बर्फाच्या चादरीवरून...

महेंद्र धावडे
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

बर्फाच्या चादरीवरून चालण्याचा अनुभव विलक्षण होता. केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकही परीक्षा पाहणारा हा ट्रेक आहे.

बर्फाच्या चादरीवरून चालण्याचा अनुभव विलक्षण होता. केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकही परीक्षा पाहणारा हा ट्रेक आहे.

चद्दर ट्रेक एक खतरनाक आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव. लेह विमानतळावर उतरलो तोच शून्याच्या खाली सहा सेल्सिअसवर पारा होता. सायंकाळी बाजारात फेरफटका मारला. या ट्रेकसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळते ते म्हणजे तेथील आर्मी दुकान. येथे सर्व सामान उत्तम प्रकारचे आणि योग्य दरात मिळते. रात्री तापमान आणखी घटले. कमीत कमी तीन दिवस आधी लेहला येऊन येथील वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. तपासणी झाल्यावर ट्रेकला लागणाऱ्या आवश्‍यक परवानग्या दिल्या जातात. विमाधारक म्हणून दिलेले ओळखपत्र संपूर्ण ट्रेकमध्ये सोबत बाळगावे लागते. सकाळी नऊच्या दरम्यान गाडीत बसून बकुला या ठिकाणी दुपारी बाराला पोचलो. लगेचच सॅक पाठीवर टाकून झंस्कार नदीकाठी जाण्यासाठी उतरण्यास सुरवात केली आणि बर्फाच्या चादरीचे दर्शन झाले. वाहणाऱ्या वाऱ्याने पुढे अनुभवायच्या थंडीची जाणीव करून दिली. बर्फावर चालणे हा एक भन्नाट आणि चित्तथरारक अनुभव आहे.

अतिशय ठिसूळ बर्फावरून चालताना पाय आत जाण्याची भीती असते तर, अतिशय कठीण बर्फावरून चालताना पाय घसरण्याची आणि बुडाला खणखणीत मार लागण्याची भीती. काही वेळा अतिशय भुसभुशीत बर्फ दिसतो, पण तो फसवा असतो. कारण त्यावरून पाय घसरण्याची शक्‍यता जास्त असते तर, काही वेळा अतिशय खडबडीत बर्फ लागतो. याच्यावरून पाय घसरून जर पडलो तर बसणारा मार खूपच वेदना देणारा असतो. माझा एक पाय बर्फ तुटल्यामुळे पाण्यात गेला. मी लगेचच बाजूला होऊन बूट काढले आणि पायमोजे बदलले. हे सर्व एक-दोन मिनिटांतच झाले, तरी तेवढ्या वेळात ओले झालेले पायमोजे दगडासारखे कडक झाले होते. एकदा मी पाय घसरून जोरदार पडलो आणि पायाखालील बर्फाला तडा गेला. अक्षरशः अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता. काही वेळा पाय टाकला तर पायाखालील बर्फ तुटायचा आणि त्याचा काच फुटल्यासारखा आवाज यायचा. थंडी अशी होती की नाकातून वाहणाऱ्या पाण्याचे मिशीवर बर्फात रूपांतर होत होते. काही ठिकाणी डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याचे, धबधब्यांचे रूपांतर बर्फात झाले होते, ते दृश्‍य खूपच नयनमनोहर दिसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahendra dhawade write article in muktapeeth