परदेशात हरवतो तेव्हा...

परदेशात हरवतो तेव्हा...

परदेशात अचानक वेगळाच मार्ग आपल्याला सुचवला जातो. आपल्यालाही त्यातील थ्रिल त्या मार्गावर जायला लावते. पण जोशात सुरू केलेल्या प्रवासात काहीतरी चुकते आणि मग थ्रिलची जागा चिंता घेते.

आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो. मेलबर्नहून सिडनीला जायचा बेत होता. संध्याकाळी साडेसात वाजता ट्रेन होती. आरक्षण आधीच झालेले होतं. ट्रेन सकाळी सात वाजता सिडनीला पोचणार होती. तेथे उतरून, टॅक्‍सी करून, हॉटेलवर जाऊन, सामान क्‍लोकरूमला ठेवून, साडेसातला सिडनी दर्शनची बस गाठायची होती. हा सर्व कार्यक्रम आम्ही केवळ पंचवीस मिनिटांत आटोपला. त्यामुळे आत्मविश्वास जरा जास्तच वाढला असावा. बहुधा त्यातच पुढील घटनेची बीजे रोवली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी "ब्ल्यू माउंटेन्स"ची सफर ठरली होती. सुदैवाने हवा उत्तम होती. तेथील प्रदूषणमुक्त हवेमुळे डोंगराची निळाई केबलकार मधून तसेच पायी फिरून मनसोक्त अनुभवली. असे सौंदर्य बघायला मिळाले या आनंदात भान हरपून गेले. भरीत भर म्हणजे आमचा वाटाड्याही छान गप्पीष्ट व विनोदी होता. अर्ध्या रस्त्यात राहुलचा (मेलबर्नला असलेला पुतण्या) फोन आला व त्याने दोन पर्याय समोर ठेवले. सरळ हॉटेलवर जाणे किंवा वाटेत उतरून बोटीने (राफ्ट) डार्लिंग हार्बरला जाऊन तेथून हॉटेलवर जाणे. आम्ही अर्थातच दुसारा पर्याय निवडला.

आमच्या वाटाड्याने आम्हाला त्या राफ्टच्या स्टेशनवर नीट समजावून सांगून सोडले आणि तो परत गेला. झाले! अतिउत्साह, सुंदर हवा, त्यात परत नवीन अनुभव घेणार होतो. तेवढ्यात राफ्ट आलेली दिसली, आम्ही धावत जाऊन सवार झालो. राफ्टने स्टेशन सोडले आणि आमच्या लक्षात आले की राफ्ट विरुद्ध दिशेस जात आहे. ती निघाली होती "पॅरा मेटा' या एका उपनगराकडे. आम्ही अजूनही जोशात! म्हटले, ठीक आहे, तेथून टॅक्‍सी करून जाऊ या. थोडक्‍यात सांगायचे, तर आम्हाला पुणे स्टेशनहून जायचे होते कोथरूडला आणि निघालो होतो वाघोली अथवा हडपसरला, आणि विचार काय, तर जाऊया तेथून टॅक्‍सीने! बोटीवरच्या तिकीट देणाऱ्या मुलीने आमच्या विचारांवर फक्त खांदे उडवून प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणे नामक एका दूरवरच्या नगरातून आलेल्या साठी उलटलेल्या या जोडप्याचे विचार ऐकून ती बिचारी अजून काय करणार?

राफ्ट निघाली. साधारण पंधरा-वीस मिनिटांनंतर एका स्टेशनवर माणसांचा एक लोंढा पायउतार झाला. त्या लोंढ्याबरोबर आम्हीही उतरलो. काही न बघता, चौकशी न करता आम्ही उतरलो. एक मोठा पॅसेज चालून गेल्यावर लक्षात आले, की ते स्टेशन "पॅरा मेटा' नव्हतेच. आम्ही भलत्याच स्टेशनवर उतरलो होतो. तेथे एका छोट्याशा मैदानात कार पार्क केल्या होत्या. येथून मंडळी ऑफिसला, शॉपिंगला जात असावीत. काही मिनिटांतच, आमच्या दोघांशिवाय तेथे कोणीच उरले नव्हते. आता मात्र हवेत बदल झाला. हवा तंग की काय म्हणतात तशी झाली. कोणाला काही विचारावे तर दूरवर कोणी दिसेना. आम्ही चिंतेत असतानाच एक स्थानिक जोडपे येताना दिसले, त्यांना मार्गदर्शनाची विनंती केली. आमची कथा ऐकल्यावर, त्यांनी चेहऱ्यावर "हल्ली काही खरे नाही, कोणीही परदेशात येतात राव!' असे भाव दीर्घ निश्‍वासाच्या आड लपविण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्याविषयीची चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांच्याकडून कळले, की आता साडेतीन वाजता परतीची राफ्ट आहे. अजून पंधराच मिनिटे बाकी होती. परंतु ती जवळ जवळ निर्मनुष्य जागा सोडायची असेल तर ती राफ्ट गाठणे गरजेचे होते. त्या बेटावरून बाहेर पडायला एकमेव मार्ग तो फक्त राफ्टने. एका बाजूला "सौ'चे आठवतील त्या देवाला साकडे घालणे चालूच होते, आणि मी काहीतरी विनोद करत, आजूबाजूचे फोटो काढत, वातावरणातला ताण कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. वेळ टळून गेली, पण राफ्टचा पत्ता नव्हता.

अचानक तेथे एक चिनी इसम मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसलेला दिसला. त्यालाही विचारले, पण त्याने अगम्य भाषेत काही आवाज काढले. एव्हाना चार वाजून गेले होते व आता धीर सुटत चालला होता. पुढील राफ्ट रद्द तर झाली नसेल ना! असा तद्दन देशी विचार मनातून जाईना. पण शेवटी "सौ'चे देवच कदाचित कामास आले असावेत. कारण दूरवर राफ्ट येताना दिसली. परंतु तो दिवस बहुतेक आमच्यासाठी चांगला नसावा, कारण आम्ही ज्या राफ्टमधून मध्येच उतरलो तीच राफ्ट होती ती. या वेळी मात्र त्या मुलीने नुसतेच खांदे उडवले नाहीत, तर कुत्सीत हसलीसुद्धा. परंतु आता आम्ही डार्लिंग हार्बरला नक्की पोचणार असल्याने आमच्या चेहऱ्यावर पण "हसू' होते. आणि त्या सस्मित चेहऱ्याना घेऊन राफ्ट डार्लिंग हार्बरच्या दिशेने निघाली होती.

दूर ऑस्ट्रेलियात एका फार कमी मनुष्यवस्ती असलेल्या बेटवजा उपनगरात हरवता हरवता आम्ही पुन्हा गवसलो होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com