पुढारपण...

कालिदास पाटील (मानसतज्ज्ञ)
मंगळवार, 18 एप्रिल 2017

इ. नववीच्या मुलांनी दहावीतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेला शालेय निरोप आज सर्वत्र चर्चेचा विषय होता. आखीव रेखीव कार्यक्रमाचे संयोजन, उत्साहवर्धक सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऋणानुबंध वाढविणारी रिफ्रेशमेंट. मुलांनी स्वतःच्या बचतीतून मोठ्या भावंडांना दिलेली शुभेच्छांची ही गळाभेट शालेतील प्रत्येकाला कौतुकाची वाटत होती. सुजय आणि अजय या मित्रांची जोडी, या कार्यक्रमाचे मुख्य पुढारी आपुलकीने सर्वांचे स्वागत करीत होते. केवळ स्वतःच न मिरवता आपल्या सोबतच्या मित्रांचाही पालकांचा परिचय करून देत होते.

इ. नववीच्या मुलांनी दहावीतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेला शालेय निरोप आज सर्वत्र चर्चेचा विषय होता. आखीव रेखीव कार्यक्रमाचे संयोजन, उत्साहवर्धक सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऋणानुबंध वाढविणारी रिफ्रेशमेंट. मुलांनी स्वतःच्या बचतीतून मोठ्या भावंडांना दिलेली शुभेच्छांची ही गळाभेट शालेतील प्रत्येकाला कौतुकाची वाटत होती. सुजय आणि अजय या मित्रांची जोडी, या कार्यक्रमाचे मुख्य पुढारी आपुलकीने सर्वांचे स्वागत करीत होते. केवळ स्वतःच न मिरवता आपल्या सोबतच्या मित्रांचाही पालकांचा परिचय करून देत होते. कामाप्रमाणेच यशस्वीतेचे श्रेय सर्व मित्रांमध्ये विभागल्यामुळे वर्गमित्रांनी सैराट होऊन सुजय, अजय मित्रांना खांद्यावर उभे केले होते.

समाजात विविध क्षेत्रांत नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती असतात. राजकारणाशिवाय संगीत, नाट्य, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत परिवर्तनशील विचार करणाऱ्या इतरांवर छाप टाकणाऱ्या नामवंत व्यक्ती या त्या क्षेत्राचा नेताच असतात. इतरांशी मिळून-मिसळून राहणे, नवनवीन उपक्रमांत सहभागी होणे, कठीण प्रसंगी इतरांची जबाबदारी घेणे, उत्साह कमी न करता चिवटपणा टिकवून ठेवणे, सहकार्य करणे, अशा गुणांचा समुच्चय असणारी मुलं ही त्या त्या वयोगटाचे प्रभावी नेतृत्व करतात. बौद्धिक क्षमता, स्वभावातील गुणवैशिष्ट्यांबरोबरच निकोप शरीरयष्टी, उंची, बोलका चेहरा असे आकर्षक व उमदे व्यक्तिमत्त्व असणारी मुलं इतरांवर सहज छाप पाडतात. खरं तर प्रत्येक मुलांमध्ये जन्मापासून अनेक गुणवैशिष्ट्ये जमा होत असतात. कुटुंबामध्ये काही गुणांचे अप्रत्यक्षपणे संवर्धन होत असते, तर अनेकदा नाउमेद करणाऱ्या प्रसंगांमुळे निर्मितीक्षमता, खेळकरपणा, कल्पनाशक्ती दाबून टाकल्या जातात. अर्थातच मुलांमधील ही प्रतिभा दडपल्याने नेतृत्वगुणाचा विकास मागे पडतो; कुटुंबातील मुक्त वातावरण, आवश्‍यक शिस्त, सकारात्मक प्रोत्साहन, मुलांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी मदत करतात. शालेय वयात मुलांना एनसीसी, स्काऊट, गिर्यारोहण, ट्रेकिंग अशा उपक्रमांतील सहभाग नेतृत्व विकासाला अधिक गती प्राप्त करून देते. आपत्कालीन सहाय्य, विधी वाहतूक नियमन, वृक्षारोपण अशा सामूहिक विकास कार्यक्रमांमुळे मुलं समस्यांकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहायला शिकतात, सामाजिक सहभागाचे धैर्य दाखवितात. स्वतःला मिळालेल्या साधनांचा, संधीचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतात. काही मुलं आपल्या विनोदबुद्धीने वातावरण हलके-फुलके करतात; आपणाला न आवडणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे मांडतात. इतरांवर अन्याय करणाऱ्या, त्रास देणाऱ्या गोष्टी मोडून काढण्याचा प्रयत्न करतात. ही मुलं प्रत्येकवेळी उर्मट, भांडखोर स्वभावाचीच असतात असे नाही, तर तेही नेतृत्वगुणाचेच एक अंग असते.

मुलांमधील नेतृत्वगुण अनेक मार्गांनी स्वतःला आणि आपल्या सवंगड्यांनाही कार्यप्रवृत्त करतात. छोटी छोटी ध्येयं पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायला, निर्णय घ्यायला आणि यशाच्या दिशेने पुढे जायला प्रोत्साहित करतात.
मानवी जीवनातील सामाजिक विकास प्रक्रियेचे नेतृत्व हे एक महत्त्वाचे अंग आहे. नेतृत्व विकासामुळे मुलाच्या विकासाला दिशा मिळते. स्वत:च्या आनंदाबरोबरच इतरांचे दु:ख जाणण्याची व्यापक दृष्टी नेतृत्व विकासात लपलेली असते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक समतेची धुरा खांद्यावर घेणारे महात्मा जोतिराव फुले, स्त्रीशिक्षणासाठी लढा देणाऱ्या सावित्रीबाई, कुष्ठरोग्याच्या पुनर्वसनासाठी झगडणारे बाबा आमटे, असे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रात पुढाकार घेणारी अनेक व्यक्तिमत्त्वे जन्माला आली ती त्यांना मिळालेल्या नेतृत्वगुणांमुळेच!

नेतृत्व हे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. स्वतःबरोबर समूहाला पुढे घेऊन जाणारी, सातत्याने क्रियाशील राहणारी ही स्वयंप्रेरित शक्ती आहे. ही शक्ती असलेली मुलं स्वतःच्या चुकांचे खापर इतरांवर फोडत नाहीत, की सतत तक्रार करत नाहीत. सर्वत्र पारदर्शक वागतात. पक्षपातीपणाने न वागता सर्वांना सामावून घेतात. म्हणूनच एकसंध भावनेने राहताना विधायक उद्दिष्ट ठरविताना स्वतःचे तटस्थपणे मूल्यमापन करूया. थोर नेत्यांचे चरित्रवाचन करूया. संकटांना सामोरे जाताना पराभवातूनही नवीन गोष्टी शिकूया आणि नेता होण्याचा म्हणजेच इतरांना आधार देणारा, सकारात्मक परिवर्तन करणारा पुढारी होण्याचे स्वप्न साकारूया...!

  • मुलांचा शालेय उपक्रमातील सहभाग वाढवूया.
  • मुलांना ध्वजनिधी, वृक्षारोपण, प्रबोधन फेरी अशा कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देऊया.
  • मुलांमधील शिस्त, सहकार्य व संयम विकसित करूया.
  • मुलांना गटकार्यासाठी प्रोत्साहित करूया.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalidas patil write article in SmartSobati