प्रवास....! (मुक्तपीठ)

धनंजय उपासनी
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

अंतरंगात शांतपणे डोकावल्यावर जो साक्षात्कार होतो तो आत्मपरीक्षणाचा प्रवास असतो. आयुष्यभर प्रवास सुरूच असतो. 

शिवाजीनगर बसस्थानकात भीमाशंकर गाडीची वाट बघत उभा होतो. गाडी कोणत्या फलाटावर येणार, याबाबत सगळ्यांना परिचित असलेल्या नेहमीच्या शैलीत सूचना झाली. कान आणि डोळे सगळ्या कार्यक्षमतेने जागृत होऊन गाडीचा शोध घेऊ लागले. आमच्या नियोजित प्रवासाची एसटी दिसली. आसन क्रमांक नऊ माझ्या आवडीचे असल्याने पटकन जाऊन बसलो. चालक आणि वाहक आले. गाडी निघाली. बस स्थानकात गर्दी असताना आपला खिडकीच्या जागेवरून बसून प्रवास सुरू होतो. बाहेरच्या गर्दीवर कटाक्ष टाकतो तेव्हा आपण किती ग्रेट आहोत आणि काय भारी जागा मिळाली, ही भावना शब्दांच्या पलीकडे असते.

शिवाजीनगर पार्सल ऑफिस जवळून काही गाड्या बाहेर पडत होत्या, त्या गाड्यांच्या टपाकडे माझे लक्ष गेले. टपावर बांधलेल्या टोपलीतून कावळा काही तरी खाद्य शोधत होता. गाडी सुरू झाली आणि कावळा उडून गेला. कावळ्याचा प्रवास तिथेच संपला. त्या टोपलीचा मात्र प्रवास येथून पुढे सुरू होईल, एकाचा प्रवास संपला दुसऱ्याचा सुरू झाला, असा विचार मनात आला. एसटी शिवाजीनगरच्या गर्दीतून बाहेर पडली. माझ्या डोळ्यांसमोर कावळा आणि टोपली हे दृश्‍य येत होते. प्रवासाच्या किती विविध बाजू आणि पैलू असतात, असे चक्र मनात आले. सगळ्यात प्रथम विचार आला तो चालक आणि वाहक यांचा, की दोघांनाही कोणत्याही गावाला जायचे नसते, पण प्रवास तर रोजच करावा लागतो, म्हणजे यांनी केलेला प्रवास हा कर्तव्याचा प्रवास झाला.

शेजारी बसलेल्या सीटवर एक आजी आणि एक लहान मुलगा यांच्या गप्पा चालल्या होत्या. ते दोघेही खूप आपुलकीने एकमेकांशी बोलताना बघून त्या क्षणी त्या दोघांचा संवाद म्हणजे भावनांचा प्रवास वाटला. प्राणी-पक्षी हे निसर्गातील बदलांचा स्वीकार करून स्थलांतर करतात तेव्हा त्यांनी केलेला प्रवास हा निसर्गातील समतोल साधण्याचा प्रवास असतो. ऋतूचक्रातील बदलांचा विचार केला, तर उन्हाळा संपतो पावसाळा सुरू होतो, दोन ऋतूच्या मधला काळ हा प्रतीक्षेचा प्रवास असतो. आकाशातून पडलेला पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पोचतो, मातीला दरवळ येतो तो क्षण म्हणजे मिलनाची आस असलेला प्रवास असतो. 

जीवनात भविष्याच्या वाटा शोधताना केलेला प्रवास हा शोधकार्याचा प्रवास असतो. कळत-नकळत अनेक व्यक्ती जीवनात डोकावून जातात. काही आधारासाठी असतात, तर काही आभारासाठी असतात. आधार आणि आभार याच्या दरम्यान होतो तो संस्काराचा प्रवास असतो. भक्ती आणि साधना यामध्ये श्रद्धेचा प्रवास असतो. प्रारब्धात असते, पण ते प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी काही काळ जावा लागतो, हा मधला काळ म्हणजे नियतीचा प्रवास असतो. झाडावरून पिकलेले पान जमिनीवर पडते तेव्हा त्या पानाने मातीत मिसळून पुन्हा जन्म घेण्यासाठी केलेला प्रवास हा निसर्गचक्राचा संकेताचा प्रवास असतो. अंतरंगात शांतपणे डोकावल्यावर जो साक्षात्कार होतो तो आत्मपरीक्षणाचा प्रवास असतो.

आयुष्यभर प्रवास सुरूच असतो. काही फलद्रूप होतात, तर काही चालक-वाहकासारखे कुठेही जायचे नसते, पण कर्तव्य भावनेतून करावेच लागतात. शरीरातून बाहेर पडताना शेवटच्या क्षणी आत्म्याने अनंतात विलीन होण्यासाठी केलेला प्रवास हाच खरा जीवनाचे अंतिम सत्य सांगणारा प्रवास असतो. सगळ्या बाजूंना आणि पैलूंना पूर्णविराम देणारा हाच शेवटचा प्रवास असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journey Muktapeeth Article Pune Edition