आजी ऑनलाइन

हेमलता अच्युत भालेराव
बुधवार, 24 जानेवारी 2018

नवरा गेलेला. एक लहान पोर पदरात. परिस्थितीनं घेरलेलं. त्यात पाटलाच्या अनुचित बोलांनी ती वाघीण खवळली. गावगाड्याच्या कामाला लागली. पण कुणापुढे झुकली नाही.

नवरा गेलेला. एक लहान पोर पदरात. परिस्थितीनं घेरलेलं. त्यात पाटलाच्या अनुचित बोलांनी ती वाघीण खवळली. गावगाड्याच्या कामाला लागली. पण कुणापुढे झुकली नाही.

सध्या सगळीकडे "ऑनलाइन'ची गंमत सुरू आहे. हातातील मोबाईलवर इंटरनेट आल्यापासून तर बहुतेकजण चोवीस तास ऑनलाइन असतात. हा "कनेक्‍ट' वाढला आहे. पूर्वीच्या काळी महिनोन्‌महिने परस्परांची हकिकत कळायची नाही. आता एका रिंगबरोबर संपर्क होतो. आमची आजी ऑनलाइन आहे, त्याची गोष्ट थोडी वेगळी आहे. माझी आजी शतायुषी होऊन "ऑफ' झाली. लक्ष्मीबाई बापूसाहेब गायकवाड, मुक्काम पोस्ट तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आजी ऑफ आता सुमारे चाळीस वर्षे झाली असली तरी आमच्यासाठी ती आठवणींच्या माध्यमातून सदैव ऑनलाइन आहे.
तिचे नातू, नाती, पणतू, खापरपणतू आणि आता खापरखापरपणतू या नात्याशी ती ऑनलाइनच आहे. तिच्या आठवणी फार मजेशीर आहेत. ती शंभरीला पोचली तरी तिला सागुती लागायची. सागुतीचे कोरड्यास तिला फार आवडायचे. आमच्या घरात जत्रेखेत्रेला किंवा कुणी पै पाहुणा आलाच तर घरच्या कोंबडीचा बेत व्हायचा. तिला वयामुळे कोणी मांसाहार नको म्हटला की, खूप राग यायचा. ती म्हणायची, ""तुमी खावा गवतपाला. म्या न्हायी खायची. म्या वाघीण हाय!''

ती आसपासच्याही कुणाकडून वाटीभर सागुतीचा सावना मागायची. कुणाच्या घरात मटण शिजत असेल अथवा कुणी वागर घेऊन सशाच्या शिकारीला निघाला असेल तर म्हणायची, ""माझ्यासाठी वाटीभर कोरड्यास पाठवा बरं!'' तिला कधी याचा त्रास झाला नाही. दगडमाती पचवायची तिची पचनसंस्था.
मी अधूनमधून शाळा बुडवत असायची. तिला माझी लबाडी समजली होती. डोके दुखण्याचे मी कारण सांगत असे. ती एकदा म्हणाली, "डोकं दुखण्याची वहिवाट पडण्याआधी कायतरी विलाज कराया होवा.''
एक दिवस शाळा बुडवल्यावर तिने मला ओसरीवरच्या उन्हात पोत्यावर झोपवले आणि माझ्या उशाशी पाट्यावर दामुके वाटत बसली. अतीव कष्टाने तिने दामुक्‍यांचा मऊ गोळा तयार केला. आधीच त्या उग्र वासाने, घाणेरड्या दर्पाने मी गुदमरून गेले होते. आजीने माझ्या कपाळभर दामुक्‍यांचा वाटलेला गोळा लावला. म्हणाली, ""सुर्व्या जसा जसा वर येईल तसा तसा तुझ्या डोकेदुखीला उतार येईल.'' त्या दिवसापासून मॅट्रिकपर्यंत मी माझे डोके कधीच दुखू दिले नाही.

एकदा थंडीच्या दिवसात आईने चुलीवरचे गरम गरम उकळते माडगे आजीला मोठ्या ताटात वाढले होते आणि ओसरीवरच्या कडब्याच्या वैरणपेंडीतला एक भला मोठा साप माळ्यावरून तिच्या ताटात धपकन पडला. आम्ही घाबरून वाचाहीन झालो. पण आजीने तो साप दोरी फेकावी तसा सहज अंगणात फेकला आणि पुढच्या क्षणी काहीच झाले नाही अशाप्रकारे तेच माडगे पिऊ लागली. तिचा थोरला नातू तिला म्हणाला, ""अगं आजी, तो साप होता. फेकून दे ते माडगं.'' आजी म्हणाली, ""त्येला काय झालं. साप इशारी आन्‌ माणसाला काय अमुरताचा लेप लावलाय का?''
असेच एकदा तिच्या अंगाखाली रात्री सापाचे पिलू मरून बिछान्यावर पडलेले मोठ्या वहिनीने पाहिले. आजीला सांगितले तर, ती मुंग्या चावल्याप्रमाणे सहजच म्हणाली, ""तरी म्या म्हणते, रातभर मला काय चचाऊन चचाऊन घेतंय!'' हे ऐकून धास्तावलेली आम्हीच चकीत झालो.

आजीच्या मजेशीर गोष्टी, तशाच बाईपणाच्या वेदनेच्या अनेक गोष्टी आहेत. ऐन तारुण्यात एक मुलगा पदरात देऊन तिच्या पतीचे निधन झाले. काही दिवसांतच पाटील घरी आला आणि म्हणाला, ""लक्षुमी गावकीचं काम कोण करणार? तुझ्या वाट्याच्या कामाला दुसरं कोनी हात लावत नाही.'' आजी म्हणाली, ""पाटील, लेकरू तान्हं हाय. थोडी सवड द्या.'' पाटील म्हणाला, ""मंग दुसरा पाट लाव.'' त्या शब्दांनी आजी चवताळली. त्या दिवसापासून खमकी झाली. पोराला शिकवायचे होते. घडवायचे होते. ती पुन्हा गावगाड्याच्या कामाला लागली. कधी कधी बटवडा घेऊन वाईलाही जायची. एकदा पंचनामा केलेले प्रेत घेऊन भोरला जायचे काम तिच्यावर आले. वेळ रात्रीची होती. तिने कासोटा घातला, पदर खोचला, मढे उचलून बैलगाडीत टाकले आणि निघाली. खाचखळग्यातून जाताना मढे हलायचे, गडबडायचें आणि तिच्या पाठीला धपकन टेकायचें. ती घाबरली नसेल का? परिस्थितीचा तिला राग आला नसेल का?
परंतु तिला पाटलाचा शब्द जिव्हारी लागला होता. तिचा मुलगा, माझे वडील, शिकले. आंबेडकरी चळवळीने प्रेरीत झाले. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, या ध्येयाने ते भारावून गेले, आम्हाला शिकविले. सन्मानाने वागण्याची डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा आमच्यामधे रुजवली. उभ्या पंचक्रोशीत सर्वप्रथम गावकीची कामे झुगारून देणारे ते प्रथम अनुयायी ठरले.

एक दिवस आजी आपल्या मुलाला म्हणाली, ""सुदामा, त्या आंबेडकरबाबांना आपल्या घरी बोलव, नाहीतर मला त्येच्याकडं घेऊन चल. त्याच्या पाठीवर मला हात फिरवायचा आहे.''
तिच्या या आठवणी अजून कथन करतो आम्ही. आजी आजही ऑनलाइनच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hemlata bhalerao write article in muktapeeth