मोठ्यांसाठी मस्त!

मनोहर जोशी
मंगळवार, 5 मार्च 2019

ज्येष्ठ नागरिकांनी आपला उत्साह टिकवून ठेवला पाहिजे. आनंदात राहाल तर आनंदी राहाल. आपले आरोग्य आपणच जपायला हवे.

ज्येष्ठ नागरिकांनी आपला उत्साह टिकवून ठेवला पाहिजे. आनंदात राहाल तर आनंदी राहाल. आपले आरोग्य आपणच जपायला हवे.

ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी सकाळी लवकर उठावे. सकाळी चहा न पिता, दूध पिऊन "मॉर्निंग वॉक'साठी बाहेर जावे. किमान अर्धा ते पाऊण तास फिरून यावे. चालण्यासारखा दुसरा कोणताही स्वस्त व्यायाम नाही. घरी आल्यावर आपल्या शरीरास झेपेल एवढा नियमित व्यायाम करावा. त्यात योगासनांबरोबरच दमसासाचे, छोटी वजने उचलण्याचे व्यायामही असावेत. त्यानंतर वर्तमानपत्रे वाचावीत. मग शक्‍यतो कोमट पाण्याने अंघोळ करावी. पूजा-उपासना करावी. साबूदाणा हा वातुळ पदार्थ पचनसंस्था बिघडवितो. म्हणून शक्‍यतो साबूदाणा टाळावा. काही औषधे चालू असतील तर ती नियमितपणे घ्यावीत. घरची कामे करण्यासाठी घरच्यांना मदत करावी. वीजबिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, विम्याचा हप्ता भरणे, महापालिकेचा कर भरणे, बॅंकेत पैसे भरणे-काढणे ही सर्व कामे समक्ष कार्यालयात जाऊन अथवा ऑनलाइन करावीत. यामुळे घरच्यांची कामे थोडी हलकी होतात. कामे करण्यात आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचा वेळही छान जातो. उत्साहाने प्रत्येक गोष्टीत रस घेतला पाहिजे, म्हणजे जीवनातील आनंद कायम राहतो. मग निराशा व दुःख, वेदना जवळ फिरकत नाही.

दुपारच्या जेवणाची वेळ एकच ठेवावी. जेवणानंतर शतपावली करावी. थोडी वामकुक्षी घ्यावी. प्रत्येकाने आपला छंद जोपासावा. लेखन, वाचन, रेडिओ-टीव्हीवरील गाणी ऐकणे असे करावे. आवडत्या मालिका पाहाव्यात. दिवसभरात अधूनमधून बातम्याही पाहाव्यात. म्हणजे आपणास वर्तमान स्थितीत काय घटना घडत आहेत हे समजते. सायंकाळी साडेपाचनंतर थोडी उन्हे उतरल्यावर जोडीदाराबरोबर फिरावयास जावे. फिरून आल्यावर घरी परत आलेल्या सर्व कुटुंबीयांसोबत गप्पागोष्टी कराव्यात. रात्री हलके जेवण घ्यावे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने सहा महिन्यांतून एकदा तरी आपली पूर्ण तपासणी करून घ्यावी. रात्री लवकर झोपण्याची व सकाळी लवकर उठण्याची सवय प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने लावून घ्यावी. वेळच्या वेळी नियमित व्यायाम, नाष्टा, जेवण, औषधे घेतली तर आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची तब्येत जास्त ठणठणीत राहते व आपण दीर्घायुषी होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manohar joshi write article in muktapeeth