फुकट फेरी सूर्याभोवती

फुकट फेरी सूर्याभोवती

आम्ही 15 जानेवारी 2010 रोजी सूर्यग्रहण पाहायला जायचे, असे ठरविल्यावर घरात चर्चा सुरू झाली. सहजच माझी लेक निशू म्हणाली, "आई आपण दरवर्षी सूर्याभोवती एक फेरी फुकट मारून येतो.' तिच्या या बोलण्यावर मी हसले. नंतर मनात विचार आला खरंच की, ती म्हणते ते बरोबर आहे. आपण पृथ्वीच्या मदतीने सूर्याभोवती आणि सूर्याचे बोट धरून विश्‍वात भ्रमण (पृथ्वीची तिसरी गती वैश्‍विक गती) काहीच मूल्य न देता करून येतो. आपल्या जन्मापासून दरवर्षी. म्हणतात ना जी गोष्ट विनामूल्य मिळते त्याचे महत्त्व माणसाला नसते. संक्रमण मार्गातून जाताना सूर्यमालेतील कितीतरी मंडळी आपल्या वाटेत उभी असतात. त्यांच्याकडे आपण नुसते म्हणजे अगदी ओझरतेच पाहतो. मनामध्ये कोणतेही कुतूहल नसतेच. कोणीतरी, कधीतरी थोडीफार माहिती देते. तेव्हा कुठे थोडीशी उत्सुकता वाटते, पण तेवढ्यापुरतीच.

या भ्रमण मार्गावरील दरवर्षी दिसणारे काही ठळक सोबती तरी आपल्याला ओळखता येतात का? उदा. ग्रह, तारे, बारा राशी, सत्तावीस नक्षत्र. किमान एवढे तरी. त्यातल्या त्यात ठळक दिसणाऱ्या तारका पुंजांपैकी मृग नक्षत्र, सप्तर्षी यांच्याकडे आपण पाहतो. मात्र त्यांच्याबाबत अधिक जाणून घ्यायचा किती प्रयत्न करतो? ध्रुवताऱ्याला ब्रह्मांडाचे केंद्र मानतात, असे कोठेतरी वाचण्यात आले आहे. तो स्थिर आहे, एवढेच ज्ञात आहे. तथापि, तो ओळखता येतो का? त्याला शोधण्यासाठी कोणत्या तारका पुंजांची आपल्याला मदत घ्यावी लागते? प्रवास करताना आपण बाहेरचे दृश्‍य जसे निर्विकारपणे पाहतो, एखादी ठळक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसल्यास तेवढ्यापुरतेच वॉव! म्हणतो; तसेच काहीतरी या फेरीमध्ये घडते. एवढेच काय ते.

15 जानेवारी 2010 रोजीचीच गोष्ट. तीव्र इच्छाशक्ती, पतीचे सहकार्य यामुळे शतकात कधीतरी दिसणारे अद्‌भुत, अवर्णनीय, विलोभनीय, कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग आला. 15 जानेवारी रोजी भारताच्या दक्षिणेकडील ठराविक पट्ट्यातूनच कंकणाकृती सूर्यग्रहणाचे दर्शन भूतलावरील काहीच भाग्यवंतांना घडले. भाग्यवान अशासाठी, की या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे आणि तेही बराच काळ (10 मिनिटे 12 सेकंद), सोनेरी बांगडीच्या रूपात सूर्य आपल्याला दर्शन देणार आहे, असे भाकीत जगातील शास्त्रज्ञांनी कितीतरी आधीच केले होते. ते पाहण्यासाठी भारतातून, जगातून अगदी नगण्य (भारताची आणि जगाची लोकसंख्या पाहता) लोकांनीच सूर्यमंडलातील या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. तशी बरीच गर्दी रामेश्‍वर, कन्याकुमारी इत्यादी ठिकाणी लोकांनी केली होती. पण ती ग्रहणकाळात समुद्र स्नानाचे पुण्य मिळविण्याच्या हेतूने.

आता थोडे ग्रहणाविषयी. सकाळी 11 वाजून 14 मिनिटांनी ग्रहणाला सुरवात झाली. सूर्याचा थोडा-थोडा भाग पश्‍चिमेकडून काळवंडू लागला आणि जवळ जवळ दुपारी एक वाजता सूर्य आम्हाला सोनेरी म्हणा किंवा हिऱ्याच्या बांगडीसारखा दिसू लागला. हे विलोभनीय दृश्‍य पाहून डोळ्याचे पारणे फिटले, ही म्हण किती सार्थक आहे, याची जाणीव झाली. जगात यापेक्षा काही अद्‌भुत असूच शकत नाही, असे वाटले. आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत, यात धन्यता वाटली. त्या वेळी साक्षात्कार झाला, की अमावास्येला चंद्र असतो. पण दिसत नाही. चंद्राने ग्रहणावेळी आपले अस्तित्व दाखवून दिले आणि असे वाटले की सूर्यासमोर उभा राहून चंद्र मोठ्या दिमाखात म्हणतो आहे, ""बघ! मी तुझ्यापेक्षा किती लहान आहे, निस्तेज आहे. तरीही तुझ्या तेजाला मी आडवू शकतो.''

ग्रहण काळात प्रकाशाची तीव्रता कमी कमी झालेली जाणवली. तापमानाचा पारा खाली उतरला. सूर्याची किरणे सौम्य झाली. पक्षी वेड्यासारखे भिरभिरत होते. चंद्र- सूर्याच्या एकत्रित आकर्षणाने समुद्राच्या पाण्याचे तांडव चालू होते. जणू सूर्याचे कंकणाकृती रूप बघून त्यांना उधाण आलं होतं. परिभ्रमण काळात कितीतरी नवलकथा आपल्याला अनुभवायला मिळतील. पण केव्हा जर आपण अंधश्रद्धा दूर सारून डोळसपणे सूर्यमंडळात पृथ्वीचे बोट धरून फिरू तेव्हाचं! धरती मानवाला काय काय म्हणून मुक्त हस्ते प्रदान करते? ती आपली पोशिंदी तर आहेच त्याचबरोबर ती आपल्याला ब्रह्मांडाच्या ज्ञान भांडाराचेही दर्शन घडविते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com