उजेडाचं झाड (मुक्तपीठ)

प्रकाश रोकडे
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

आई नावाचा सूर्य मावळला आणि क्षणभर माझं आयुष्य अंधारमय झालं. मी विचार केला, की या सूर्यानंच तर माझं नाव "प्रकाश‘ ठेवलंय. तुझं नातं उजेडाशी आहे, हे सांगण्यासाठी. अंधाराला जाळल्याशिवाय उजेड कसा निर्माण होईल? आईनं ठेवलेल्या नावाचं सार्थक कसं करता येईल?.. तेव्हापासून प्रयत्नशील आहे, उजेड निर्माण करण्यासाठी आणि इतरांना तो देण्यासाठी.

देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रांनजीकचं आणि धम्मभूमीच्या धार्मिक संस्कारांनी संस्कारित छोटेसे "चिंचोली‘ हे माझ्या आईचं माहेर. आई "सुभद्रा‘ अतिशय देखणी, गोरीपान होती. आवाज गोड. काळेभोर, कुरळे भरपूर केस. कपाळावरील कुंकवाचा टिळा तिच्या सौंदर्यात भर घालत असे. हसली, की आभाळ ठेंगणं वाटावं आणि रागावून ओरडली, की आकाश कोसळल्यासारखं व्हावं! अशिक्षित असूनही आईनं वडिलांच्या बरोबरीनं आम्हा भावंडांच्या प्रगतीसाठी दारिद्य्राशी केलेला संघर्ष कोणत्याही शब्दांत वर्णन करता येणार नाही. प्रकाशाला प्रकाशित करणारं उजेडाचं झाड, असंच आईचं स्थान माझ्या अंतःकरणात आहे. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक लहान-थोर माणसांना कायम जोडणारी तिची माणुसकी आणि तल्लख स्मरणशक्ती, ही तिची वैशिष्ट्ये!

मी जिल्हा परिषदेत आणि पत्नी मंदाकिनी "बालभारती‘मध्ये नोकरीला, तर मुलगा प्रशांत शिक्षणासाठी; असे तिघंही दिवसभर घराबाहेर असायचो. आई एकटीच घरात असे. पोपटाच्या आवाजातील बेल वाजल्याबरोबर आई पळत येऊन दरवाजा उघडायची. कुणी ओळखीचे असो वा अनोळखी, अगदी मायेनं बोलायची. विचारपूस केल्यावर त्यानं दिलेला निरोप शांतपणे ऐकून घ्यायची. दूरध्वनीची बेल वाजली, की तिकडे धावून निरोप विचारून घ्यायची. मनात साठवायची आणि मी घरी आल्याबरोबर वेळ, माणसाचं नाव, त्याचा निरोप न विसरता सांगायची. माझी आई फक्त माझी एकट्याची राहिली नव्हती; ती बंधुता परिवारातील सर्वांचीच आई झाली होती.

सुरवातीच्या काळात कधी-कधी माझ्या सामाजिक कार्यामुळे मागे पडल्यानं दुखावलेले काही लोक फोनवरून धमकीवजा बोलायचे. आई ते शांतपणे ऐकायची आणि वेळ, माझा मूड बघून अनमोल सल्ला द्यायची. म्हणायची, "परकास, तुझ्यावर लोकांचा लय जीव आहे. विश्‍वास बी. त्यांच्याकडं जास्त लक्ष दे. भलत्यासलत्या माणसांकडं दुर्लक्ष कर. कुणालाही उलटं बोलू नकोस. भाषण चांगला करतोस, पण भाषणातून कुणालाही दुखावू नकोस. विश्‍वास जप. पैशामागं धावू नकोस. पैसाच तुझ्यामागं धावेल, याची खात्री बाळग. समाजाचं काम करतोस, तसं कुटुंबासाठीही काही कर. तुझ्या घरात आहे, तसाच उजेड भावाबहिणींच्या घरातही निर्माण कर.‘ तो मंत्र मी आजही व्रतस्थपपणे जपत आहे.

.. आईचा संधिवात वाढत्या वयाबरोबर बळावला. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. याच दरम्यान माझ्या खासगी जीवनात दुःखदायक घटना घडली. मी खचून गेलो. अशा वेळी आईइतका मोठा आधार कोणताही नसतो. मला अश्रूंना वाट करून द्यायची होती. खूप रडायचे होते. आई अत्यवस्थ असल्याचे कळल्यावर दुपारी मी सांगवीहून एकटाच दुपारी चिखली या माझ्या गावी गेलो. आई अंथरुणाला खिळलेली होती. "परकास‘ म्हणून आईनं डोळे किंचित उघडले. मी पट्‌कन तिच्या कुशीत डोके ठेवून ओक्‍साबोक्‍शी रडू लागलो. ती हबकली. स्वतःचं आजारपण विसरली. वर्षभर अंथरुणाला खिळलेली आई सगळं बळ एकवटून चक्क उठून बसली. सरपटत जवळ येऊन माझे हात हातात घेऊन म्हणाली, "काय झालं? स्वतःला सावर. तू शहाणा आहेस. कुणी तुला दुखावलं असेल, तर त्याला माफ कर. अगदी मलाही.‘ आई किती महान असते, याचं प्रत्यंतर मला आलं. पुढे आईची तब्येत बिघडतच गेली. वर्षभरानंतर ती गेली. न परतण्यासाठी.

आई नावाचा सूर्य मावळला आणि क्षणभर माझं आयुष्य अंधारमय झालं. मी विचार केला, की या सूर्यानंच तर माझं नाव "प्रकाश‘ ठेवलंय. तुझं नातं उजेडाशी आहे, हे सांगण्यासाठी. अंधाराला जाळल्याशिवाय उजेड कसा निर्माण होईल? आईनं ठेवलेल्या नावाचं सार्थक कसं करता येईल?.. तेव्हापासून प्रयत्नशील आहे, उजेड निर्माण करण्यासाठी आणि इतरांना तो देण्यासाठी.

Web Title: Light tree (muktapitha)