टप्पा चाळिशीचा!

मंदा सुरेश जाधव
गुरुवार, 4 एप्रिल 2019

चाळिशीत पारा गेला की घामाघूम होतो जीव; पण चाळिशी गाठताना आत्मविश्‍वासही येतो प्रत्येक स्त्रीला.

चाळिशीत पारा गेला की घामाघूम होतो जीव; पण चाळिशी गाठताना आत्मविश्‍वासही येतो प्रत्येक स्त्रीला.

बातमी होती, पुण्याच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली. हा चाळीसचा आकडा खरेच इतका भयंकर असू शकतो का? पुणेकर बाहेर जाताना सावध असतील. आमची आई ओरडत असते, "अगं पारा चाळीसच्या वर गेलाय. टोपी घाल. हेल्मेट घाल, लवकर ऑफिसला जा, उन्हात भटकू नकोस.' या चाळिशीची मला गंमत वाटते. उन्हाच्या बाबतीत म्हटले तर काळजी करायला लावणारी आणि हीच चाळिशी स्त्रियांनी ओलांडली तर मग काय विचारूच नका. कारण या वयात थोडी धावपळ कमी झालेली असते. मुले बऱ्यापैकी मोठी झालेली असतात. दिवसभराची कामे उरकून दुपारी निवांतवेळी ती एकटीच आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत असतात. चेहऱ्यावर एक नवी झळाळी आलेली असते. एव्हाना बऱ्यापैकी आत्मविश्‍वास आलेला असतो. मग दोघांसाठीही करताना धांदल उडवणारी, अगदी दहा-बारा जण घरात असले तरी सगळ्यांचे व्यवस्थापन व्यवस्थित करून स्वतःसाठी थोडा वेळ देऊ पाहणारी स्त्री पाहिली की साक्षात तिला दंडवत घालावासा वाटतो.

संसाराचा एक पट डोळ्यांसमोरून सरकत असतो. मग ही चाळिशीतील स्त्री अगदीच सुंदर, हळवी, लाघवी दिसायला लागते. तिला आता तिच्या राहिलेल्या इच्छा, आकांक्षा खुणावू लागतात. वेळही असतोच. मग काय गाडी शिकणे, हार्मोनिअम वाजविणे, मनसोक्त फिरणे असे नानाविध छंद तिला खुणावत असतात. घरची मंडळीदेखील परवानगी देतात. पण तरीही मनात एक प्रश्‍न येतो, हे सर्व करण्यासाठी मला चाळिशी ओलांडावी लागली. असो एक नवी उमेद, नवी आशा, नवी दिशा चाळिशीनंतर निर्माण होते. कालची अल्लड मुलगी आज अगदी वैभवसंपन्न कुशल गृहिणी झालेली असते. या चाळिशीची पण एक मज्जाच आहे की नाही. ऐन उन्हाळ्यात सकाळी सकाळी घाम फोडणारी तर स्त्रियांच्या जीवनात एक नवे रूप धारण करणारी. चला तर मग, आपण स्वागत करुया या चाळिशीचे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manda jadhav write article in muktapeeth