कसं करता येईल एकटेपणाचं मॅनेजमेंट?

डॉ. मृणालिनी नाईक
गुरुवार, 2 जुलै 2020

कदाचित म्हणूनच का कोण जाणे पण काही लोक स्वतःपासूनच दूर निघून जाण्यासाठी स्वतःच्याच आयुष्याची दारे कायमची बंद करतात. काय मनस्थिती राहत असेल त्यावेळी त्या व्यक्तीची, याचा कदाचित आपण विचार करू शकत नाही. कदाचित स्वतःसाठी ठरवलेली तीच एक योग्य वाट, असाच त्यावेळी विचार असावा त्यांचा. आपण गरज होती का वगैरे म्हणून मोकळे होतो. पण, विचार करून पाहत नाही की कारण काय असू शकते.

कधी कधी आठवणींनी दाटलेला एकटेपणा, दाटून आलेल्या ढगांतून कोसळणाऱ्या धारा बघून सहजच आपल्या वाटा मोकळ्या करू पाहतो. पण खरं सांगू का, या एकटेपणाची पण एक गंमत आहे. आपण हा एन्जॉय केला तर हा आपला अगदी जवळचा मित्र होतो, आणि नाही तर याच्यासारखा दुसरा शत्रू नाही. मित्र झाला की तो आपल्याला हवाहवासा होतो, काही नव्या कल्पना आणि जुन्या आठवणींना कवटाळायला. पण, शत्रू झाला की स्वतःचाच राग ही येतो आणि स्वतःच्या अस्तित्वाचीच तेव्हा लाज वाटते.

कदाचित म्हणूनच का कोण जाणे पण काही लोक स्वतःपासूनच दूर निघून जाण्यासाठी स्वतःच्याच आयुष्याची दारे कायमची बंद करतात. काय मनस्थिती राहत असेल त्यावेळी त्या व्यक्तीची, याचा कदाचित आपण विचार करू शकत नाही. कदाचित स्वतःसाठी ठरवलेली तीच एक योग्य वाट, असाच त्यावेळी विचार असावा त्यांचा. आपण गरज होती का वगैरे म्हणून मोकळे होतो. पण, विचार करून पाहत नाही की कारण काय असू शकते.

हवाहवासा वाटणारा एकटेपणा जो आपल्यासारख्याला आनंद देतो, तोच काहींच्या नशिबी आलेला असतो न मागता. आता पाहा ना, द्रौपदीमुळे महाभारत झाले. द्रौपदी कारण होती पांडवांच्या वनवासाचं. द्रौपदी नसती तर कदाचित महाभारत झालं नसतं वगैरे पण विचार काहींनी कारणासहित मांडले तर काही चक्क गम्मत म्हणून सर्रास टोले उडवतात की पाच पती असणारी द्रौपदी कधी एकटी असूच शकत नाही. पण, तिच्या मनातला एकटेपणा कधीही कोणी जाणून घेतला नाही. फक्त कृष्ण एक होता ज्याला द्रौपदीच्या मनाची व्यथा माहीत होती.

विचार केला आहे कधी, लग्न करून घरी आल्यावर पाच भावांनी एकत्र वाटून घ्या या कथनावर द्रौपदीच्या अंगाची किती लाहीलाही झाली असावी? किती राग आला असेल तिला तेव्हा? त्याहूनही दिव्य म्हणजे, पाच पती असूनही एकानेही तिच्या अब्रूचे रक्षण करायला पुढे येऊ नये? एकटेपणाचा तो कळसच म्हणावा लागेल. जिथे लोकांना दिसायला सगळे असतात, मात्र या गर्दीतही व्यक्ती एकटा होतो तेव्हा तो एकटेपणा खायला धावतो. या एकटेपणाची नाळ तोडायला मग लोक टोकाची भूमिका घेतात. मात्र, द्रौपदीला तेव्हा कृष्ण लाभला एका सख्या मित्रासारखा, लाभला काय तो होताच तिचा खरा मित्र. ज्याला तिच्या मनाची व्यथा माहीत होती. एका पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीला कोणतेही नाव न देता त्याचे आकलन केले तर त्याचा खरेपणा मग लक्षात येतो.

असो, द्रौपदीला कृष्णाच्या मैत्रीने वाचविले असे म्हणण्यास हरकत नाही. काय केले हो कृष्णाने इथे. मोठं असं काहीच नाही. त्याने दिली तिला साथ. एक मानसिक साथ ज्याची तिला गरज होती. ती मिळाली नसती तर द्रौपदीची कहाणी कधीच संपुष्टात आली असती.

आपण कृष्ण होऊ शकत नाही, पण आपण एक मानसिक आधार देणारी मैत्री नक्कीच देऊ शकतो. मनाचे मॅनेजमेंट जेव्हा आपण म्हणत असतो, तेव्हा ते स्वतःच्या मनाबरोबर इतराच्या मनाचेही असावे. कळत नकळत आपण बहुदा अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्या सोबत असणारी व्यक्ती खरंच आपल्या सोबत आहे का याची जाणीव आपल्याला क्वचितच होत असते. तेव्हा एखादी व्यक्ती गर्दीतही एकटी होऊ शकते ही कल्पनाच आपल्याला करवत नाही. कधी कधी नकळत त्याचे आपणही कारण होऊ शकतो याचीदेखील आपण दखल घेत नाही.

द्रौपदीचे मन कदाचित पक्के होते ती खंबीर होती, पण प्रत्येक व्यक्ती असते असे नाही. तेव्हा कृष्ण न सही पण कानसेन आपण होऊ शकतो. समोरच्याचे ऐकून त्याला बोलतं करून त्याच मन मोकळं करू शकतो. सोपं आहे असं नाही पण जमणार नाही असंही नाही. मानव संसाधन मॅनेजमेंटचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे असं म्हटलं तरीही चालेल. तेव्हा स्वतःही मोकळे व्हा, कोणातरी पुढे मन मोकळं करा आणि कोणाला तरी करू द्या, तरच आनंदाचं आणि समाधानाचं एकटेपण लाभेल नाहीतर एकटेपणा सारखं विक्षिप्त असं काही नाही. पाहा स्वतःला विचारून कसं करता येईल मॅनेजमेंट एकटेपणाचं !!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Management of lonelyness

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: