क्षेत्रसंन्यास

डॉ. ज्योती गोडबोले
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

आयुष्यात आनंद उपभोगून झाल्यानंतर, शरीर थकल्यावर सार्वजनिक समारंभापुरता तरी क्षेत्रसंन्यास घ्यायला हवा. लोक काय म्हणतील, याचे दडपण न घेता इतरांनी वृद्धांना क्षेत्रसंन्यास घ्यायला मुभा द्यायला हवी.
 

आयुष्यात आनंद उपभोगून झाल्यानंतर, शरीर थकल्यावर सार्वजनिक समारंभापुरता तरी क्षेत्रसंन्यास घ्यायला हवा. लोक काय म्हणतील, याचे दडपण न घेता इतरांनी वृद्धांना क्षेत्रसंन्यास घ्यायला मुभा द्यायला हवी.
 

गेट - टुगेदरसाठी एका हॉटेलमध्ये जमलो होतो. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर आमचे टेबल आरक्षित केले होते. आमच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या, इतक्‍यात जिन्यावरून दोन वेटर्सनी, खुर्चीतून एका आजोबांना उचलून आणले आणि कसेबसे एका खुर्चीवर बसवले. बरोबर कुटुंबातील इतर बरीच मंडळीही होतीच.
बिचाऱ्या आजोबांना हाताने नीट जेवता येत नव्हते, ठसका लागत होता, पाणी सांडत होते. त्यांना व इतरांनाही जेवणाचा आनंद घेता येत नव्हता. बरोबरच्या नातेवाइकांची कुचंबणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

मनात विचार आला, की या लोकांनी बिचाऱ्या आजोबांना इथे आणायचा आटापिटा का केला असेल बरं? एक "पण‘ आडवा आला असेल - "पण लोक काय म्हणतील?‘ घरातील ज्येष्ठ व्यक्तीला सोडून, आपण सेलिब्रेट केले तर लोकांना काय वाटेल?
... बहुतेक वेळा, आपण अनेक गोष्टी नाइलाजाने, समाजासाठीच करत असतो. लग्नसमारंभात तर बहुतेक ठिकाणी जास्त संख्येने ज्येष्ठ नागरिकच उपस्थित असलेले दिसतात.

एकदा तर मी एका वयोवृद्ध आजोबांना कॅथेटर सकट व्हीलचेअरवर बसवून मांडवात आणलेले पाहिलेले आहे. आपण जगतो कुणासाठी? जग काय म्हणेल, असे आपणच म्हणायचे आणि आपल्याच जवळच्या माणसांना चारचौघांत अशा पद्धतीने आणायचे हे योग्य दिसते का? मुख्य म्हणजे हा सर्व खटाटोप का आणि कशासाठी? त्या बिचाऱ्या वृद्धांना यातून खरोखरीच आनंद मिळत असेल का? आपण समाजात राहतो, रूढी पाळाव्या लागतात, हे मान्य! परंतु त्या वृद्धांना अशा विकलांग अवस्थेत आणणे योग्य आहे का? त्यांची संमती अशावेळी विचारात घेतली जाते का नाही? ते स्वेच्छेने येत असतील तर प्रश्‍नच नाही, परंतु लोकांच्या भीतीने, त्यांना नाइलाजाने आणणे योग्य नाही.

माझ्या वडिलांचे वय ऐंशीच्या पुढे गेले होते. कोणतेही आमंत्रण आले, की ते स्पष्ट सांगत, ""माझे इथूनच आशीर्वाद आहेत. मला कृपया बोलावू नका. मी येणार नाही.‘‘
मी त्यांना विचारले, ""लोक इतक्‍या प्रेमाने, आदराने बोलावतात तरी तुम्ही समारंभांना जायला का नको म्हणता?‘‘ त्यांचे उत्तर होते, ""हे बघा! मी एकेकाळी कर्तबगार, शारीरिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होतो. त्या वेळी मी जात होतोच की! आयुष्यातले सगळे आनंद मी उपभोगले आहेत. उत्तम खाल्ले-प्यायले आहे, कपडेलत्ते वापरले आहेत. पण आता मला त्या जड कपड्यांचेही ओझे वाटते. मी तुमच्या भरगच्च जेवणाला न्याय देऊ शकत नाही. मला काहीही नको असते. मी त्या अन्नाचा अपव्यय करायला कशासाठी येऊ? मला या असल्या समारंभात आणि सुखोपभोगात काहीही स्वारस्य उरले नाही.‘‘
मला त्यांचे परखड विचार तंतोतंत पटले आणि नंतर आम्ही त्यांना कधीच आग्रह केला नाही. पण इतकी वैचारिक परिपक्वता किती वृद्ध लोकांत बघायला मिळते?

आपल्या सुनीताबाई देशपांडे यांच्या "आहे मनोहर तरी‘ या पुस्तकात त्यांनी फार सुंदर शब्द वापरलाय "क्षेत्रसंन्यास‘ आणि नुसता वापरला नाही, तर त्यांनी तो अंमलातदेखील आणला. शरीर व्याधिग्रस्त व्हायला लागले, दुसऱ्याच्या मदतीशिवाय बाहेर जाणे कठीण होऊ लागले, तेव्हा जवळ जवळ आठ-नऊ वर्षे त्या घराबाहेरच पडल्या नाहीत. हे व्रत सोपे नाही. त्या कोणत्याही सार्वजनिक समारंभाला जायच्या नाहीत. त्यांनाही वाटत असेलच, की जिथे आपण रुबाबात, दिमाखात जात होतो, तिथे वॉकर घेऊन, दुसऱ्याची मदत घेऊन, विकल अवस्थेत जाणे इष्ट नाही. त्या अत्यंत स्वाभिमानी बाईंना ते कधीच पटले नसते.
मला अगदी मान्य आहे, की मनुष्य समाजप्रिय असतो. चारचौघांत जाणे, समारंभाचा आनंद घेणे हे कोणालाही मनापासून आवडते. परंतु गात्रे थकायला लागली, शरीर विकल झाले, इंद्रिये साथ देईनाशी झाली, मानसिक संतुलन कमी झाले, की अशा वेळी त्या बिचाऱ्या असहाय व्यक्तीला, केवळ समाज काय म्हणेल या दडपणासाठी, सार्वजनिक कार्यक्रमांना नेणे योग्य आहे का?
अशावेळी त्या व्यक्तीची संमती किंवा इच्छा, खरंच विचारात घेतली जाते का?
विचार आपणच करायचा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ksetrasann

टॅग्स