गुरु बिन कौन बतावे बाट , बडा विकिट यमघाट

यशश्री तापस
Saturday, 4 July 2020

संपूर्ण आयुष्यात जे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, ते आपले गुरू म्हणजे आपले माता, पिता, बंधू आणि आपले परम दैवत आहेत. तसेच अज्ञानरूपी संसाराला समजण्यासाठी तेच ज्ञानमार्ग दाखवितात.
 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात्‌ परब्रह्म , तस्मै श्रीगुरवे नमः ||

आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा. हा दिवस हिंदू परंपरेतील सर्वात महत्वाचा दिवस होय. आजचा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात. महर्षी व्यासांना गुरूंचे गुरू असे म्हणतात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी व्यासपूजन करतात म्हणजेच गुरूंचे पूजन करतात.

हिंदू परंपरेप्रमाणे जीवनात 'गुरू' ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'गुरू' म्हणजे अज्ञानरुपी जीवनात ज्ञानरुपी प्रकाश देणारा व त्या प्रकाशवाटेवर चालण्यात सदैव मदत करणारा , वाटाड्याच जणू !
अज्ञानतिमिरान्धस्य, ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन, तस्मै श्रीगुरवे नमः

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे अनेक लोक आपल्याला भेटतात. ते सर्व आपले गुरू असे मी मानते. कारण त्या प्रत्येकाकडूनच काही ना काही शिकायला मिळते व ज्याच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकतो तो आपला गुरूच नव्हे का ! मग ती व्यक्ती वयाने आपल्यापेक्षा लहान असो की मोठी !

कधीकधी मात्र आपल्या जीवनात असे एखादे वळण येते की ज्या वळणावर आपल्याला समोर मार्गच दिसत नाही. दिसतो तो केवळ अंधकार ! सर्व भौतिक सुखे असूनही निराशा येते. आपल्या भोवताली लोक असूनही एकटेपणा जाणवतो. अनेक प्रयत्न करूनही आपल्या पदरी यश येत नाही. आपले जीवन नकारात्मकतेने भरून जाते आणि अशावेळी एक व्यक्ती आयुष्यात येते व त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने निराश जीवनात आशेची नवी पालवी फुटते. आपल्या जीवनाला कलाटणी मिळते. दिशाहीन झालेल्या आयुष्याला नवी दिशा प्राप्त होते. आपले जीवन नवचैतन्याने भारून जाते जणू !
ही व्यक्ती म्हणजे आपले गुरू.

हे गुरू आपल्याला जीवनातील हरविलेला मार्ग शोधायला मदत करतात. फक्त गुरुंना संपूर्णपणे शरण जावे लागते. त्यातूनच श्रध्दा निर्माण होते आणि गुरुंच्या उपदेशामुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवतात. गुरुंच्या सानिध्यात राहिल्याने मन सकारात्मक उर्जेने व आनंदी विचारांनी भारले जाते. आयुष्याच्या अशा कालखंडात आपल्यावर गुरुकृपा झाली व आपण अनुग्रहीत झालो तर आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते. गुरू अज्ञानरुपी काळोखातून बाहेर काढून ज्ञानरूपी प्रकाशमार्गावर अक्षरशः त्यांच्या हाताला धरून चालवितात.

त्यांनी सांगितलेल्या मार्गावर श्रध्दापूर्वक चालून व त्यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करून आपले ईप्सित नक्कीच साध्य होते. जीवनात आलेल्या औदासिन्यावर आपण सहज मात करू शकतो. आयुष्य परत एकदा आनंदी व सकारात्मक होते. गुरुंचा वरदहस्त असेल तर जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याचे मानसिक बळ मिळते. त्यासाठी सदैव त्यांचे स्मरण व त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप ( गुरु-आज्ञा ) करणे आवश्‍यक आहे.

गुरुमूर्तेः सदा ध्यानं, गुरुमन्त्रं सदा जपेत्‌
गुरुमूर्तिं स्मरेन्नित्यं, गुरुनाम सदा जपेत
त्वं पिता त्वं च मे माता, त्वं बन्धुस्त्वं च देवता|
संसारप्रतिबोधार्थं, तस्मै श्रीगुरवे नम:||

अशी ही गुरुंची किमया ! संपूर्ण आयुष्यात जे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, ते आपले गुरू म्हणजे आपले माता, पिता, बंधू आणि आपले परम दैवत आहेत. तसेच अज्ञानरूपी संसाराला समजण्यासाठी तेच ज्ञानमार्ग दाखवितात.

असा हा गुरुंचा महिमा, अतिशय थोर की ज्याचे वर्णन करायला महाकवींसारख्या शब्दप्रभूंचे शब्दही थिटे पडतील तिथे माझी काय कथा ! माझ्या अल्पबुध्दीने विशद केलेले हे गुरुंचे महत्व, तुम्ही गोड मानून घ्याल असा मला विश्वास आहे. तुमच्यासारख्या थोर विद्वानांना तर यापेक्षाही वेगळे अनुभव आले असतील ! परंतु गुरू आणि गुरुकृपा यांचे महत्त्व लहान-थोर सगळ्यांना सारखेच असते!
म्हणूनच मी गुरुंना आनंदाचे झाड असेच संबोधते. कारण या झाडाच्या सावलीत जो आनंद मिळतो त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. ज्या ज्या वेळी गुरू भेटतात त्या त्या वेळी आम्ही ही सावली अनुभवतो आणि कृतकृत्य होतो !

आजच्या गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपण आपल्या गुरुंचे पूजन करूया व त्यांनी दाखवलेल्या सन्मार्गाची कास कायम धरूया ! या मार्गावर चालून जीवनात निराशा व दुःख यांचा सामना कधीही करावा लागणार नाही.

गुरु बिन कौन बतावे बाट ,
बडा विकिट यमघाट
काम क्रोध दो पर्बत ठाडे
लोभ चोर संघात
बडा विकिट यमघाट
गुरु बिन कौन बतावे बाट  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guru bin koun batave wat