श्रद्धा आणि सबुरी!

मदन व्यं. हसबनीस
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना योग्य मार्ग दाखवणारे बाबाच होते. मी सिगारेट सोडली. चूक दुरुस्त केली.

चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना योग्य मार्ग दाखवणारे बाबाच होते. मी सिगारेट सोडली. चूक दुरुस्त केली.

अचानक खोकला वाढला. अंग गरम असायचे. अशक्तपणा जाणवत होता. साधे बोलले तरी ढांस लागायची. तपासण्या झाल्या. पाठीत पाणी झाले होते. एका फुफ्फुसाला सूज आली होती. पाठीतील पाणी काढले. परत एक्‍स-रे. डॉक्‍टरांनी एक्‍स-रे पाहिला व म्हणाले, ""बायोप्सी''. माझ्या उशाजवळ एक डॉक्‍टर उभी होती. ती उद्‌गारली, ""ओ माय गॉड'', काहीतरी भयंकर आहे, एवढेच लक्षात आले. दुसऱ्या दिवशी फुफ्फुसाचा एक छोटा तुकडा काढून मुंबईला "टाटा'मध्ये पाठविला. मी बेचैन होतो. पत्नी अकरावी शिकलेली. घरात लहान दोन मुली व मुलगा. म्हातारे वडील. सर्व भार माझ्या एकट्यावर होता. मला काहीच सुचत नव्हते. मध्यंतरी मला सिगारेटची सवय लागलेली. या सवयीमुळेच माझे आयुष्यच पणाला लागले होते.

माझी साईबाबांवर फार श्रद्धा आहे. मी सतत धावा करत होतो. माझ्या एका वाईट सवयीमुळे सर्व घरच कोसळणार होते. मी बाबांचा धावा केला. मला एक संधी द्या. मी आयुष्यात कधी सिगारेटला हात लावणार नाही. पूर्वी मी शिर्डीला सायकलवर गेलो होतो. पहाटे नगरहून पुढे जाताना रस्ता चुकलो होतो. पुढे तीन-चार मैल गेल्यावर अचानक एक फकिर आले आणि त्यांनी शिर्डीचा मार्ग दाखवला. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना योग्य मार्ग दाखवणारे बाबाच होते. पुढच्या गुरुवारी डॉक्‍टरांची "अपॉइंटमेंट' होती. सायंकाळी सातची वेळ ठरली होती. गुरुवारी सकाळपासूनच मन थाऱ्यावर नव्हते. डोळे सारखे भरून यायचे. कुटुंबाला वाऱ्यावर सोडण्याचा मला काय अधिकर होता? मी फक्त एकच संधी मागत होतो. क्‍लिनिकमध्ये गेलो. माझा नंबर आल्यावर आत गेलो. डॉक्‍टरांनी झोपायला सांगितले. मी झोपलो. वर पाहातो तर साईबाहबांची प्रतिमा. माझे डोळे भरून आले. मी हात जोडले व आभार मानले. माझे रिपोर्ट नॉर्मल आले होते. नंतर मी सिगारेटला कधीच हात लावला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madan hasabnis write article in muktapeeth