देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या डोंगरपायथ्याच्या सुवर्णकन्या

Mount-Everest
Mount-Everest

मृगनक्षत्राच्या पावसाने नुकतीच हजेरी लावली होती. आसमंत मृदगंधाने सुवासिक झाला होता. नोकरीची ऑर्डर घेऊन पोस्टमन घरी आला. बंद लिफाफ्यात भविष्याची भाकर दडली होती. शिक्षक म्हणून शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रुजू व्हायला पावलं अधीर झाली होती. समाजाच्या वंचित आदिवासी घटकांसाठी काम करण्याची संधी प्राप्त होते आहे, याचा आनंद अधिक होता.

मंगीची शाळा गावाच्या बाहेर, उंच खडकाळ जमिनीवर वसलेली. रुजू झालो त्या पहिल्या दिवशी मुख्याध्यापकांनी इयत्ता तिसरीची हजेरी देऊन वर्गावर पाठवले. आनंद, अपेक्षा, जुने संचित घेऊन माझी पावलं वर्गाचा उंबरठा ओलांडत होती. एक शिक्षक आले आणि म्हणाले, "सर अजिबात टेंशन घ्यायचं नाही. एकादिवशी दोन-दोन पाठ शिकवायचे. आपण कितीबी शिकवलं तरी परसाले पानं तीनच.' मी स्तंभित झालो. ते आदिवासी समाजातून पुढे आलेले एक शिक्षक होते.

दऱ्याखोऱ्यांत वावरणाऱ्या आपल्याच रानपाखरांप्रति त्यांची मानसिकता बघून कीव आली. खरं तर जातीपेक्षा माणसाची वृत्ती घातक असते. गुरु-शिष्याच्या नात्याला जाती-धर्माचं "वेस्टन' नसते. आजच्या शिक्षकांची भूमिका अनेकांगाने बदलली आहे. संकुचित विचारांची माणसं व्यवसायाच्या परिघावर असतात. आपण आपल्यातील सम्यक सूर्य कुठल्याही स्थितीत डागाळू न देता; स्वतंत्र आकाश जपणं, आजच्या काळात फार मोलाचं झालं आहे.

बऱ्याचदा आम्ही विसरत चाललो आहोत की, आमच्या घरची चूल या फुलांच्या अस्तित्वाशी निगडित आहे. आमचं अंगण यांच्यामुळे चकाकते आहे. घरच्या मुलांचे चायनिज, ब्रेड बटर, बायकोची साडी शाळेतल्या मुलांवर अवलंबून आहे. विद्यार्थी आहेत म्हणून शिक्षकांना किंमत आहे. असे काही निवडक महाभाग असतात, ज्यांच्या चर्चा केवळ पगार, वेतनवाढीपुरत्या मर्यादित असतात. आज अशा मूठभर लोकांमुळे शिक्षणक्षेत्र बदनाम झाले आहे. सानेगुरुजींच्या अंतरंगातली संवेदनशीलता अलीकडच्या गुरुजींच्या अंतःकरणातून पार हद्दपार झाली आहे. समाजात दोन विचारांची माणसे असणारच. आपण त्यांचा आदर करणे आपली अपरिहार्यता आहे. असे असले तरी, वर्तमानातील अंधार दूर करण्यासाठी अनेक उपक्रमशील शिक्षक ग्रामीण भागात नव्या उमेदीने झटत आहेत.

माझ्या नोकरीच्या दोन दशकांत शाळा, भूभाग, गावे बदलली. प्रत्येक शाळेने, तेथील गाव संस्कृतीने नवे अनुभव दिले. प्रत्येक शाळेतल्या मुलांकडून मला बरंच काही शिकता आलं. मी मुलांच्या, शिक्षकांच्या, परिसरांच्या सहवासात घडलो. मागील दोन वर्षांत आदिवासी विकास विभागाने परंपरागत शिक्षणाव्यतिरिक्‍त विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या शारीरिक कौशल्याचा शोध घेऊन, जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची संधी आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. या मोहिमेला "मिशन शौर्य' असे नाव देण्यात आले. सतत दोन वर्षे राबविण्यात आलेल्या या मोहिमेत माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याच्या दोन सुवर्णकन्यांनी आपला ठसा आदिवासी समाजाच्या इतिहासात उमटवला. त्या दोन सुवर्णकन्या म्हणजे मनीषा धर्मा धुर्वे आणि अंतूबाई आनंदराव कोटनाके होय.

विद्यार्थी प्रवेशभरती करताना लांबची गाव घ्यायची, पालकांशी नियमित संपर्क ठेवायचा, आदिवासी समाजसंस्कृती न्याहाळायची, हा आम्हा काही शिक्षकांचा छंद. पाकडीगुडम तलावाच्या सभोवतालची गावं फिरून झाली की, आमचा क्षणिक विसावा मनीषाच्या आठ-दहा घरांच्या झुलबर्डी गावात असायचा. मनीषा पहिलीपासून आमच्याच शाळेची विद्यार्थिनी. तिला इयत्ता 9 ते 10 वी शिकविण्याचे भाग्य मला लाभले. घरची परिस्थिती जेमतेम. ती 2018 मध्ये आमच्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, देवाडा येथे इयत्ता अकरावीत शिकत होती. तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, प्रकल्प अधिकारी डॉ. एम. दयानिधी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वप्नातून 2018 मध्ये साकार झालेला "मिशन शौर्य' उपक्रम. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची चाळणी करून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मनीषा लाजरीबुजरी, हसमुख चेहरा, अत्यंत साधी मुलगी. एक दिवस जगातील उंच शिखर सर करणारी महाराष्ट्रातील पहिली आदिवासी विद्यार्थिनी होईल, असे प्रथमदर्शनी वाटत नव्हते. प्रत्येक चाचणीत ती यशस्वी झाली. अतिशय थंड वातावरण, नैसर्गिक संकटांचा सामना करत 16 मे 2018 च्या सकाळी देशाचा राष्ट्रध्वज मोठ्या डौलात माउंट एव्हरेस्टवर फडकवला. तिची जिद्द आणि मेहनत असंख्य आदिवासी मुलींना प्रेरणादायी ठरली.

आदिवासी विकास विभागाने 2019 मध्ये हाच उपक्रम कायम ठेवला. महाराष्ट्रातून सर्व अनुदानित व शासकीय आश्रमशाळांतून चाळणी, चाचणी घेऊन दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात शासकीय आश्रमशाळा, जिवती येथील अंतूबाई आनंदराव कोटनाके हिने माउंट एव्हरेस्ट 23 मे 2019 ला सर करून माणिकगडच्या परिसराचे नाव रोशन केले. अंतूबाई अत्यंत साधी मुलगी. आई-बाबांचे छत्र तिच्या बालपणी डोक्‍यावरून हरवलेले. तिची उंची बघायला ते हयात नाही याची खंत अंतूला फार सलते. इयत्ता नववीपासून ती शासकीय आश्रमशाळा, जिवती येथे शिकत होती. आत्याने तिचे संगोपन केले. डोंगरावर वसलेले शेडवाही हे तिचे जन्मगाव, तर आसापूर तिच्या आत्याचे गाव. डोंगरांच्या सावलीत उन्ह, वारा सोसून काटक झालेली मुलगी.

मनीषा आणि अंतूबाई या दोघींनी आपल्या आदिम कर्तृत्वाला जागे करून, आम्ही कमी नाही, हे सिद्ध करून दाखविले.
माणिकगडच्या पहाडात उत्तम प्रतीचा सिमेंट दगड सापडतो. दगडाचं सोनं या पोरींनी केलं. प्रत्येक मानवाच्या ठायी नैसर्गिक ऊर्जा वास करून असते. योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाले की, आपसूकच ती तेजोमय होते. माणिकगडच्या परिसरात असे अनेक हिरे संधीअभावी पैलू वाचून अंधारात पडले आहेत.

जिंदगीची पाठशाळा तेवढी शाबूत होती
सोबतीला फाटलेली गोधळी काबूत होती
ना विजेचा खांब होता, ना घराला दार होते
आदमांच्या पाखरांची जिंदगी मजबूत होती
आदिमांनी स्वतःची संस्कृती कायम जपून ठेवली. अंधारात दार नसलेल्या घरांत पशू-पाखरांची शाळा भरवली. भौतिकता नव्हती तोपर्यंत हा समाज सुखी होता. मानवाचा हस्तक्षेप त्यांच्या जंगलात, वस्तीत वाढला. जगाच्या प्रगतीचा कॅनव्हास त्यांनाही कळावा, म्हणून सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू झाले. प्रत्येक क्षेत्रात स्वतःची मोहर उमटवण्याचे कार्य प्रवाहात उशिरा आलेल्या आदिमांनी केले.

आदिवासी मुलांत प्रचंड शारीरिक क्षमता, चपळता असते. गरज आहे ती संधीची. संधी म्हणजे भीक नव्हे. सर्व लहान-मोठे मोती एकत्र आणणारा समानतेचा धागा आहे. समाज विकासाचे अनेक प्रकल्प प्रामाणिकपणे राबविल्यास देशाची प्रगती निश्‍चित होईल. आमच्या विभागाच्या क्रीडा स्पर्धा राज्यस्तरापर्यंत राबविल्या जातात. करोडो रुपयांची नेत्रदीपकता डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. पण, पुढे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना चाल मिळत नसल्याने, डोंगरकपारीत दडलेली प्रतिभा जागतिक होत नाही. अशा क्रीडा स्पर्धा केवळ एक इव्हेंट म्हणूनच मुलांच्या स्मरणात राहतात.
प्रत्येक मानवाच्या ठायी चालण्याचे बळ असते, म्हणूनच अंतरीची कळ सोसण्याचे सामर्थ्य निर्माण होते. प्रत्येकाच्या गळ्यातला सूर ऐकण्यासाठी धरणी आतुर असते. डोंगराच्या पायथ्याशी केवळ दगडांचा खचच नसतो, तर लहान-मोठ्या दगडांना चिरण्याचे कौशल्य घेऊन जन्माला आलेले झरे असतात. तेच तर सागराला मोठे करीत असतात. सागराचे अस्तित्व आमच्या कायम लक्षात राहते. पण, झऱ्यांना विसरून कसे चालेल. मनीषा आणि अंतूबाई डोंगरातल्या सुवर्णकन्या आहेत. ज्यांच्या तेजाने भविष्याच्या गुहेत दडलेली आदिम लेकरं सूर्याची तिरीप घेऊन डोंगरकपारीत उजेड पेरणार आहेत. आम्ही तेवढं या पिढ्यांच्या स्वागताला तयार राहायला हवं. ओंजळीत नदी घेऊन.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com