esakal | फिलिंग नॉस्टेल्जिक ...
sakal

बोलून बातमी शोधा

फिलिंग नॉस्टेल्जिक ...

फिलिंग नॉस्टेल्जिक ...

sakal_logo
By
माधवी भट

आधुनिक सोयी झाल्या तरी कधीतरी जुन्या वस्तू हव्याच असतात. मग जुन्या वस्तूंबरोबर मागे पडलेल्या आठवणीही लख्ख होतात. जिव्हाळा वस्तूंचा असतो, तसा या आठवणींचाही. कधी तरी स्मरणरंजनात रमायचंही असतं.

चैत्र सरून वैशाख सुरू होतो आणि उंबरठ्यावरचा सूर्य माजघरातच मुक्कामाला येतो. वैशाख वणवा जिवाची लाही लाही करू लागतो. दुपारी निवांत गप्पा करत बसावं तर हमखास जुने खेळ आठवतात आणि त्या खेळांत कायम रडीचा डाव खेळणारी किंवा हरल्यावर रडणारी एखादी व्यक्ती आठवतेच. गंमत म्हणजे ती आपल्याच नात्यातली किंवा शेजारची देखील असते. मग तिच्या आठवणीने थट्टा, खो खो हसून झाल्यावर अपरिहार्यपणे जुने अल्बम निघतात. किती तरी जुने... सगळेच्या सगळेच. काळ्या जाड कागदावर सोनेरी चौकटींनी बंदिस्त कृष्ण धवल फोटो आणि त्यावर बटरपेपरचे अस्तर असलेल्या सर्वांत पुरातन अल्बमपासून ते अगदी आजच्या पिकासा सॉफ्टवेअरमधून कॉम्प्युटरवर दिसणाऱ्या फोटोपर्यंत एक स्मरणयात्रा निघते! हे मागे मागे जाणं म्हणजे नोबिताला डॉरेमोनने दिलेल्या टाइम मशिनमधून फिरून आल्यासारखं वाटू लागतं. तसे जुने अल्बम्स आता कुठे गेले कोण जाणे ! मात्र आजही त्यांच्यावरून त्या विटल्या, फाटत आलेल्या बटर पेपरवरून हात फिरवताना आपल्याही जन्मापूर्वीची आपलीच हसरी माणसं पाहून मौज वाटू लागते. असं अनेक वस्तूंबद्दल देखील होतं!

गेल्या रविवारी मुगवड्यांचा घाट घातला. ऐन सकाळीच भारनियमन! मग मिक्‍सर बंद! पाटा-वरवंटा शोधला. न्हाणीघरात नेऊन नीट धुतला. त्यावरून हात फिरवताना फार फार बरं वाटू लागलं. अवजड पाटा नि त्यावरचा तो वरवंटा! इतके दिवस जपून आहेतच. पाट्या-वरवंट्याचं एक बरंय, की सहसा गृहिणी तो कुणाला देऊ धजत नाहीत. किंवा 'देऊ नये' म्हणतात. यावर श्रद्धा म्हणूनही असेल ... मात्र तो असतो.
त्यावर साग्रसंगीत मुगाच्या डाळीचं वाटण झालं! वाटताना पायलीचं पुरण, मसाले, मुगवड्या, चटण्या कशा वाटल्या जात त्या जुन्या आठवणी निघाल्या. नाही म्हणायला ते ऐकून पाटा वरवंटाही सुखावला असेल.

आईनं, त्याचा इतिहास सांगायला सुरवात केली. पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेली वस्तू! आमची आज्जी नि आत्याआज्जी पाट्यावर मसाले वाटत त्या वेळी पाट्याचं पाणी कसं काढलं जाई वगैरे ... तेव्हाच त्यांच्या हातच्या पाटवडीच्या भाज्या चटकदार बनत! वरवंट्याला आंगडं टोपडं गुंडाळून, तीट लावून, गळ्यात सोनसाखळी घालून आजवर कित्येकांची बारशी "गोविंद घ्या, गोपाळ घ्या' म्हणून साजरी झाली याचा हिशेब नाही. आत्ता माझ्या भाचीचं बारसं झालं तेव्हा मीच तर वरवंटा जोजवला होता की.. !

सबंध वाटण होऊन मुगवड्या संपून पुन्हा पाटा-वरवंटा स्वच्छ करून भिंतीशी उभा करून ठेवताना आपण घरातली जुनी वस्तू नव्हे, तर आपल्या मूळ पुरुषाशी नातं सागणारा एक पुरातन साक्षीदार उभा पाहतोयसं वाटून फार भरून आलं! आता काळानुरूप अनेक सोपी यंत्र आलीत. आजच्या धावत्या काळात तीच सोयीची सुद्धा आहेत. शिवाय घरं पूर्वीसारखी खालची, मोठी उरली नाहीत. मग पाटा-वरवंटा वगैरे अवजड वस्तू सांभाळणे अतिशय अवघड! मात्र तरीही त्याच्याकडे पाहिलं की जिव्हाळा वाटणार हे नक्कीच !

जुने पाट होते. त्यांच्या मागल्या बाजूस आजोबांचं नि पणजोबांचं नाव लिहिलं होतं. त्या पाटांवर दोन्ही बाजूला ओवी लिहिल्यावर देतात तशी उभी रेघ वाटावी अशी पितळी फुलांची उभी रेघ. काही पाटांवरची ती फुलं बोटांनी फिरवली की गरगर फिरत. तो चाळाच होता. पाटावर बसा नि फुलं भिंगरीसारखी फिरवा. त्या पाटांच्या मागच्या बाजूला खडूनं अष्टाचव्वा खेळायचा डाव आखलेला असे. चिंचोके, सुईदोरा, डब्यातली बटणे असला ऐवज मिळवून खेळ रंगत असे. याच पाटासारखा पण अगदी इवला, देखणा देवपाटदेखील होता. मुंजी, केळवणं असली, की चौरंगावर पान आणि बसायला पाट, भोवती रांगोळ्या, अर्ध्या बटाट्यात खोवलेल्या उदबत्त्या, दोन्ही बाजूला तेवणाऱ्या समया असला थाट!

पाट, चौरंग असतात हल्ली. नाही असे नाही. मात्र ते आधुनिक झालेत. डिझायनर झालेत. तयारच मिळतात. मात्र तरीही, पितळी फुलांची आठवण येते, नव्या पाटांच्या प्लायवूडकडे पाहून! आज्जी कुणा एका आळशी बाईंबद्दल सांगताना म्हणे, "त्यांचं काय? खाटेवरून पाटावर आणि पाटावरून खाटेवर.. असा आराम आहे.' किंवा "पाट-पाणी घ्या...ताट-पाट मांडा ..' असले शब्द बोलण्यातून नाहीसे होतील का? पाट-पाणी म्हणजे ताट, वाटी, तांब्या, फुलपात्र, पाट वगैरे... असा समाहार द्वंद्व समासदेखील लुप्त होईल का? उगाच वाटलं!

मधल्या पिढीची भयंकर गोची होते. त्यांना जुन्याची कासावीस होत आठवणही येते आणि नव्याशी जुळवूनही घ्यावं लागतं. तरीही असल्या काही क्षणांना जरा नॉस्टेल्जिक होत, जुने दिवस माळून जीव मिरवून येतोच आपण! तेवढंच गार वाटतं आणि रोजचा दिवस पुन्हा आपल्या भोवऱ्यात खेचून घेतो. नाही का?

loading image