देव दयाळू, देव निष्ठूर

गिरीश शहा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

म्हटले तर बॅंकेने दिलेली ती एक छोटीशी सुविधा होती; पण त्यातून बॅंक अधिकारी व एक वृद्ध ग्राहक यांच्यामध्ये एक सुंदर नाते तयार झाले. माणुसकीचे. वडील अन्‌ मुलाचे असावे तसे.

म्हटले तर बॅंकेने दिलेली ती एक छोटीशी सुविधा होती; पण त्यातून बॅंक अधिकारी व एक वृद्ध ग्राहक यांच्यामध्ये एक सुंदर नाते तयार झाले. माणुसकीचे. वडील अन्‌ मुलाचे असावे तसे.

मी बॅंकेच्या सांगली शाखेचा प्रमुख होतो. काम मस्त चालले होते. एकेकाळी तोट्यात असलेली शाखा भरघोस नफा मिळवत होती. ठेवी आणि कर्ज यांनी उच्चांक मोडले होते. बॅंकेच्या ग्राहकांना भेटण्यात मला नेहमीच आनंद वाटायचा. ग्राहकांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात, त्यांना चहा पाजावा अशी पद्धत ठेवली होती. अनेकदा त्यांच्याशी गप्पा मारताना विलक्षण गोष्टी कळायच्या. माझ्या माहितीत भर पडायची. माझ्या केबिनची जागा आणि रचना अशी होती, की शाखेत येणारा प्रत्येक माणूस मला दिसायचा. तो कोणत्या "काउंटर'ला कामासाठी आला ते समजायचे, तो साधारण किती वेळ बॅंकेत थांबला हेही कळायचे. कुठे उशीर होतो, असे वाटले तर मी इंटरकॉमवरून लगेच सूचना देत असे. त्यामुळे आलेला माणूस लवकर मोकळा व्हायचा.

एक दिवस मला दिसले, की एक वयस्कर माणूस, कुबड असल्याने वाकलेला, मोठ्या कष्टाने चालत बॅंकेत आला आणि बचतीच्या काउंटरला आपला धनादेश देऊन, टोकन घेऊन तिथल्या खुर्चीवर बसला. यथावकाश त्या बाबांचा नंबर आला. ते सावकाश उठून कसेबसे चालत कॅश काउंटरला पोचले. त्यांना कुबड असल्याने धड उभे राहता येत नव्हते. खिडकीपर्यंत हात लांबवून त्यांनी नोटा घेतल्या. एका खुर्चीवर बसून त्यांनी नोटा दोनदा मोजल्या. जवळच्या पिशवीत नीट ठेवल्या. चालत ते दारापर्यंत पोचले. बॅंकेच्या तीन-चार पायऱ्या उतरतानाही त्यांना त्रास होत होता. बाहेर त्यांनी रिक्षा थांबवून ठेवली होती. त्यात बसून ते निघून गेले. जाताना त्यांनी माझ्या मनात स्वतःविषयी कुतूहल निर्माण केले.

मी बॅंकेतल्या एका जुन्या कर्मचाऱ्याला वसंताला बोलावून घेतले आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. ते बॅंकेच्या मागच्या गल्लीतच राहत. पत्नी गेल्यापासून घरी एकटेच असत. एकुलता एक मुलगा लंडनमध्ये कित्येक वर्षांपासून स्थायिक झालेला. तो दोन-तीन वर्षांतून एकदा वडिलांना भेटायला येतो. नातवंडांना मराठी बोलता येत नाही आणि आजोबा लंडनला जायला तयार नाहीत. मी वसंताला सांगितले, की पुन्हा ते बॅंकेत आले, की त्यांना माझ्याकडे घेऊन ये.

पंधरा-वीस दिवसांनी पाटील आजोबां माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन विसावले. साहेबांनी आपल्याला आत का बोलावले? याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यांचा मुलगा लंडनमध्ये एका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा प्रमुख होता. मुलगा प्रत्येक महिन्याला आमच्या बॅंकेमार्फत पैसे पाठवायचा. त्यात आजोबांचे भागायचे. रोज सकाळी बाई येऊन दोन वेळचा स्वयंपाक करून जायची. लोटा-झाडायला एक बाई यायची. जवळच एक नातेवाईक राहायचे. ते एखादी चक्कर रोज मारायचे. मुलाने फोन घेऊन दिला होता, त्यावर कुणाशी तरी संभाषण करण्यात थोडा वेळ जायचा. अथपासून इतिपर्यंत वर्तमानपत्र वाचून काढायचे. दोन-चार दिवसांतून मुलाचा-सुनेचा फोन यायचा. त्यावर मुलाचा आवाज ऐकणे ही सुखाची परमावधी वाटायची.

मी माझा नंबर त्यांना लिहून दिला. त्यांचाही घेतला. त्यांना प्रेमाने आणि हक्काने बजावून सांगितले, की यापुढे पैसे काढण्यासाठी बॅंकेत यावे लागणार नाही. फक्त मला फोन करायचा. पैसे घरी पोचतील. दुसरी काही अडचण आली तरी फोन करायचा. त्यानंतर त्यांचा फोन आला, की बॅंकेतला कुणीतरी पैसे घेऊन त्यांच्या घरी जायचा. एकदा मी स्वतःच पैसे द्यायला गेलो, तर तो वृद्ध माणूस आनंदाने रडायला लागला. मग मीच दोन कप चहा केला. आम्ही दोघे गप्पा मारत चहा प्यायलो. घरी कधीही कप न विसळणारा मी त्यांचे जुने कप धुऊन रॅकवर ठेवले. जणू काही स्वतःचा मुलगा आल्याचा आनंद त्यांना झाला होता.

त्यांचा मुलगा-सून सुटीवर आले, तेव्हा मला भेटायला मुद्दाम बॅंकेत आले. मी त्यांच्या वडिलांना करत असलेल्या मदतीबद्दल त्यांनी माझे पुन्हा पुन्हा आभार मानले. बॅंकेच्या खात्यात मोठ्या रकमेचा भरणा केला. जसे आले तसे निघूनही गेले. जाताना मला फोन करायला विसरले नाहीत. आजोबा पुन्हा एकटे झाले. उदास झाले.
बॅंकेचा व्याप वाढतच होता. माझी इच्छा असूनही मला कामातून वेळ मिळेनासा झाला होता. तरीही मी आजोबांना अधूनमधून फोन करून खुशाली विचारत होतो. त्यांच्या थकत चाललेल्या जीवाला तेवढ्यानेही बरे वाटायचे आणि एक दिवस तो अशुभ फोन आला. सारी नातीगोती इथेच ठेवून आजोबा गेले. काही दिवसांनी लंडनहून मुलगा आला. उरलेले संस्कार पूर्ण करून घर बंद करून निघून गेला. मला आवर्जून भेटला. रक्ताचा नाही; पण तरीही जवळचा माणूस गेल्याचे दुःख विसरणे मला खूप कठीण गेले. देव दयाळू आहे, असे म्हणतात; पण कधी कधी तो खूप निष्ठूर वाटतो!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girish shah write article in muktapeeth