पावसाळ्यातला हिमालय

मृणाल वैद्य
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

समोरचा पर्वतकडा रस्त्यासह दरीत कोसळत होता. आता आपली गाडी त्या वळणावर असती तर? ...भीतीची नागीण कण्यातून मेंदूपर्यंत सळसळत गेली.

समोरचा पर्वतकडा रस्त्यासह दरीत कोसळत होता. आता आपली गाडी त्या वळणावर असती तर? ...भीतीची नागीण कण्यातून मेंदूपर्यंत सळसळत गेली.

जोशीकुंडकडून परतीच्या वाटेवर होतो. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड येथील हिमालयीन सौंदर्य मनाला अजून मोहवत होते. पावसाळ्यातील बेफाम गंगा नजरेसमोरून दूर झाली नव्हती. एकामागोमाग एक लयीत गाड्या चालल्या होत्या. तोच अचानक गाड्या थांबल्या. काही तरी मोडून पडत असल्याचा आवाज ऐकला. गाडी थांबताच, उडी मारतच खाली उतरले आणि आवाजाच्या दिशेने धावले. वळणावर पोहोचले. पुढच्या वळणावर धडाधड पर्वत कोसळत होता. कोसळण्याचा वेग इतका होता की वरून कोसळणारे दगड-गोटे, माती आपल्याबरोबर आख्खाच्या आख्खा रस्ता घेऊन दरीत कोसळत होते. आपल्या पायाखालचा हिमालय भुसभुशीत असल्याची जाणीव पहिल्यांदाच झाली.

व्हॅली व हेमकुंड पाहून परत येतानाचा हा अनुभव. अतिपावसामुळे ऋषीकेशपर्यंत गाड्या जाऊ शकणार नव्हत्या. साधारण तीन-चार किलोमीटर चालावे लागणार होते. सामान घेऊन. तिथून दुसरी गाडी मिळणार होती. पण अर्धवट कोसळलेल्या, चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून जड ओझे घेऊन चालणे कसे जमणार होते, कोणास ठाऊक. तीन-चार किलोमीटर गेल्यावर अचानक जीप थांबली. पुढे एक दोन ट्रॅक्‍स उभ्या होत्या. गाडी थांबवून आम्ही खाली उतरलो. धावतच पुढच्या वळणावर गेलो. आश्‍चर्य आणि भीतीमुळे तोंडाचा "आ‘ झालेला. पाहतच राहिलो. समोर हिमालयाचा कडा तुटून कोसळत होता. भानावर आलो तेव्हा पहिला विचार मनात आला, आपली गाडी त्या वळणावर असती तर? भीतीची नागीण कण्यातून मेंदूपर्यंत सळसळत गेली.

पुढे काय? चमोलीपर्यंत पोचणे फारच अवघड होते. एक-दोन स्थानिक लोक होते सोबत. त्यांनी या पर्वतावरून पलीकडच्या बाजूने एक पायवाट असल्याचे सांगितले. सामानाच्या चार जड बॅगा आम्हा दोघांकडे होत्या. समोर उंच हिमालय पर्वत. रस्ता चार दिवस तरी तयार होणार नव्हता. दोन दिवसांनंतरचे आमचे पुण्याचे तिकीट काढलेले होते. पायवाटेने जाण्यावाचून पर्याय नव्हता. पाठीवर जड सामान घेऊन चढ चढणे काय असते ते त्या दिवशी समजले. बरोबरचे लोक तिथे राहणारेच असल्याने भराभर पुढे निघून गेले. निर्जन एकाकी अनोळखी वाटांवरून दमलेले, थकलेले आम्ही थांबत थांबत चढत राहिलो. पाऊस थांबून आता ऊन तापू लागले होते. वाटांवर निसरडे होते. पाय घसरत होते. कितीही चढलो तरी चढण संपत नव्हती. आता मागे फिरणेही अशक्‍य होते. रडत-खडत आम्ही पर्वतमाथ्यावर पोचलो. थोडी विश्रांती घेतली. आता आडव्या पायवाटेने एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीवर जायचे होते. अती उंचावरून, अरुंद अशा वळणावळणाच्या वाटेवरून आम्ही चालायला सुरवात केली. इतक्‍या उंचीवरून आम्ही चालत होतो, की खाली नजर टाकली तरी डोळे फिरत होते. अतिउंचीवरची अरुंद पायवाट, पाठीवर नि हातात सामानाचे ओझे, उजव्या हाताला अतिशय खोल दरी. पाय निसटला, तोल गेला, तर खोल दरीतच कोसळणार होतो. निशब्द राहून पूर्ण एकाग्रतेने आमची दोघांची वाटचाल सुरू होती. हळूहळू डोंगरमाथ्यावरची ही वाटचाल संपली. आम्ही सुटकेचा निश्‍वास टाकला. कारण आता फक्त उतार उतरला की आम्ही रस्त्यावर येणार होतो, तेथून आम्हाला एखादे वाहन मिळणार होते.

आता त्रास संपला असा विचार मनात येतच होता, उतरायला सुरवात केली नि लक्षात आले, की हा हिमालयाचा अतितीव्र उतार आहे. व्यवस्थित पायवाटही नाही, वेडीवाकडी झुडपे वाढलेली. त्यातली अनेक झुडपे काटेरी. मार्गावर गवत वाढलेले. आधीच्या दोन-तीन दिवसातील पावसामुळे मातीपण निसरडी झालेली. पाठीवरच्या सामानासकट या मार्गाने उतरणे हे एक भयानक दिव्य होते. पाय घसरत होते, मोठमोठे दगड निसरडे झाले होते, गवतामुळे पाऊल टाकण्याचा अंदाज येत नव्हता. अनेकवेळा पाय खड्ड्यात जात होता. एकमेकांना आधार देत, गवताला पकडत, घसरत काटेरी झुडपांपासून बचाव करत आम्ही उतरत होतो. आता उतार संपता संपत नव्हता. किती खाली उतरायचे आहे, याचा अंदाज येत नव्हता. धडपडत, ठेचकाळत, घसरत, काटेरी झाडांमुळे ओरबडले जात, आम्ही खाली उतरत होतो.

आता या बाजूने वर चढू लागलेले लोक दिसू लागले. पाठीवर सामान घेऊन बायका, मुले, वयोवृद्धांसकट हे सारेजण पर्वतकडा चढून येत होते. आता आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यात होतो. मनाला उभारी देत देत आम्ही कसेबसे रस्त्यापर्यंत आलो आणि रस्त्यावरच बसकण मारली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Himalay monsoons