हृदयात वाजे समथिंग...

manali muley write article in muktapeeth
manali muley write article in muktapeeth

जंगलात आपल्या डरकाळीने सीमा रेखणारा वाघ पाहण्यात वेगळीच मजा असते. वाघाचे सारे कुटुंबच तुमची वाट अडवून खेळत बसले असेल तर... त्यांचे ते सारे विभ्रम नजरेत साठवायचे.

खरे तर वाघ हा मांजर जातीतील प्राणी. पण, मला मांजर मुळीच आवडत नाही आणि वाघ म्हणजे हृदयात वाजे समथिंग... मात्र, प्राणी संग्रहालयातील बंद पिंजऱ्यात बसलेला केविलवाणा वाघ बघण्यात काही मजा नाही. माझे जंगलप्रेमी दीर नीरज यांना वाघोबांनी जंगलात अनेकदा दर्शन दिले होते, म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही ताडोबाला गेलो. रिसॉर्टच्या बाहेर जंगल झाडी... किर्रर्र अंधार... काजव्यांच्या गप्पा आणि रिसॉर्टच्या आत वीज गेलेली... काळोखातच गप्पा रंगलेल्या... रात्र सरली. खरे तर गप्पांमध्ये पूर्ण रात्र जागवली. तरी सफारीसाठी अकरा गाड्या आत सोडल्यानंतर आमच्या जीपचा क्रमांक आला.

आता वाघ दिसण्याची शक्‍यता कमी झाली, असेच काहीसे वाटले, तरी नकारात्मक विचार मनात फिरकू द्यायचे नाहीत, असे म्हणत गाडी पुढे रेटली. ताडोबाच्या मोहरली द्वारातून आम्ही जंगलात प्रवेश केला.

घनदाट झाडी, निळंभोर आकाश, याआधी न बघितलेली झाडे. पाने, वेली, फुले, न संपणारा मोकळा रस्ता, पक्ष्यांचे मंजुळ सूर, मनाला धुंद करणारा गारवा... पायवाटेवर अशाच मंगलमय आठवणींचा पसरलेला पाचोळा... आणि काही किलोमीटर पुढे गेलो तोच एक गवा कानोसा घेऊन उभा दिसला. गाईडने गाडी थांबवली आणि शांत राहण्याचा इशारा दिला. "कॉलिंग' सुरू होते. पशु-पक्ष्यांचे इशाऱ्याचे चित्र-विचित्र आवाज म्हणजे कॉलिंग. आता पूर्ण लक्ष गव्यावर. तो काय करतो... कुठे पाहतो... कुठे जातो याकडेच. आणि अशातच जोरदार डरकाळी ऐकू आली. हाच तो आवाज, जो आजपर्यंत अप्रत्यक्षपणे ऐकला होता. शाळेत असताना शिकलेला... "डिस्कवरी'वर ऐकलेला... दमदार आवाज. जणू या जंगलाच्या "हिरो'ने "आपण आहोत' याची दुरूनच पोच दिलेली. तेवढ्यात गव्याने वेगाने पलायन केले. आता मनाची धडधड वाढली. क्षणभर असे वाटले, की आता शिकारच घेऊन येणार वाघोबा... पण गाईडने "नाही' असे उत्तर दिले. तोच.. क्षणात पापणी लवते न लवते तो सहा फूट लांब... सोनेरी तांबूस रंगावर काळेभोर पट्टे पांघरलेला... दमदार डरकाळी दिलेल्या बजरंग वाघाने आम्हाला दर्शन दिले.

हुश्‍श... त्याच्या एका झलकेसाठी आतुरलेल्या माझ्या मनाने श्‍वास घेतला. दोन फूट दुरून का होईना, त्याने दर्शन दिले, त्याने जिंकले आणि रस्ता ओलांडून घनदाट झाडीत पुन्हा पसारही झाला.

क्षणाचाही विलंब न लावता चालकाने जीप फिरवली आणि गाईड सांगत असलेल्या जंगलवाटेने आम्ही सुसाट निघालो. त्या वेळेस कळले, की वाघ एका दिवसात ऐंशी ते शंभर किलोमीटर चालतो. गाईड म्हणाला, ""वाघ पुन्हा एक रस्ता ओलांडणार आणि त्या आधी आम्ही तिथे पोहोचलो पाहिजे.'' आम्ही पोहोचलो, पण वाघोबा नक्की येणार ना! आणि तो खरेच पुन्हा आला... त्याच्या पावलांचे ठसे मातीत आणि त्याच्या भेटीसाठी आतुरलेल्या माझ्या मनात ऐटीत रोवत आला.

पुन्हा घनदाट झाडीतून जीप पुढे निघाली... ठिपकेदार हरणे, काळवीट, मगर... वेगवेगळे पक्षी सारेच काही होते तिथे. पुन्हा वाघ दिसू शकेल, अशा सर्व जागा गाईड दाखवत होता... आणि डोळ्यांवरचा विश्‍वास उडेल असे चित्र दिसले समोर. दोनच जीप उभ्या होत्या. दुरून वाटले, की पुन्हा एखादा वाघ जात असेल. पण इथे तर पूर्ण कुटुंबच सूर्यस्नान घेत मजेत होते. आता मात्र मी छोट्या ऋत्विला झोपेतून उठविलेच. ती दोन वर्षांची चिमुरडी चक्क न रडता उठून वाघोबाला टकमक बघण्यात दंग झाली.
"छोटी तारा' नाव होते त्या वाघिणीचे आणि तिचे दोन वर्षांचे बछडे (बछडा कसला तोसुद्धा एक रुबाबदार तरुण वाघच) रस्त्याच्या मध्ये ठाण मांडून बसलेले. त्यातील एक वाघ जीपच्या बाजूने आमच्याकडे नजर रोखत. तिथे असलेल्या गाड्यांच्या रांगेला प्रदक्षिणा घालून पुन्हा समोर आला. त्याचा एक भाऊ जखमी होता. त्यामुळे जणू कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारीच घेतली होती त्याने. कानाच्या पडद्यालाही लाजवेल अशी निरव शांतता. नकळत आवाज फक्त कॅमेऱ्याच्या क्‍लिकचा. प्रत्येक जण आपल्या कॅमेरात त्यांचे एक एक क्षण टिपत होता आणि मी फक्त उघड्या डोळ्यांनी. मोकळा श्‍वास घेऊन त्याचे निरीक्षण करत होते. तब्बल पन्नास मिनिटे.
त्यांचे रस्त्यात लोळणे.. जांभई देणे... खेळणे... आईच्या दुधासाठी एकमेकांशी भांडणे आणि आई व एका भावाचे जखमी बछड्याच्या जखमेला चाटणे. मनसोक्त खेळून झाल्यावर "छोटी तारा'ने दोघांना जंगलात जाण्याचा इशारा केला. तसे दोघे जण उठून, तीच कडक नजर घेऊन, आपल्या पंजाची निशाणी रोवत जंगल वाटेने निघाले. पुढे खड्डा दिसताच त्यांनी छोटी उडी घेतली आणि दिसेनासे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com