माकडचेष्टा महागात

एम. डी. कुलकर्णी
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

देवदर्शनाला गेलेले असताना एका माकडाने हातातील पिशवी पळवली आणि नंतर त्यातील सोनसाखळी मिळविण्यासाठी सुरू झाले प्रयत्न...

देवदर्शनाला गेलेले असताना एका माकडाने हातातील पिशवी पळवली आणि नंतर त्यातील सोनसाखळी मिळविण्यासाठी सुरू झाले प्रयत्न...

त्र्यंबकेश्‍वरला कुलदैवताच्या दर्शनाला गेलो होतो. गप्पागोष्टी रंगल्या होत्या. ध्यानीमनी नसताना अचानक एक माकड उड्या मारीत आले व क्षणार्धात माझ्या कन्येच्या हातातील सोनसाखळीची डबी ठेवलेली पिशवी घेऊन पळाले. काय घडले ते सगळ्यांच्या लक्षात आले. गप्पांच्या मैफलीचा बेरंग झाला. सगळे जण स्तब्ध झाले. पुजारीकाकांना माकडे कोणत्या झाडावर जाऊन बसतात हे माहित होते. त्यानी फक्त पुरुष मंडळींना आपल्याबरोबर येण्यास सांगितले. त्यांच्याबरोबर आम्ही माकड ज्या दिशेने गेले त्या दिशेने पळत गेलो तर ते माकड मंदिराजवळ असलेल्या एका झाडावर जाऊन बसले होते. त्या ठिकाणी बरीच माकडे बसली होती. माकडचेष्टा चांगलीच महागात पडणार असेच त्या वेळी वाटत होते.

आम्ही सर्व जण माकड काय करते ते पाहात गप्प राहिलो. माकडाने प्रथम डबी बाहेर काढून घेतली. मोकळी पिशवी खाली फेकली. नंतर डबी उघडली. डबीत काही खाऊ नसल्याने तीही जोरात खाली फेकली. परंतु आमचे दुर्दैव असे की, डबी डोंगरमाथ्यावर व साखळी खोल दरीच्या बाजूस पडली. पुजारीकाकांनी खाली झोपून पाहिले तर साखळी दरीच्या बाजूस एका झुडपाला अडकली होती. दरी हजार फूट खोल. मंदिरातून एक लांबलचक कळक घेऊन पुजारीकाका आले. जमिनीवर ओणवे होऊन झोपल्यावर त्यांनी त्यांचे पाय घट्ट धरण्यास सांगितले. त्यांचा एक पाय मी व माझा भाऊ प्रकाश याने आणि दुसरा पाय माझ्या दोन मित्रांनी धरून ठेवला. कारण त्यांचे निम्मे शरीर माथ्यावर व उरलेले शरीर दरीकडील बाजूस अधांतरी होते. पंधरा-वीस मिनिटांच्या खटाटोपीनंतर त्यांनी कळक एकदम वर उचलला, त्याबरोबर साखळी सरकन खाली आली. तेवढ्यात कळक खाली दरीत पडल्याने आम्ही सर्व निराश झालो. त्यानी सांगितल्यानंतर आम्ही त्यांना ओढून घेतले. मग त्यांनी मांडी घातली व मूठ उघडली, तो काय आश्‍चर्य! साखळी त्यांच्या हातात होती. त्यांचे आभार मानून त्यांस मोबदला देऊ केला, परंतु तो न घेता पूजा कर्मासाठी ते मंदिरात निघून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: m d kulkarni write article in muktapeeth

टॅग्स