डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तीनदिवसीय धुळे दौरा

AAMBEDKAR
AAMBEDKAR

डॉ. बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी अण्णासाहेब पुंजाजी सावरे (लळिंगकर) यांच्या विनंतीवरून त्यांनी न्यायालयीन कामकाजासोबत अण्णांच्या गावाला (लळिंगला) भेट देण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला. 17 जून 1938 ला सकाळी आठ वाजून 20 मिनिटांनी त्यांचे धुळे रेल्वेस्थानकात आगमन झाले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत जळगावचे आमदार दौलत जाधव अस्पृश्‍योद्धारक बोर्डिंगचे सचिव डी. एम. मागाडे होते. धुळे रेल्वेस्थानकात स्काउट पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी त्यांचा मुक्काम लांडोर बंगला येथे होता. तेथून दुपारी ते धुळे न्यायालयात गेले आहेत. तेथे त्यांना बघण्यासाठी जनतेने मोठी गर्दी केली होती. 

न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर वकिलांच्या विनंतीवरून त्यांनी बार लायब्ररीला भेट दिली. त्यानंतर ते काकासाहेब बर्वे यांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी गेले. काकासाहेब विनायक बर्वे हे जरी कॉंग्रेसचे नेते होते, तरी त्यांचे अस्पृश्‍योद्धाराचे कार्य मोठ्या प्रमाणात असल्याने डॉ. बाबासाहेबांना त्यांच्याविषयी आपलेपणा होता. त्यांच्या कार्याची त्यांनी याप्रसंगी प्रशंसासुद्धा केली. सायंकाळी काकासाहेब बर्वे, आमदार दौलत गुणाजी जाधव, डी. एम. मागाडे, उपाध्ये, खरटमल, बोराडे आदी मंडळींसह डॉ. बाबासाहेब इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन केंद्रास भेट द्यावयास गेले. तेथे ऍड. भास्कर वामन भट यांनी डॉ. बाबासाहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

डॉ. बाबासाहेबांनी या केंद्राची बऱ्याच वेळ पाहणी करून, "इथली हस्तलिखिते आणि चित्रांचा संग्रह खरोखर आनंदी व थक्क करणारा आहे,' असा स्वहस्तलिखित शेरा नोंदविला. रात्री आठला म्युनिसिपल शाळा नंबर पाचच्या भव्य प्रांगणात आयोजित जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. या सभेला सुमारे सहा हजार लोक जमले होते. "प्राणयज्ञ दल' या संस्थेची मंडळी यावेळी आपल्या लाल पोशाखात हजर होती. डॉ. बाबासाहेब सभास्थळी येताच त्यांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दणाणून गेला. 

डॉ. बाबासाहेबांच्या आधी यशवंतराव चिंतामण गायकवाड, कृष्णाबाई अहिरे, गोजाबाई बगले, अहिल्याबाई देवराव, सावित्रीबाई सावंत, आनंदीबाई जाधव यांची भाषणे झाली. त्यानंतर 40 लोकांकरवी डॉ. बाबासाहेबांचा हारतुरे देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेबांचे भाषण सुरू झाले. या भाषणात सुरवातीलाच माझ्यावर प्रचंड कामाचा बोजा आहे, त्यात माझी तब्येत फारशी बरी राहत नाही, गेल्या दोन महिन्यांत माझे 38 पौंड वजन कमी झाले आहे, असे सांगितले. त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य व अन्य पक्षांना या पक्षाची वाटत असलेली भीती त्यांनी खुलासेवार सांगितली. तेव्हा आपल्या माणसांनी स्वतंत्र मजूर पक्ष बलवान केलाच पाहिजे. यात समाजाच्या हिताच्या दृष्टीने तुमचाच फायदा आहे. माझ्यापश्‍चात कोण माणसे किती जबाबदारीने काम करू शकतील? व माझी जबाबदारी कोण घेईल? मला आशा आहे, की काही जबाबदार तरुण निपजतील व ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतील. नाहीतर चढतीवर चढलेली गाडी डोंगराच्या माथ्यावर गेल्यानंतर बैलाअभावी घसरून पडेल, तशी आपली स्थिती होईल. 

सुमारे दीड तास डॉ. बाबासाहेबांनी आपले भाषण केले. शेवटी अण्णासाहेब पुनाजीराव लळिंगकर यांनी आभार मानले. सभा समाप्तीनंतरसुद्धा डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर डॉ. बाबासाहेब लांडोर बंगला येथे मुक्कामासाठी गेले. दुसऱ्या दिवशी 18 जून 1938 ला ते त्यांचे अत्यंत विश्‍वासू असलेले अण्णासाहेब पुंजाजी सावरे (लळिंगकर) यांच्या लळिंग या गावी गेले. अण्णासाहेब लळिंगकरांनी अत्यंत जिद्दीने आंबेडकरी चळवळ राबविली आहे. ते काही वर्षे डॉ. बाबासाहेबांचे खासगी अंगरक्षक म्हणूनही राहिलेले आहेत. त्यांना धुळ्यातील काही मंडळींनी खुनाच्या धमक्‍यासुद्धा दिलेल्या आहेत. पण, ते जराही डगमगले नव्हते. याच लळिंगकरांनी डॉ. बाबासाहेबांची लांडोर बंगल्यावर मुक्कामाची व्यवस्था केली होती. 

लांडोर बंगला हा लळिंग किल्ल्यावर आहे. या किल्ल्याच्या पायथ्यापासून डॉ. बाबासाहेबांची वाजतगाजत भव्य मिरवणूक लळिंग येथील सभास्थळापर्यंत काढण्यात आली. येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत पुंजाजीराव लळिंगकर, त्यांची भगिनी कृष्णाबाई यांनी अहिराणी गीते सादर केली, तर नरव्हाळ या गावचे शाहीर रतन जाधव यांनी पोवाडे सादर केले. या सभेत डॉ. बाबासाहेबांनी अंधश्रद्धेच्या विरोधी भाषण करून शिक्षणाचे महत्त्व विशद केले. अंधश्रद्धा प्रामुख्याने महिलांमध्ये असल्याने त्यांनी त्यांची कास सोडावी व त्यांनी शिक्षण घेऊन आपल्या मुलांनाही शिकवावे, असे आवाहन केले. 

सभा समाप्तीनंतर डॉ. बाबासाहेबांना अण्णासाहेब लळिंगकर आपल्या घरी जेवणासाठी घेऊन गेले. 18 जून 1938 ला डॉ. बाबासाहेब लळिंग येथे होते. याबाबतची माहिती डॉ. धनंजय किर यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रग्रंथात देण्यात आली आहे. लळिंगचा कार्यक्रम आटोपून डॉ. बाबासाहेब लांडोर बंगल्यात मुक्कामी राहिले. नंतर दुसऱ्या दिवशी ते तळोदा येथे गेले असावे. प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जी. बी. शहा यांनी लळिंगचे महत्त्व विशद करताना हे गाव प्राचीन खानदेशची राजधानी व पाचशे वर्षे परगणा होते, असे सांगून लळिंग गावातील या किल्ल्यापासून एक सप्टेंबर 1930 ला सुरू झालेले आदिवासींचे आंदोलन व किल्ल्यावर असलेल्या लांडोर बंगल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनदिवसीय मुक्काम या घटनांचे दाखले देतात. पुढे ते लिहितात, की डॉ. बाबासाहेब हे तळोदा भेटीवरही गेलेले आहेत. 

तळोदा भेटीचा वृत्तांत सांगण्यात येतो. तळोदा येथील जहागीरदार अमरजितराव शिवाजीराव बारगळ यांनी त्यांच्या आजोबांच्या आठवणी सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तळोदा येथे आले असता, माझ्या आजोबांनी (शंकरराव बारगळ) त्यांचे स्वागत केलेले आहे. बारगळ हे प्रतिष्ठित कुटुंब आहे. त्यांनी इथे 1662 मध्ये गढी बांधली आहे. याच गढीमधून या गावचे 1952 पर्यंत प्रशासकीय कामकाज सुरू होते. शंकरराव बारगळ यांचे एक ऑगस्ट 1953 ला निधन झाले. या आठवणींना उजाळा देताना ते सांगतात, की स्वागत समारंभानंतर डॉ. बाबासाहेबांनी तहसील कार्यालय व महात्मा गांधी छात्रालयाला भेट दिली. त्यानंतर ते धुळ्याकडे रवाना झाले. (जी. बी. शहा यांनी तळोदा भेटीची तारीख 31 जुलै 1937 दर्शविली आहे. मात्र, ती तारीख 19 जून 1938 असावी. कारण, 31 जुलैला धुळे येथील न्यायालयात न्यायलयीन कामासाठी डॉ. बाबासाहेब आलेले होते. दिवसभर ते धुळ्यातच होते.) 19 जून 1938 ला सायंकाळी सहाला डॉ. बाबासाहेब धुळे रेल्वेस्थानकात आले व 6.40 च्या धुळे- चाळीसगाव पॅसेंजरने ते चाळीसगावकडे रवाना झाले. याप्रमाणे 17 ते 19 जून 1938 असा तीन दिवसीय ऐतिहासिक दौरा डॉ. बाबासाहेबांनी पूर्ण केला. 

डॉ. बाबासाहेब हे लांडोर बंगल्यावर मुक्कामी राहिले म्हणून या बंगल्याचे महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केले. या परिसराचा विकासही करण्यात आला. लांडोर बंगल्यात डॉ. बाबासाहेब ज्या खोल्यांमध्ये राहिले, तिथं त्यांचा पुतळा बसविण्यात आला. दिवाण, गादी व इतर अन्य वस्तू संरक्षित करण्यात आल्या. या वर्षापासून त्या खोल्या इतरांना मुक्कामास देण्यासाठी बंद करण्यात आल्या. लांडोर बंगल्यातील वास्तव्याची केलेली तारीख त्यावेळी संबंधितांना माहीत नसल्याने ती 31 जुलै 1937 गृहित धरण्यात आली. दरवर्षी या तारखेला तिथे मोठी यात्रा भरविली जाऊ लागली. (डॉ. बाबासाहेबांचा इथला मुक्काम 17 व 18 जून 1938 असा राहिला आहे.) डॉ. बाबासाहेबांचा हा ऐतिहासकि दौरा पुंजाजी लळिंगकर यांच्या आग्रहास्तव न्यायालयीन कामाच्या तारखेसोबत आखण्यात आला होता. ऍड. विनायकराव बर्वे कॉंग्रेस पक्षाचे असतानाही त्यांच्या घरी जाऊन चहा घेतात, यावरून डॉ. बाबासाहेब आपल्या अनुयायांशी/मित्रांशी किती प्रेमाने व मैत्रिपूर्ण भावनेने वागत होते, एवढे महान व विद्वान असताना त्यांना त्यांचा थोडाही गर्व नव्हता, हे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com