बिन मॉंगे मिले मोती

जया जोग
बुधवार, 20 जून 2018

शिवरंजनीला रेल्वेच्या शिट्ट्यांची दाद मिळाली, तर अनाथघरच्या मुलींनी सुंदर नृत्य सादर करीत दाद मिळवली. कलावंतांना अनपेक्षितपणाला सामोरे जावे लागते, त्यातून आनंदाचे क्षण ओंजळीत पडतात.

शिवरंजनीला रेल्वेच्या शिट्ट्यांची दाद मिळाली, तर अनाथघरच्या मुलींनी सुंदर नृत्य सादर करीत दाद मिळवली. कलावंतांना अनपेक्षितपणाला सामोरे जावे लागते, त्यातून आनंदाचे क्षण ओंजळीत पडतात.

आगरतळ्याच्या गणपती उत्सवात सतारवादन सादर करण्यासाठी निघाले. विमानतळावरून बाहेर पडून आगरतळ्याच्या रस्त्याला लागलो आणि समृद्ध, संपन्न, हिरव्यागार निसर्गाने आम्हाला कवेत घेतले. गेस्ट हाउसवर जाऊन थोडी विश्रांती घेतली. गणेश तनवडे यांच्या तबल्याबरोबर थोडा सराव केला. मग आम्ही ओएनजीसी मुख्यालयात पोचलो. तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांशी अनौपचारिक गप्पा सुरू झाल्या. ते सांगत होते, ""अब काफी अच्छे है हालात! शुरूशुरू में नक्षलाइटस्‌ के साथ बहुत हाताबयी होती थी। हमारा पुरा काम बहुत जोखीम का होता है और इसलिये ये सब सुरक्षित रखना बेहद्द जरुरी होता है। इस वजह से हमारे गार्डस्‌ पर हमेशा बहुत तनाव रहता है। गार्डस के साथ उनका परिवार भी इसी तनाव की छाया में रहता है। ऐसे हालात में अगर अच्छा संगीत सुनने को मिले तो ये तनाव काफी कम हो सकता है।''
""...जी, बिलकुल! मैं अपनी तरफ से पुरी कोशिश करुंगी। ...मी त्यांना आश्‍वासन दिले आणि मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली, देवा माझ्या सुरांना ताकद दे.
प्रशस्त मांडवात श्रोतृवर्गाची गर्दी. एका बाजूला कलात्मक सजावट केलेला मंच. छान वाटले... पण काही क्षणच! निम्म्याहून जास्त श्रोते म्हणजे बारा वर्षांखालची मुले आणि त्यांच्या आया! मुलांची आपपसात मारामारी, शिवाशिवी आणि बायकांच्या शिळोप्याच्या गप्पा. मी आणि गणेशने एकमेकांकडे पाहिले. ... निभावून न्यायचे, असे इशारे केले. रागेश्रीची आलापी थोडक्‍यात करून लवकरात लवकर तबल्याबरोबरचे वादन सुरू केले, तेव्हा कुठे ती मुले जरा सावरून बसली. सगळ्यांची खरी दाद मिळाली ते झाले तबल्याबरोबरचे सवाल-जवाब यांना! टाळ्यांच्या गजरात रागेश्रीची सांगता झाली. दुसरी रचना शिवरंजनीमधली होती. आता बऱ्यापैकी शांतता. शिवरंजनी छान आकार घेऊ लागला. मला त्या सुरांची सखोल जाणीव होऊ लागली. काहीच मिनिटे अशी शिवरंजनीमय गेली आणि रेल्वे इंजिनाची कर्कश्‍श शिट्टी शिवरंजनीला आरपार भेदून गेली. त्याकडे दुर्लक्ष करत मी पुन्हा एकाग्र व्हायचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात पुन्हा दुसरी शिट्टी. मग मात्र मलाच हसू यायला लागले. इंजिनच्या शिट्ट्यांचे पार्श्‍वसंगीत लाभलेला तो शिवरंजनी मात्र केवळ अविस्मरणीय ठरला!

ज्यासाठी मी एवढ्या दूर आले तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता. सतारवादनाच्या आर्धी तीन "डान्स' होणार होते. गणपती उत्सवातले डान्स, तेही आगरतळासारख्या गावातले! मी मनाची तयारी केली. नृत्य-कलाकार अनाथाश्रमातल्या मुली होत्या. मी जरा सावरून बसले. अवाक होऊन बघतच राहिले. बारा-तेरा वर्षांच्या आठ मुली डौलदार पावले टाकत आल्या. त्यांनी आत्मविश्‍वासाने घेतलेली "एंट्री', त्यांच्या सुडौल हालचाली, अभिनयसंपन्न हावभाव, अभिरुचीपूर्ण देहबोली, आकर्षक तरीही शालीनता जपणारी वेशभूषा सगळे इतके देखणे होते म्हणून सांगू! शास्त्रीय नृत्यावर आधारित रचना सादर करणाऱ्या या मुली बघून डोळ्यांना अक्षरशः थंडावा मिळाला. मला आयोजकांचेंही खूप कौतुक वाटले. आपल्या आनंदात समाजाच्या या घटकांना सामील करून घेऊन प्रोत्साहन देणे या त्यांच्या कल्पनेला मी मनोमन सलाम केला. मी माझ्या मनोगतात या भावना व्यक्त केल्या. नंतर माझा कार्यक्रम किरवाणी-काफी-भरवी असा छान चढत गेला.

गप्पांच्या ओघात मी त्या मुलींच्या नृत्याचे खूप कौतुक करत होते. तेव्हा कळले, की ही मूळ कल्पना विजय पाटील यांची! "अनाम प्रेम' या मला नव्यानेच परिचित झालेल्या एका अनोख्या परिवाराचे पाटील कुटुंबीय सदस्य आहेत. "सर्वत्र प्रेम शिंपित जा' असा महत्त्वाचा संदेश हा परिवार देतो आणि स्वतः आचरणात आणतो. आपल्या आयुष्यात मोलाची साथ देणारे, पण सदैव दुर्लक्षित असणारे समाजाचे घटक म्हणजे रिक्षाचालक - नर्सेस - पोस्टमन - बस ड्रायव्हर्स - रेल्वे कर्मचारी - हमाल - वगैरे! सणासुदीच्या दिवशी "अनाम प्रेम' परिवार या घटकांना भेट देतो. सैनिक - पोलिस यांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. एवढेच नव्हे तर मतिमंद - तृतीयपंथी - वेश्‍यांची मुले यांच्यासाठी मेळावे घेतले जातात. त्यात त्यांना चांगले विचार ऐकवले जातात. चांगल्या संगीताचे संस्कार त्यांच्यावर केले जातात. कुटुंबातल्या लहान मुलांसकट सगळे जण या सर्व कार्यक्रमात सहभागी होतात. त्यामुळे अनाम प्रेमची पुढची पिढीसुद्धा सुसंस्कारी घडते आहे!

अशा परिवाराशी जोडली गेले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजत होते. तेवढ्यात श्री. पाटील म्हणाले, ""ताई, परवानगी आली बरं का! उद्या बीएसएफमध्ये कार्यक्रम!'
आनंदातिशयाने माझ्या तोंडून शब्द फुटेनात. म्हणतात ना - "बिन मॉंगे मिले मोती...'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jaya jog write article in muktapeeth