वाडासंस्कृती अजूनही!

कल्पना काकडे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

वाडासंस्कृती हे पुण्याचे वैशिष्ट्य होते. वाडे गेले, पण सोसायट्यांमधून वाडासंस्कृतीच आधुनिक रुपात नांदत आहे.

वाडासंस्कृती हे पुण्याचे वैशिष्ट्य होते. वाडे गेले, पण सोसायट्यांमधून वाडासंस्कृतीच आधुनिक रुपात नांदत आहे.

वाडे संपत चालले आहेत, पण वाडासंस्कृतीचा लोप होत आहे, हे खरे नाही. आधुनिकता, विभक्त कुटुंब पद्धत, व्यक्तिस्वातंत्र्य, मुलांचे परदेशी वास्तव्य इत्यादी कारणांमुळे वाडे जाऊन तिथे गगनाला भिडणाऱ्या इमारती आल्या. एकाच्या पगारात भागत नाही म्हणून नवरा-बायको दोघे नोकरीसाठी बाहेर पडू लागले. त्यामुळे वेळेचे गणित बिघडू लागले. संवाद कमी झाला. पण म्हणून आपल्यातील माणुसकीही संपते का हो? वाड्यात न राहताही वाड्यासारखी संस्कृती अजूनही आमच्या सोसायटीत जिवंत आहे. तुमचे मन मोठे असले, की मनाची दारे कायम उघडी असतात; त्यासाठी वाड्यातच राहायला हवे असे नाही. प्रत्येकाला आयुष्यात बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागते, त्यात मीही काही वेगळी नव्हते. प्रत्येक वेळेला तुमचे नातेवाईक तुमच्याबरोबर असतातच असे नाही. अशावेळी कठीण प्रसंगाला मदतीला धावून येणारी माझ्याच सोसायटीतील माझी माणसे असतात.

सोसायटीतील खूप चांगले अनुभव गाठीशी आहेत. आजही जेव्हा भारतात येते तेव्हा मला मी माहेरी आल्यासारखेच वाटते आणि कायम सर्वांना भेटण्याची ओढ असते. माझ्या सोसायटीतील सर्वजण आपुलकीने चौकशी करतात, सोसायटीतील कुणी मुले परदेशी शिकायला किंवा नोकरीच्या निमित्ताने जाणार असतील तर सगळ्याजणी काही न काही खाऊ आणून देतील. कुणी आजारी असेल तर आवर्जून चौकशी करतील. मग कुठे आपली संस्कृती वाड्याबरोबर संपली! आमच्या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकही प्रचंड हौशी आणि उत्साही आहेत. संध्याकाळी कट्ट्यावरच्या त्यांच्या गप्पा आम्हीसुद्धा "एन्जॉय' करतो. सध्या जीवघेणी स्पर्धा आणि सततची पळापळ असल्याने माणसा-माणसातील अंतर वाढत चालले असे वाटत असेलही; म्हणून आपण आवर्जून वेळ काढून एकमेकांकडे जायला हवे, निदान दूरध्वनीवरून चौकशी करावी. आमच्या सोसायटीत सामाजिक कार्यक्रम, सण, मुलांसाठी शिबिरे आयोजिली जातात. यात सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग असतो. हळूहळू ही पिढी थकायला लागली अन्‌ त्याची जागा नवीन पिढी घेत आहे. मला विश्‍वास आहे, ही संस्कृती आम्हीदेखील जपणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalpana kakade write article in muktapeeth