती काळासकट कुठे अदृश्‍य झाल्यात कुणास ठाऊक? मराठी याच भाषेचे एक उदाहरण जर घेतले तर आपण तेरावी भ्रष्ट मराठी आज बोलत आहोत. आज कुठलाच युवक बहुभाषिक असलेल्या भारतीय भाषा शिकण्यापेक्षा परदेशी भाषा शिकणं महत्त्वाचं समजतो. भाषा हे विकासाचं माध्यम आहे; स्थिरीकरणाचे नव्हे. सरस्वती ही बुद्धीची खङ्‌ग आहे. भाषा ही एक मनुष्य जातीला लाभलेली देणगी आहे. पण ती आज एक भाषा उरलेली नसून प्रगती होण्यासाठीचा अट्टहास बनलेली आहे. बहुभाषिक भारत आज निव्वळ इंग्रजी भाषेच्या दडपणाखाली आलेला आहे. आणि हे एक सत्य नसून एक भीषण वास्तव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gayatri borawke write article in muktapeeth