इव्हेंटच्या प्रेमात पडलेले भारतीय जनमानस

आकाश नवघरे
सोमवार, 1 जून 2020

घटना (Event) ही एका विशिष्ट मर्यादित वेळेला घडते आणि त्यातून काहीतरी अपेक्षित असतेच असे नाही. बरेचदा काहीही समोर-मागे नसतानाही घटना घडवल्या जातात वा साजऱ्या केल्या जातात.

गेल्या काही वर्षांपासून लोकांचा किंवा कमीतकमी भारतीय लोकांचा तरी कल हा विशिष्ट प्रकारच्या होणाऱ्या घटनांच्या (Events) बाजूने जास्त दिसतोय आणि हा प्रकार चोहीकडे आहे. सरकारी यंत्रणा, खासगी कंपन्या, निवडणुका, सामाजिक संस्था आणि इतरत्रही. जणूकाही समाजाला मोठमोठ्या आणि सतत घडणाऱ्या घटनांची भूल पडली आहे किंवा सवय झाली आहे.
घटना (Event) ही एका विशिष्ट मर्यादित वेळेला घडते आणि त्यातून काहीतरी अपेक्षित असतेच असे नाही. बरेचदा काहीही समोर-मागे नसतानाही घटना घडवल्या जातात वा साजऱ्या केल्या जातात. मागील कित्येक वर्षांपासून कुठल्या तरी प्रक्रियेचा भाग म्हणून किंवा प्रक्रियेचे फलित म्हणून घटना घडायच्या किंवा साजऱ्या केल्या जायच्या. त्यामुळे त्यामागे काही कारणे असायची आणि त्यातून काही तरी अपेक्षित असायचे. पण, आता असे दिसत नाही. प्रक्रियेला डावलून उथळ घटनांना जास्त महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमुळे सुटणारे प्रश्न किंवा प्रक्रियेमुळे वाढणारी क्षमता आणि होणारी प्रगती हे दिसत नाही. प्रक्रियेतील प्रश्नांचे किंवा समस्यांचे भांडवल करून घटनेला भव्य-दिव्य रूप देण्याचा प्रयत्न मात्र सतत होत असतो. कुठलेतरी एक शाब्दिक भूषण वापरून घटनांचा इतका गाजावजा होतोय की, जणू ज्या प्रश्नासाठी किंवा समस्यासाठी हा खटाटोप सुरू आहे तो लगेच सुटलाच समजा.
ध्वनिप्रदूषण कमी व्हावे म्हणून बऱ्यांच संस्था आणि लोक "हॉर्न नको'चे फलक घेऊन चौकाचौकांत दिसतात. हा सर्व प्रकार मोडतो एका विशिष्ट घटनेमध्ये. ज्याचा दीर्घकालीन उपयोग होईल किंवा वाहनचालक हॉर्न वाजवणार नाही याची शक्‍यता खूपच कमी असते. कारण त्यामागची संपूर्ण लोकशिक्षणाची प्रक्रिया ही पुरेशी नाही. सामान्य जनतेला साधे वाहतुकीचे नियम माहिती नसतात त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे आणि इतरांनी हॉर्न वाजविणे ही साखळी निरंतर चालूच राहील जोपर्यंत आपण मूळ प्रश्नावर काम करणार नाही. याचप्रकारे प्रक्रिया डावलून घटनांच्या मागे धावायची पद्धत आता सर्वच क्षेत्रात रुजली आहे. त्यामुळे विविध कार्यक्रम, शिबिरे, यात्रा अशा प्रकारच्या घटनांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन आता पूर्वीपेक्षा जास्त होताना दिसते. विशेषतः युवावर्गातील एका मोठ्या घटकाचा कल हा प्रक्रियेकडे नसून घटणे(Event) कडे आहे. कारण हा प्रसिद्धी मिळवायचा अगदी सोपा आणि सहज शक्‍य असणारा मार्ग आहे.
शहरे आणि गावे अशी वर्गवारी प्रस्थापित झाल्याने दिवसेंदिवस गावखेड्यात उपजीविकेची साधने कमी होत चालली आहे. परिणामी लोकांचे शहराकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत गावातच लोकांना रोजगार मिळेल, या हेतूने बऱ्यांच संस्था आणि व्यक्ती काम करत असतात आणि ती एक लांबलचक प्रक्रिया असते. अगदी एका रात्रीमध्ये लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटत नसतो किंवा रोजगारासाठी लागणारे कौशल्य अवगत होण्याकरिता एक कालावधी लागतो. या संपूर्ण प्रक्रियेतून गेल्याशिवाय पुढे फार काही होऊ शकत नाही. याउलट गावातील लोकांची अवस्था बघून काही लोक त्यांना सरळ एकदा वस्तुरूपात मदत करतात. पण, याप्रकारे एकदा केलेल्या मदतीच्या कार्यक्रमाने प्रश्न सुटतो काय, तर बिलकुल नाही.
अशीच अवस्था आहे ती शेतकरी बांधवांची. शेतकरी शेतात राबून आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो आणि त्या अन्नाच्या आधारे आपण जिवंत असतो. ही अन्न पुरवून जगाचे भरणपोषण करण्याची एक मोठी निरंतर प्रक्रिया कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पण, एखाद्या रुग्णाला औषध देऊन जेव्हा डॉक्‍टर त्याला ठीक करतो किंवा त्याचे प्राण वाचवतो तेव्हा डॉक्‍टरला चक्क देवासारखी वागणूक मिळत असते. याउलट जो शेतकरी बांधव आपल्याला एका प्रक्रियेमार्फत जिवंत ठेवतो त्याला सन्मानजनक वागणूक कधीच मिळत नाही. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस आपण बनविलेल्या वर्गवारीने सामाजिक आणि आर्थिक खड्ड्यात ओढला जातोय. एकदा प्राण वाचवणे किंवा सामग्री पुरवणे ही एक घटना आहे आणि निरंतर रोजगार आणि अन्न पुरविणे ही एक प्रक्रिया.
याच धर्तीवर सध्याचे सरकार काम करत आहे. मोठमोठ्या घटना (Events), भरपूर जाहिरातबाजी, भपकेदार नावे यावरच जास्त भर दिला जाताना दिसतो आहे व घटना घडली म्हणजे काम झालेच; असा लोकांना समज द्यायची किंवा आभास करून देण्याची ही उत्तम प्रणाली आहे. या सर्वांची सांगड घालून लोकांना आवश्‍यक असलेल्या प्रक्रियेपासून भरकवटायच आणि विविध घटनांमध्ये गुंतवून ठेवत सरकार चालवायचं हीच जणू यशाची गुरुकिल्ली झाली आहे.

शेवटी काय तर, आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians are in love with events