'सिप्ला'मधील आनंदोत्सव

कल्पना शिरोडे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सकारात्मकतेवर बोलणारे खूप असतात; पण मी सकारात्मक जगणाऱ्यांना पाहिले. खूप शिकले.

सकारात्मकतेवर बोलणारे खूप असतात; पण मी सकारात्मक जगणाऱ्यांना पाहिले. खूप शिकले.

माझी भाची दीपिका हिचा गाण्याचा कार्यक्रम होता, सिप्ला सेंटर (वारजे)मध्ये. आम्ही कार्यक्रमासाठी सभागृहात पोहोचलो. प्रेक्षक म्हणजे "सिप्ला'मधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असतील ही कल्पना होती; पण एकेक प्रेक्षक "बेड'सह यायला सुरवात झाली. मला काही केल्या सुचेना. मी असे कधीच पाहिले नव्हते. कार्यकर्ते एकामागून एक बेड आणत होते. अगदी रांगेत. थोडीशी मान उंचावून "आज कोण आलंय कार्यक्रमासाठी' असं ती मंडळी बघत होती. त्यांच्या उत्सुक डोळ्यांनीच आमच्याशी बोलत होती. ज्यांना शक्‍य आहे ती तिथूनच आमच्याकडे बघून हात जोडत होती. मध्यभागी खुर्च्यांच्या रांगा आणि आजूबाजूला अगदी शिस्तीत बेडच्या दोन रांगा. कार्यक्रम सुरू झाला. माझे निवेदन झाले, की सगळीकडे नजर फिरवायचा मला चाळाच लागला.

गाणे सुरू झाले आणि आमच्या डाव्या हाताला एका पलंगावर छान टेकून बसलेल्या एक ताई जागीच डोलायला लागल्या. अंगावरच्या चादरीलाच भरजरी पैठणी समजून त्या गाण्याला साजेसा अभिनय करत होत्या. त्या "पैठणी'च्या दोन कडा दोन्ही हाताच्या दोन बोटांच्या चिमटीत धरून नाचवून त्यावर रेशमाच्या रेघांनी काढलेला कर्नाटकी कशिदा दाखवत होत्या. मी त्यांच्याकडेच बघत राहिले. हसून देवाणघेवाण होत होती. त्या "मस्त'ची खूण करीत होत्या. मधेच दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजवत होत्या. मीही त्यांना दाद देण्यासाठी टाळ्यांचा ताल धरला. माझ्या बरोबरीने सगळ्या सभागृहाने टाळ्यांचा ठेका धरला. नंतर लावणी सुरू झाली. ढोलकीची थाप आणि सगळे एकंदरीतच लावणीमय वातावरण. आणि तेवढ्यात... एकदम जोरदार सणसणीत शिट्टी. सगळ्यांच्याच नजरा तिकडे वळल्या. शिट्टी वाजवणारेही एक रुग्ण होते. संपूर्ण तल्लीन होऊन, दोन्ही हात नाचवत मधेच लावणीला वाजवतात तशीच शिट्टी पुनःपुन्हा वाजवत, संपूर्ण गाणे त्यांनी डोक्‍यावर घेतले. सगळे सभागृह प्रभावित झाले. तो संपूर्ण कार्यक्रम म्हणजे फक्त आणि फक्त एक आनंदोत्सव होता माझ्यासाठी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalpana shirode write article in muktapeeth