रात्र अंधारी सहलीची

हेमा नातू
शुक्रवार, 11 मे 2018

लहानपणी काही नकळत साहस घडते. करायचे असते एक आणि फसगतीने भलतेच संकट उभे राहते. त्यातून निभावूनही जातो; पण आयुष्यभरासाठी तो धडा असतो.

मी कर्णबधिर आहे. माझे माहेर मुरुड जंजिरा; पण माझे संपूर्ण शिक्षण पुण्यातच मावशीकडे राहून पूर्ण केले. सुदैवाने सासरही पुण्यातच मिळाले.

लहानपणी काही नकळत साहस घडते. करायचे असते एक आणि फसगतीने भलतेच संकट उभे राहते. त्यातून निभावूनही जातो; पण आयुष्यभरासाठी तो धडा असतो.

मी कर्णबधिर आहे. माझे माहेर मुरुड जंजिरा; पण माझे संपूर्ण शिक्षण पुण्यातच मावशीकडे राहून पूर्ण केले. सुदैवाने सासरही पुण्यातच मिळाले.

तर ही जुनी गोष्ट आहे. मी नुकतीच एस.एस.सी. परीक्षा दिली होती. तीन महिने सुटी होती. म्हणून मी गावी मुरुड जंजिरा येथे गेले होते. तिथे माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवत होते. माझी लहान बहीण रश्‍मी तेव्हा सातवीत असेल. तिने आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना सांगून सुटीत पिकनिकला जायचा बेत केला. त्या वेळी परिस्थिती अशी होती, की कोणाकडेही पॉकेटमनी नव्हता की घरून एकत्र गावाबाहेर जाण्याची परवानगी नव्हती; पण सगळ्यांनी आपापल्या घरी, मी ताई असल्याने, माझे नाव सांगून परवानगी मिळवली. मी त्याबाबत अनभिज्ञ होते आणि मी कधीच गावाबाहेर गेलेच नव्हते. त्यातून मला फिरायचेही होते. आमच्या गटामधला मित्र वैभव, त्याला मुरुडच्या आसपासची बरीच माहिती होती. आम्ही एकमताने श्रीवर्धनला जायचे ठरवले. त्यासाठी मुरुड ते राजापुरी एसटीने, मग राजापुरी ते आगरदांडा बोटीने, त्यानंतर आगरदांडा ते श्रीवर्धन एसटीने असा प्रवास होता. दोन ते तीन तासात हा प्रवास करणे शक्‍य होते. त्या काळी थेट एसटी नव्हती. आम्ही सकाळी सात वाजताच निघालो. प्रत्येकाकडे प्रवासापुरतेच पैसे होते. तेही त्या काळी फार होते. आम्ही प्रवास करून श्रीवर्धनला दहा वाजता पोचलो. फिरलो. खूप मजा केली. पोटात कावळे ओरडू लागले. फिरता फिरता वाटेत माझी माईआत्या श्रीवर्धनला राहत होती तिथे गेलो. त्या एकट्याच राहायच्या. त्यामुळे आम्हाला पाहून त्या खूष झाल्या. आत्याने खूप आग्रह करून आम्हाला दहा-बारा जणांना पोटभर जेवायला वाढले. मग त्यांचा निरोप घेऊन परतलो. परतीच्या वेळेत शेवटची बस श्रीवर्धन ते आगरदांडा उशिरा आली. वेळ साधारण पाचची होती. आम्ही आगरदांडाला पोचलो. आगरदांडा बसस्टॅंडपासून जेटी दूर होती. आम्ही भराभरा चालत होतो; पण आम्ही जेटीवर उशिरा पोचलो. शेवटची बोट केव्हाच सुटली होती आणि परत माघारी श्रीवर्धनला जाण्यासाठी एसटीही नव्हती. आमच्याकडे पैसेही नव्हते आणि अंधार पडायला लागला होता. आजूबाजूला एकही हॉटेल वा घरेही नव्हती. फक्त कांदा भज्याचे छोटे दुकान, टपरी तसेच मद्याचे दुकान होते. शिवाय दारूडेही होती. बाजूला भलामोठा समुद्र. दुसरीकडे मोठमोठी झाडे, डोंगर. वीज नव्हती. होता फक्त कंदील. आमची पंचाईत झाली. आमच्या पोटात भीतीचा गोळा उठला. रात्र कुठे घालवायची हेच कळेना. आम्ही लहान पोरं. हे साहस अंगलटी आले होते. सुदैवाने दूर एक घर दिसले. चांगले होते. नुकतेच नवीन बांधल्यासारखे वाटले. तिथे आमच्यापैकी एकाने जाऊन चौकशी केली. आम्हाला बाहेर ओसरीवर रात्रीपुरता आसरा द्याल का? ज्याच्याकडे चौकशी केली, तो कोळी होता. त्याच्या हातात कंदील होता. कंदिलाच्या प्रकाशात तो काळाकभिन्न देह व लालसर डोळे बघूनच आमची बोबडी वळली. त्या काकांनी मोठ्या मनाने आम्हाला घरात घेतले. आम्ही भेदरलेलो होतो. एका मैत्रिणीच्या पोटात दुखायला लागले. एकाकडे जास्तीचे दहा रुपये होते. तेवढीच कांदाभजी आणून आम्ही खाल्ली. गारच होती. काकांनी न मागताही आम्हा सगळ्यांना बिनदुधाचा चहा दिला. हायसे वाटले. घरात त्यांचे कुटुंबही असावे. बाजूला समुद्राची गाज ऐकू येत होती. त्यांच्याकडची परिस्थिती जरा बेताची होती, हे जाणवत होते म्हणून आम्ही खोटे सांगितले की आमचे जेवण झाले आहे. त्यांनी मधूनमधून हास्यविनोद करून ताण कमी केला. आमच्या झोपण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही न मागताही बाहेर ओसरीवर गाद्या आणून दिल्या. विशेष म्हणजे कंदीलही बरोबर होता. वर आकाशात चांदणे दिसत होते. शिवाय काका पत्ते घेऊन आले. जेवलो नसल्याने झोप लागणे कठीण होते. काका आणखी दोन-तीन मित्रांना बोलावून तासभर आमच्याबरोबर पत्ते खेळत बसले. त्यामुळे आम्ही सावरलो. नंतर झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी काकांच्या पत्नीने चहा दिला. तोंड धुण्यासाठी आम्ही बाथरूममध्ये गेलो. पुरेसे पाणी नव्हते. त्यांना दुरून सायकलवरून पाणी आणावे लागत होते. तरीसुद्धा काका व त्यांच्या पत्नी घरच्या मायेने आम्हाला सगळे देत होते. आम्हाला आमची लाज वाटली. परतताना काकांनी आम्हाला बजावले, पुन्हा अशी चूक करू नका. त्यांचे आभार मानायचे राहून गेले.

ही गोष्ट त्या वेळी आम्ही घरी सांगितली नव्हती. कारण, भीती वाटत होती, पुन्हा सहलीला सोडणार नाही याची आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी "सिक्रेट' राखले. आता मोठे झाल्यावर जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा हसू येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hema natu write article in muktapeeth