...अन्‌ आयुष्य बदलले

मनोहर जोशी
बुधवार, 9 मे 2018

आयुष्याचे समीकरण मांडता येणे कठीणच असते. एका गणितज्ज्ञाच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याचे गणित सोपे झाले. एक सामान्य कारकून, पण गणिताची शिस्त, तर्कशुद्धता आणि कलात्मक व्यवहारही अंगात मुरला.

आयुष्याचे समीकरण मांडता येणे कठीणच असते. एका गणितज्ज्ञाच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याचे गणित सोपे झाले. एक सामान्य कारकून, पण गणिताची शिस्त, तर्कशुद्धता आणि कलात्मक व्यवहारही अंगात मुरला.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांनी "भास्कराचार्य प्रतिष्ठान' या गणित संशोधन संस्थेची स्थापना केली. त्या काळी ते पुणे विद्यापीठाबरोबरच अमेरिकेतील पर्ड्यु विद्यापीठाचेही गणिताचे प्रमुख प्राध्यापक होते. ते सहा महिने भारतात आणि सहा महिने अमेरिकेत असायचे. भास्कराचार्य प्रतिष्ठान संस्थेत गणितविषयक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. तेथे भारतातून व परदेशातून गणित विषयावर संशोधन करण्यासाठी विद्यार्थी येत असत. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असे. भास्कराचार्य प्रतिष्ठान- पुणे विद्यापीठ- फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने गणितातील निरनिराळ्या विषयांवर प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जात. काही वेळेला परदेशी पाहुणे भास्कराचार्य प्रतिष्ठानला भेट देत असत.

डॉ. अभ्यंकर सरांचे राहणीमान अतिशय साधे होते. दररोज ते पांढरा स्वच्छ पायजमा, शर्ट परिधान करत असत. पुणे विद्यापीठ किंवा काही महाविद्यालयात व्याख्याने द्यायला जायचे त्या वेळी ते सुटाबुटात असत. परदेशातील व भारतातील हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना गणित विषयात सखोल मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. अभ्यंकर सर करीत होते. गणितातील बुद्धिमान विद्यार्थ्यांचा पुण्यातील प्रत्येक शाळा- कॉलेजमध्ये जाऊन शोध घेऊन त्यांना गणित विषयात कसे जास्तीत जास्त प्रावीण्य मिळेल, याकडे सर जातीने लक्ष देत. पुणे शहरातील हुशार विद्यार्थ्यांना भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये प्रवेश देऊन "गणित ऑलिंपियाड स्पर्धा' आयोजित केल्या जात होत्या. भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या ग्रंथालयात प्रत्येक पुस्तकाच्या नोंदी नोंदवहीमध्ये केल्या जात होत्या. त्याप्रमाणे कपाटात गणितातील निरनिराळ्या विषयावरील पुस्तके ठेवली जात होती. काही पुस्तके लेखकांप्रमाणे ठेवली जायची. कोणतेही पुस्तक पटकन सापडावे, असा हेतू त्यामागे होता.

मला सरांचे काम जवळून पाहता आले. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. मी मॉडर्न कॉलेजमध्ये शिकताना पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवत होतो. स.प. महाविद्यालयातील प्रा. अशोक गोपीनाथ जुमडे हे आमच्या वाडेकर चाळीत राहत होते. मी किती कष्ट करतोय, हे ते जवळून पाहत होते. एक दिवस जुमडेसरांनी मला त्यांच्या घरी बोलावले. ते म्हणाले, ""मी तुला उद्या एका गणित संशोधन संस्थेत घेऊन जातो.'' दुसऱ्या दिवशी जुमडे सरांनी मला "भास्कराचार्य प्रतिष्ठान'मध्ये नेले. जुमडे सर तिथे उपसंचालक होते. अभ्यंकर सरांना एका चांगल्या क्‍लार्कची आवश्‍यकता होती. डॉ. अभ्यंकर सर पहिल्याच भेटीत म्हणाले, ""मला व जुमडे सरांना बिनचूक काम प्रिय आहे.'' ही माहिती होती आणि सूचनाही. किती दक्षतेने काम करायला हवे, हेच सरांनी सांगितले होते. इंग्रजी बिनचूक टंकलेखन कसे करायचे? संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांची यादी, विद्यार्थ्यांना दिलेल्या अभ्यासवृत्तींची यादी, गणित विषयातील अनेक लेखकांची पुस्तके यांच्या याद्या बिनचूक कशा कराव्यात, हे अभ्यंकर सरांनी मला शिकवले. त्याचेही काही तंत्र असते, ते काम त्याप्रमाणे केले की त्यात चुका होत नाहीत, हे सरांमुळेच लक्षात आले. काम बिनचूक करण्याचीही शिस्त मनाला लागावी लागते, हे समजले.

भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये कार्यरत असताना मला प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या वाढदिवशी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन जावे, असा आदेश अभ्यंकर सरांनी दिला होता. त्या वेळी मला पु. ल. देशपांडे यांना भेटता आले. त्यांनी भास्कराचार्य प्रतिष्ठानला देणगी दिली होती. तो देणगीचा धनादेश संस्थेतर्फे स्वीकारता आला. भास्कराचार्य प्रतिष्ठानला मिळणाऱ्या देणग्यांचे धनादेश - रोख रकमा बॅंकेत भरण्याचे काम माझ्याकडेच होते. ते मी वेळेवर व बिनचूक करीत होतो. त्याचप्रमाणे संबंधितांना देणगी मिळाल्याबद्दलची पावती व आभारपत्र पाठवण्याचे काम करीत होतो. संस्थेच्या कामानिमित्त मुंबईला आगगाडीने कसे जायचे, कोणाशी कशी चर्चा करायची, चार माणसांत कसे वागायचे, बॅंकेची कामे, महानगरपालिकेची कामे, जिल्हाधिकारी कचेरीतील कामे कशी करायची, याबद्दल वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. तसेच "कॅल्क्‍युलेटर'शिवाय मोठमोठ्या रकमांच्या बेरजा कशा करायच्या, याबाबतचे ज्ञान मला दिले. त्यामुळे त्यांच्याकडील सर्व कामे सहजरीत्या मी करत होतो.

अभ्यंकर सरांनी माझ्या कामाबद्दल वाहवा केली. ते वाडेकर चाळीतील माझ्या छोट्या घरी मोठ्या मुलीच्या बारशाला आले होते. एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला, याचे मला अप्रूप वाटले.

भास्कराचार्य प्रतिष्ठानमधील कामाच्या अनुभवांमुळेच मला पुढे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये नोकरी मिळाली. अभ्यंकरसरांची शिकवणी मला पुढेही उपयोगी पडली. त्यांच्यामुळेच माझे आयुष्य घडले.

Web Title: manohar joshi write article in muktapeeth