घन ओथंबून...

माधुरी गुंजाळ
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पाऊस बरसताना येतात मनातही अलवारपणे शब्दांचे "घन ओथंबून...'

पाऊस म्हटले, की उडणारी तारांबळ, रस्त्यांवर साचणारे पाणी, गाड्यांमुळे अंगावर उडणारे पाण्याचे, चिखलाचे शिंतोडे, रेनकोट, छत्री बाळगण्याचा वैताग असला तरी ग्रीष्माने हैराण झालेला प्रत्येक जीव मात्र सुखावतो. पायात पैंजण लेवून नृत्य करावे तसे पत्र्यांवर, तावदानांवर पडणारे पावसाचे थेंब एका तालात नृत्य करू लागतात आणि पाहता पाहता पागोळ्यांतून उतरणाऱ्या पाण्यामुळे अवघ्या अंगणात तळे साचते. झाडाझुडपांना, पक्ष्यांना धुवून लख्ख करणारा, तप्त, तृषार्त धरेस निवविणारा जलकुंभच जणू!

प्रत्येकाची पाऊस एन्जॉय करण्याची तऱ्हाही वेगळी. पावसाच्या वाहत्या पाण्यात कागदी होड्या सोडून, पावसात भिजणे असो वा "ए आई, मला पावसात जाऊ दे, एकदाच गं भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे' असा हट्ट असो किंवा "आला पाऊस मातीच्या वासात गं, मोती गुंफीत मोकळ्या केसांत गं' असो, बालांपासून थोरांपर्यंत पाऊस प्रत्येकाचा आपला असतो...वेगळा! या बरसणाऱ्या पावसाला कुणी हातातल्या वाफाळलेल्या कॉफीचा आस्वाद घेत...न भिजता...खिडकीतूनच आपलेसे करतो, तर कुणी मस्त गाडीने लांबवर भटकंती करत, वाटेत चहा, भजी किंवा कणसांवर ताव मारतो, तर कुणी टेकड्या, डोंगर, किल्ले यांतून वळणावळणाने वाहणारे झरे, उसळणारे छोटे-छोटे धबधबे, तुडुंब भरलेल्या नद्या आणि एकूणच हिरवाईने नटलेल्या वनश्रीचा आस्वाद घेण्यासाठी एखादा ट्रेकही करतो. रानेवने, डोंगरदऱ्या, झाडेझुडपे, पशुपक्षी या सर्वांना नवसंजीवनी देणाऱ्या पावसामुळे धरती जणू हिरव्या रंगाच्या छटा असणारा शालू परिधान करते. विविधरंगी रानफुले गवतावर डोलू लागतात. खालपर्यंत येणारे ढग, हलकेसे धुके, हळुवारपणे येणारी एखादी सर आणि मधूनच झिरपणारे रविकिरण सारा आसमंतच आल्हाददायक करतात. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पाऊसझड असे सारे ओसरले, की पानांच्या कडेने, फांद्यांवर चंदेरी मण्यांचे सर दिसावेत असे लगडलेले पाणीदार थेंब खुणावू लागतात. जणू काही "घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे' होऊन "या नभाने या भुईला दान' दिल्यागत ठिबकत राहतात. आकाशात काळे ढग जमून बरसू लागले की येतात मनातही अलवारपणे शब्दांचे "घन ओथंबून....'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhuri gunjal write article in muktapeeth