'रक्ता'चं नातं

जयंत तडवळकर
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

विषय फक्त त्यांचं खातं बॅंकेत उघडण्यापुरताच होता. पण चर्चेतून अनेक बाबींचा उलगडा झाला आणि मी मदतीचा हात पुढं केला. त्याचं रूपांतर वेगळ्या नात्यात झालं...

विषय फक्त त्यांचं खातं बॅंकेत उघडण्यापुरताच होता. पण चर्चेतून अनेक बाबींचा उलगडा झाला आणि मी मदतीचा हात पुढं केला. त्याचं रूपांतर वेगळ्या नात्यात झालं...

ते 1985 वर्षं असावं. मी त्या वेळी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या औंध शाखेत होतो. एक दिवस, शाखेचं कामकाज चालू असताना, एका जोडप्याला माझ्याकडं पाठवण्यात आलं. त्यांना आमच्या बॅंकेत खातं उघडायचं होतं, परंतु खातेदाराची ओळख न देता आल्यामुळं समस्या होती. मी त्यांना बसायला सांगितलं. ते सौ. आणि श्री. पाटील होते. मी : पाटील, ओळख दिल्याशिवाय खातं उघडता येत नाही. पाटील : पुण्यात आमच्या ओळखीचं कुणीच नाही साहेब. आम्ही नेर्ल्याचे, कऱ्हाडच्या पुढे वीसेक किलोमीटरवरचे. मी ः मग इथं खातं? पाटील : अहो, मिसेसचं हार्टचं ऑपरेशन आहे ना. हिला चेस्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मी : ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. मी हॉस्पिटलचे कर्मचारी कोठी यांना फोन लावला. त्यांनी बॅंकेत येऊन सही करण्याचं मान्य केलं. त्याप्रमाणं, मी काउंटर क्‍लार्कला, खाते उघडून घेण्यास सांगितलं.

मी पाटलांना प्रश्न केला, "पाटीलसाहेब, ओळख नाही म्हणता, पण ऑपरेशनवेळी दहा ते बारा बाटल्या ताजं रक्त लागंल त्याचं काय?' त्यावर पाटील उत्तरले, "ते काम झालंय, हे बघा हॉस्पिटलकडून ही नांवं मिळालीत. आता रिक्षानं जाणार व त्यांना भेटणार. मी यादी बघितली, मोजून बारा नांवं होती. मी त्या वेळी दर तीन महिन्यांनी रक्तदान करायचो. त्यामुळं त्यासंदर्भात जरा माहिती होती. माझ्या लक्षात आलं की, यातील काही बाहेरगावी गेले असतील, काहींनी नुकतंच रक्तदान केलं असण्याची शक्‍यता आहे. पूर्ण काम तर होणार नाही, रिक्षाला पैसे व्यर्थ जाणार. अचानक माझ्या मनात विचार आला व त्यांना विचारले, "पाटील साहेब, सिंधुताईंचा रक्तगट कुठला आहे, तर तो निघाला ए पॉझिटिव्ह.' लगेचच मी त्यांना म्हणालो, "आज तुम्ही कुठंही जावू नका. तुम्हांला हव्या असलेल्या रक्ताच्या बाटलीची सोय झाली. माझा रक्तगट तोच आहे, तुम्ही उद्या या, बघूया! थोड्या साशंक मनानंच पाटील दांपत्य परतलं. त्यांना कळत नव्हतं की, मी कोण, कुठला आणि त्यांना मदत का करणार? ते गेल्यावर मी कर्वे रोड, बाजीराव रोड अशा मोठ्या शाखांमध्ये फोन करून "अपरिचितासाठी' रक्त हवंय असं सांगितलं. संध्याकाळपर्यंत पंधरा नांवं आली.
दुसऱ्या दिवशी पाटील आल्यावर त्यांना सांगितलं की, तुम्ही कुठंही जाण्याची गरज नाही, फक्त ऑपरेशनची तारीख नक्की झाली की कळवा. काहींशा अविश्वासानंच (का, ते पुढे कळेल, मलाही शेवटी कळले) पाटील परतले. काही दिवसांनी ऑपरेशन ठरलं, उत्तमरीत्या झालं. एक दिवस, बॅंकेचा लंच टाइम संपवून बसलो असताना अचानक पाटील दांपत्य आलं. त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. आल्या-आल्या सिंधुताईंनी, मी अहो! अहो! म्हणत असताना, मला वाकून नमस्कार केला आणि म्हणाल्या, "असं कसं साहेब, इथं आमचं कुणी नसताना मोठ्या भावासारखं पाठीशी राहिलात', असं म्हणत मला स्टीलचा डबा देऊ केला. मग मात्र मी चिडून म्हटलं, "अहो, मी असं काय केलं, की तुम्ही असं वागताय? माझ्याबरोबर आणखी अकराजणांनीसुद्धा रक्त दिलंय.' त्याबरोबर सिंधुताई डोळ्यात पाणी आणून, हात जोडून म्हणाल्या, "साहेब, ते सर्व तुमच्यामुळं. एवढी गरीब बहिणीची भेट स्वीकारा'. मग सहकाऱ्यांनीसुद्धा मला आग्रह केला, मी नाखुशीनंच भेट स्वीकारली.

मला वाटलं विषय संपला. पण नाही. त्यांचे फोन यायचे. नेर्ल्याला यायचा आग्रह व्हायचा. मी टाळाटाळ करायचो. एकदा तर, आमच्या येण्याची तारीख नक्की केली गेली. सुदैवानं त्या तारखेला मी जाऊ शकलो नाही. "सुदैवानं' यासाठी की, त्या दिवशी म्हणे, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते (ते त्यांनी कसं मॅनेज केलं माहीत नाही) माझा सत्कार होणार होता. आता मात्र हद्द झाली. त्यानंतरसुद्धा ते हट्ट सोडत नव्हते. मग बायको म्हणाली, एवढंही ताणू नये, इतका आग्रह करताहेत तर जाऊन येऊ दोन दिवस. शेवटी आम्ही नेर्ल्यात दाखल झालो. गावातील बरीच मंडळी भेटायला येऊ लागली, दरवेळी माझं कौतुक व्हायचं. मला संकोचल्यासारखं व्हायचं.

ग्रामसेवकांसोबत बोलताना, त्यांना मी चक्कर मारण्याच्या निमित्ताने बाहेर घेऊन गेलो आणि म्हटलं, "अहो, हे पाटील माझं उगीचच कौतुक करताहेत.' त्यावर जे समजलं ते अकल्पित होतं. ते म्हणाले, "साहेब तुम्ही त्यांच्यासमोर जितक्‍या वेळा असं म्हणाल तितकाच, तुमच्याबद्दल त्यांचा आदर वाढंल. कारण, गणपतरावांचा धाकटा मुलगा ब्लड कॅन्सरनं वारला. त्या वेळी नातेवाइकांनीसुद्धा रक्तदान केलं नाही (कदाचित, रक्तदानासंबंधी गैरसमज). मुलगा जाणारच होता, गेला. पण ते दिवस आठवतच ते सिंधुताईंना घेऊन पुण्यात आले. तुम्ही सारं सोपं केलं. का बरं त्यांना तुमच्याबद्दल वाटणार नाही? मग मात्र मनातला किंतू जाऊन आमचं नात दृढ होण्यासाठी राखी किंवा भाऊबिजेची कधीच गरज भासली नाही. त्यानंतर त्यांनी पंधरा-सोळा वर्षे समाजकारण, राजकारण केलं. वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाली. मुले हर्षवर्धन आणि राजश्री मला मामा, मामा करीत. पाटीलसाहेब आनंदात होते. दुर्दैवानं सिंधुताईंचा अपघाती मृत्यू झाला. आता बरेच दिवस संपर्क नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant tadwalkar write article in muktapeeth