चोचभर पाणी

मंदा सुरेश जाधव
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

सिमेंटच्या जंगलात काऊ-चिऊ कसे दिसणार? सोपे आहे, त्यांच्यासाठी आपल्या गच्चीत दाणा-पाणी ठेवा. ते येतील.

सिमेंटच्या जंगलात काऊ-चिऊ कसे दिसणार? सोपे आहे, त्यांच्यासाठी आपल्या गच्चीत दाणा-पाणी ठेवा. ते येतील.

नेहमीप्रमाणे पहाटेच फिरून आले. थोडे पाय दुखत असल्यामुळे पुन्हा झोपले. पण झोप येईल तेव्हा खरे; कारण एव्हाना चिमण्यांनी चिवचिवाट करून मला जागे करायचे नक्की केले होते. मी दररोज फिरून आल्यावर त्यांना प्रत्येक कुंडीमध्ये छोट्या मातीच्या भांड्यात पाणी ठेवत असते. आज मात्र विसरले. म्हणून नुसता चिवचिवाट सुरू होता त्यांचा. मला तर वाटले, कदाचित त्या मला म्हणत असाव्यात, "अगं बाई, किती हा वेळ पाणी ठेवायला? आम्हाला अजून मुखप्रक्षालन करायचे आहे. पाणी पिऊन, मग पिलांसाठी चारा शोधायला जायचे आहे.' आणि काय गंमत! मी प्रत्येक कुंडीतील भांड्यात पाणी ठेवते न ठेवते तोपर्यंत एकच झुंबड उडाली. अहो, अगदी सरकारी नळावर बायकांची जशी भांडणे होतात ना पाण्यासाठी, अगदी तशी सुरू झाली या इथे. मी जरा मनातच हसले आणि निवांत आराम खुर्चीत बसून त्यांची ती लगबग पाहू लागले. तेवढ्यात माझा मुलगा म्हणाला, "अगं आई, काय हे! उठ ना. डबा करायचा आहे.'

मला वाटते, की प्रत्येक माणसाने किमान एक तरी झाड लावावे आणि पशुपक्ष्यांवर प्रेम करावे, अगदी त्यासाठी अभयारण्यातच जाण्याची गरज नाही. पण प्रत्येकाने ठरवले, की दररोज पक्ष्यांना खिडकीत, गॅलरीत जिथे जागा मिळेल तिथे त्यांच्यासाठी रोज थोडे दाणा-पाणी ठेवेन तर नक्कीच पक्षी फिरून फिरून त्या ठिकाणी येतील. आणि आपली पुढची पिढी सुद्धा चिऊ-काऊ बघू शकतील. त्या चिऊ-काऊचा एक मूक आशीर्वाददेखील आपणाला मिळेलच नाही का? आता तुम्ही म्हणाल, मातीची भांडी आणायची कुठून? पुढच्या महिन्यात संक्रात असेल. प्रत्येक घरात संक्रातीसाठी मातीचे सुगड आणतातच. फक्त त्याचा वापर संक्रांत झाल्यावर पक्ष्यांना पाणी पिण्याचे भांडे म्हणून करायचे, एवढेच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manda jadhav write article in muktapeeth