हेवा वाटतो बापाचा!

लक्ष्मण खेडकर
बुधवार, 13 मार्च 2019

अडीनडीचा फायदा घेत सामान्यांना लुबाडणारे आसपास असताना लोकांचा विचार करणारा हा माणूस सामान्यातील असामान्य वाटतो.

अडीनडीचा फायदा घेत सामान्यांना लुबाडणारे आसपास असताना लोकांचा विचार करणारा हा माणूस सामान्यातील असामान्य वाटतो.

गावाकडं चारापाण्याचा भीषण नी बिकट प्रश्‍न. बैलं जगवायसाठी माझा बाप गंगधडीला आलेला. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बापानं विहिरी फोडून, ऊसतोडी करून इथं तीन-चार एकर जमीन अन्‌ राहण्यासाठी गोदावरीच्या काठावर असलेल्या गावात पाच गुंठं जागा घेऊन ठिवलेली. तीन वर्षांपासून शाळा करून हे शेत मीच पाहातोय. गोदावरी जवळ असूनही अद्याप पाण्याची काही सोय आम्ही करू शकलो नाहीत. जिराईतीच आहे धरण उशाला असतानाही. या वर्षी इकडेही पाऊस नव्हता. कशाबशा ओलीवर ज्वारी पेरली. आळाशा बांधायच्या आधीच लोकं वैरणीचा सौदा करायला येऊ लागली. पण बापानं येणाऱ्या कुणासीस सौदा केला नाही. बाप म्हणायचा, "थांबा, पेंड्या बांधू द्या. खळ करू द्या. मग ठरवू.' मोडणी सुरू असतानाच बीड जिल्ह्याच्या वंजारवाडीतील लोकं वैरण पाह्याला आली. त्यातल्या म्हाताऱ्यानं माझ्या बापाला ओळखलं. तो आत्याच्या जावंचा चुलता. बापानं त्यांना इतरांपेक्षा तीनशे-चारशे रुपयानं कडबा कमी भावात व उधारीवर दिला.

खळं झालं. वीस-पंचवीस गोण्या ज्वारी झाली. खायापुरती ठिऊन बाकीची विकायची म्हणून आठवडाभर तसीच राहिली. मलाही शाळा असल्यामुळं वेळ मिळत नव्हता. रविवारची सुट्टी बगून मी सकाळीच छोटा टॅम्पो घेऊन पाटेगावच्या घरी गेलो आणि गोण्या टॅम्पोत भरू लागलो, तसं तिथलं आमचं शेजारीपाजारी वडिलांच्या ओळखीचे लोक जमले अन्‌ माझ्या वडिलाला विनंती करू लागले, "नाना, मोंढ्यावर नेहूसतोर आम्हाला द्या ना.' बापानंही ते खायला घेताहेत म्हणल्यावर मोंढ्यापेक्षा पन्नास रुपये कमी भावाने ज्वारी देऊन टाकली, कुणाला उधारीवर, तर कुणाला उसनवारीच्या वायद्यावर. उरलेल्या गोण्यातल्या काही गोण्या घरी खायाला ठेवून बाकीच्या टॅम्पोत टाकून आम्ही घेऊन जाणार तेवढ्यात बऱ्याच वेळापासून चिखलानं भरलेलं हात घेऊन, वीटभट्टीवर काम करणारी एक बाई माझ्या बापाला केविलवानी म्हणली, "नाना, मला बी एक गोणी द्याता का? मह्याकडं पैसं नहीत. दोन-चार हप्त्यात थोडं थोडं करून दिईन.' बापानं तिच्यासाठी एक गोणी टॅम्पोतून उतरायला लावली. अखेर मी सात-आठ गोण्या घेऊन मोढ्यावर गेलो. वाईट दिवसातही लोकांचा विचार करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या, ह्या वयातही कष्टणाऱ्या माझ्या बापाचा मला हेवा वाटतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laxman khedkar write article in muktapeeth