esakal | क्षुल्लक स्वार्थाला बळी पडू नये
sakal

बोलून बातमी शोधा

ipl.

कामगिरीसाठी संघाची किंवा संघातील खेळाडूंवर टीका करणे समजण्यासारखे आहे. पण एका व्यावसायिक संघाच्या पराभवाबाबत इतके वाईट वाटणे आणि त्यामुळे खेळाडूंच्या घरच्यांना धमकी देणे हा सर्वच प्रकार आज आपण कुठल्या प्रकारच्या समाजात राहतो याची जाणीव करून देतो.

क्षुल्लक स्वार्थाला बळी पडू नये

sakal_logo
By
आकाश नवघरे

गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण भारतात इंडियन प्रिमिअर लीगचा धुमाकूळ दिसतोय. युरोपियन फुटबॉलच्या धर्तीवर भारतात सुद्धा शहरानुसार व्यावसायिक तत्त्वावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली. विविध शहरांनुसार संघ व खेडाळू वाटले गेले. हा पूर्ण प्रकार अगदी व्यावसायिक तत्त्वावर सुरू आहे. यात देशाचा अभिमान किंवा शहराचा अभिमान वगैरे काहीच नाही. केवळ मनोरंजन हा हेतू लक्षात घेऊन या लीगचे आयोजन केले जाते.

गेल्या आठवड्यात चेन्नई आणि कोलकाता या दोन संघात एक सामना झाला व कोलकाता संघाने चेन्नई संघावर मात केली. चेन्नई संघाचा कर्णधार आहे महेंद्रसिंह धोनी व त्याला पाच वर्षाची छोटी मुलगी आहे. हा पराभव काही लोकांनी इतका मनावर लावून घेतला की चक्क धोनीच्या मुलीला सार्वजनिकरीत्या नको त्या धमक्या देण्यात आल्या. कामगिरीसाठी संघाची किंवा संघातील खेळाडूंवर टीका करणे समजण्यासारखे आहे. पण एका व्यावसायिक संघाच्या पराभवाबाबत इतके वाईट वाटणे आणि त्यामुळे खेळाडूंच्या घरच्यांना धमकी देणे हा सर्वच प्रकार आज आपण कुठल्या प्रकारच्या समाजात राहतो याची जाणीव करून देतो.

गेल्या काही वर्षापासून नको त्या खालच्या पातळीवर जाऊन धमक्या देण्याच्या प्रकारांमधे प्रचंड वाढ झाली दिसत आहे. प्रसिद्ध असलेल्या लोकांनासुद्धा असल्या प्रकाराला नेहमीच सामोरे जावं लागतं, विशेषकरून महिलांना. जेव्हा प्रसिद्ध आणि शक्तीशाली लोकांनासुद्धा याला तोंड द्यावे लागते तर सामान्य लोकांची आणि विशेषकरून सामान्य मुली व महिलांची काय अवस्था होत असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. आश्चर्य म्हणजे हे सर्व प्रकार दिवसेंदिवस अगदी सामान्य होत चालले आहेत. पण असे का व्हावे? गेल्या काही वर्षात असे काय घडले की ज्यामुळे ही बाब अगदी आता अगदी सामान्य, नेहमीची वाटते? आपण एक समाज म्हणून कुठे चुकलो का?

कुणीही क्षुल्लक कारणांसाठी लगेच इतक्या खालच्या खालच्या स्तरावर जाऊन कुणालाच धमकी देऊ शकत नाही. क्वचितच एखादा मनोरुग्ण किंवा माणुसकी नसलेली व्यक्ती अशाप्रकारे वागू शकते. पण इतक्या सहजरीत्या अनेक लोकांकडून येणाऱ्या अशा धमक्या हे त्यांना कुठल्याच प्रकारची भीती शिल्लक राहिलेली नाही याचे प्रतीक आहे.

धोनीसोबत जे काही घडले ते आपल्या देशात प्रथमच घडत आहे असं नाही. एका मोठ्या राजकीय पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या लोकांकडून हे वारंवार केलं जातं. तोच राजकीय पक्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये धोनीला त्यांचा उमेदवार बनवू इच्छित होता आणि त्याने निवृत्ती पत्करल्या नंतर पुन्हा त्याला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार बनवू इच्छित आहे. जेव्हा एक मोठा राजकीय पक्ष अशा वर्तनाला अभय देतो आणि धोनीसारखे शक्तीशाली मंडळी फक्त गप्प बसून बघ्याची भूमिका घेतात तेव्हा हा सर्व प्रकार त्याच्या व त्याच्यासारख्या इतर लोकांच्या अंगावर येणार हेही तितकेच खरे. देशात इतरत्र जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडत होत्या तेव्हा जर धोनीने त्यावर टीका केली असती तर कदाचित त्याला अशी वेळ बघायला मिळाली नसती.

या धोनी प्रकरणातून आणि अशा बऱ्‍याच अनुभावातून हा प्रश्न निर्माण होतो की ‘आपल्याला आपला मोठा स्वार्थ का दिसत नाही?’ की आपण छोट्या आणि क्षुल्लक स्वार्थासाठी भविष्यावर घाला घालतो ? कुणाच्या भावना दुखावू नये किंवा कुणाला वाईट वाटू नये म्हणून का नेहमीच सत्याला कानाडोळा करायचा ? माझा मित्र, माझा भाऊ, माझा मुलगा फक्त यांचाच विचार करून का आपण नेहमी समाजात सत्तेची, संपत्तीची, शक्तीची असमानता निर्माण करतो? विविध प्रकारच्या असमानतेने, अशांततेने, द्वेषाने ग्रासलेल्या समाजात कुणीच सुरक्षित राहू शकत नाही. धोनी, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल ही याची उदाहरणे आहेत. सत्ता, संपत्ती आणि इतर बाबी क्षणिक आनंद देऊन जातात पण आला खरा स्वार्थ स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न, शांतिप्रिय समाज, सामाजिक आणि आर्थिक समानता यामध्येच आहे. त्यामुळे नेहमीच क्षुल्लक स्वार्थाला बळी न पडता कधीतरी मोठा स्वार्थ लक्षात घेऊन पण विचार आणि कृती करण्याची गरज आहे.