मुलांना शाळेत पाठवायचंय, तर मग हे वाचा...

मुलांना शाळेत पाठवायचंय, तर मग हे वाचा...

"कोरोना' महामारीला आपण सर्वांनी धैर्याने तोंड देऊन सुरक्षितरीत्या आपल्या बालगोपाळांसाठी शाळा सुरू करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपण सज्ज आणि सजग राहून काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून, सर्वप्रथम पालकांनाच "कोरोना' प्रतिकाराबाबतचे प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे, तसेच आपण शाळेत सुरक्षित अंतर राखण्यासाठी योजना आखल्या आहेत. विद्यार्थ्याचे तापमान तपासण्याची सुविधा करण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त स्वच्छता, मास्कचा वापर आदी गोष्टींची पालकांना हमी देऊन त्यांचा विश्वास संपादन करता येईल. त्यानंतर बालकांना "कोरोना'शी कसा लढा द्यावयाचा, याबाबत प्रात्यक्षिकांसह तयार करणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ- शाळेचा जिना चढताना काय काळजी घ्यावी आदी. पालक आणि बालक "कोरोना'बाबत प्रशिक्षण झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करता येईल व शाळा सुकर आणि सुरक्षितरीत्या सुरू करता येईल. 

पालकांचा विश्वास 
"जान है तो जहान हैं' हे घोषवाक्‍य समोर ठेवून आपण सर्व हालचाली केल्या पाहिजेत. शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांशी सखोल, साधकबाधक चर्चा करणे व त्यांना विश्वासात घेणे आवश्‍यक आहे. म्हणजे पालकांमध्ये "कोरोना'बद्दल जागृती निर्माण होईल व त्यांना समजेल, की आपणा सर्वांना "कोरोना'सोबतच पुढे जावयाचे आहे, म्हणजेच शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालक अनुकूल प्रतिसाद देतील व शाळेला पूर्ण सहकार्य करतील. शाळेला सुरू करण्यासाठी सर्वांत प्रथम येणारी अडचण म्हणजे पालकांचा विरोध आपोआप कमी होईल. शाळा सुरू करण्यास हरकत नाही. सगळ्या बाबींचा समन्वय साधून, उत्तम नियोजन करून शैक्षणिक कार्य साधता येईल. याबाबत प्राचार्यांची भूमिका "अर्जुनाच्या सारथी'सारखा असेल. म्हणजे "कोरोना'रूपी "दुर्योधना'ला हरविता येईल. 

प्रत्यक्ष वर्गातील समस्या व त्यावरील उपाय 
सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांत मोठी अडचण म्हणजे वर्गातील विद्यार्थिसंख्या. डिस्टन्स/अंतर सुरक्षित ठेवून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करणे अवघड काम आहे. त्यासाठी पुढील बदल करून समस्येवर मात करता येईल. आपणास काम, काळ, वेग यांचे गणित व्यवस्थित मांडावे लागेल. उदाहरणार्थ- एका वर्गात साठ विद्यार्थी असतील, म्हणजे तीस बेंचेस असण्याची गरज आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविता येईल. मग उरलेल्या तीस विद्यार्थ्यांची कशी व्यवस्था करावी? त्यासाठी पुढील दोनपैकी एका पद्धतीचा विचार करता येऊ शकतो. 

पद्धत 1 : या पद्धतीत ज्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर विषम असतील, त्यांना विषम तारखेला शाळेत बोलवावे व सम नंबर असलेल्या विद्यार्थ्यांना सम तारखेला शाळेत बोलवावे. अशा पद्धतीने अल्टरनेट दिवशी विद्यार्थ्यांना शाळा असेल. त्या अनुसरून वेळापत्रकात बदल करावे लागतील. पण, विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे तास निम्मे होतील. त्यासाठी त्याची भरपाई पुढीलप्रमाणे करता येईल. सर्व सुट्या शनिवार- रविवारसह रद्द करणे, अभ्यासक्रम 20 ते 25 टक्के कमी करणे, तसेच ज्या विषयांचा अभ्यास पालकांना घरी बसून करता येईल (वर्क फ्रॉम होम) या विषयांच्या तासिका नियमित वर्गातून कमी करून कठीण व महत्त्वाच्या विषयांना देता येतील. उदाहरणार्थ- "पीटी'च्या तासिका शाळेत कमी करून पालकांनी पाल्यांचे "एक्‍झरसाइज' वगैरे शरीरस्वास्थ्याच्या बाबी घरी करणे. ड्रॉइंगच्या तासिका ऑनलाइन घेऊन विद्यार्थ्यांचा वर्गातील भार कमी करणे आदी विविध मार्गांनी तासिकांमध्ये काटकसर करून महत्त्वाच्या विषयांना अधिक तासिका उपलब्ध करून देता येतील. प्रात्यक्षिकांच्या तासिकासुद्धा कमी करून त्याऐवजी सर्व प्रयोग यू-ट्युबवरून किंवा शिक्षकांनी स्वतः केलेल्या "साइट'वरून विद्यार्थ्यांना "अपलोड' करता येतील. म्हणजे ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतींचा समन्वय साधून, कठीण विषयांना पुरेपूर न्याय देऊन विद्यार्थ्यांची वर्गातच तयारी करून घेता येईल. विद्यार्थ्यांमध्ये धैर्य व आत्मविश्वास निर्माण करता येईल. 

पद्धत 2 : रोज आठ तास भरणारी शाळा पाच तासच करावी, म्हणजे वेळापत्रकाचे दोन सारखे भाग करावेत. पहिले पाच तास विषम रोल नंबरसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी असावेत. एक तासाचा मध्यंतर ठेवून नंतरच्या पाच तासिका सम नंबर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी होतील. म्हणजे वेळेची बचत व तासिकांची काटकसर ही पद्धत 1 प्रमाणेच राबविता येईल. या पद्धतीत विद्यार्थ्यांना रोज शाळेत येता येईल. शाळेत येण्याचे सातत्य कायम राखता येईल. शिवाय, दप्तराचे ओझेसुद्धा निम्मे करता येईल. 

वरील दोन्ही पद्धतींमध्ये गणित, शास्त्र, इंग्रजी आदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा कार्यभार दुप्पट होईल. त्यासाठी अशा शिक्षकांना मदतीसाठी त्यांच्या इतर कामांत कपात करता येईल व ते काम तुलनेने कमी भार असणाऱ्या शिक्षकांकडे सुपूर्द करता येईल. उदाहरणार्थ- शाळेतील लेखी काम, सुपरव्हिजन, पेपर तपासणी, प्रयोग वह्या तपासणे, होमवर्क तपासणे आदी कामांची जबाबदारी इतर विषयांच्या शिक्षकांवर सोपविणे. या शिक्षकांनी जादा मेहनत घेऊन "कोरोना'शी लढा दिल्यामुळे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा विशेष गौरव करता येईल. थोडक्‍यात, पालक- शिक्षक- विद्यार्थी या घटकांचे समन्वय, सहकार्य व प्राचार्यांचे योग्य नियोजन, ऑफलाइन आणि ऑनलाइन या पद्धतींचा योग्य वापर याद्वारे आपणास अभ्यासक्रम उत्तम प्रकारे पूर्ण करता येईल व विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या दृष्टीने होणारे संभाव्य नुकसान निश्‍चितपणे टाळता येईल. 

वर्गाबाहेरील समस्या व त्यावरील उपाय 
1) विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था : पाचवी व पुढील सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांनी शक्‍यतोवर पायीच शाळेत यावे. वरील सुचविलेल्या पद्धतीमुळे दप्तराचे ओझे कमी झालेले असेल. शिवाय, सुरवातीचे काही दिवस पालकांनी विद्यार्थ्यांसोबत यावे, म्हणजे विद्यार्थ्यांना या गोष्टीची सवय होईल. पाचवीखालील वर्गातील विद्यार्थ्यांना पालकांनी स्वतः सायकल किंवा मोटारसायकल आदी प्रकारे शाळेत सोडावे. अपवादात्मक परिस्थितीत सुरक्षित रिक्षा वापरता येऊ शकेल. सार्वजनिक वाहने, बस, रिक्षा आदींचा वापर टाळावा. 

2) विद्यार्थ्यांच्या वर्गातील वावर/संचार : विद्यार्थ्याचे वर्गातील व वर्गाबाहेर वर्तन, फिजिकल डिस्टन्सिंगचे महत्त्व आदी बाबींवर सुरवातीच्या काळात लक्ष ठेवणे गरजेचे आहे, तसेच विद्यार्थ्यांचे एकमेकांमधील वर्गातील व वर्गाबाहेर वस्तूंची देवाणघेवाण तसेच बालसुलभ मन व सवयी यावर बालकांना योग्य वळण लावणे महत्त्वाचे व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य राहील. या कामांसाठी "वर्कलोड' कमी असणाऱ्या शिक्षकांवर जबाबदारी टाकावी, तसेच "नॉन टीचिंग' कर्मचारीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. 

3) स्वच्छता व सॅनिटायझेशन ः वर्ग सुरू होण्यापूर्वी व सुटल्यानंतर प्रत्येक वर्गातील बेंच, टेबल-खुर्ची, फळा आदी शैक्षणिक साधने तसेच प्रत्येक वर्गाचे प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार, स्वच्छतागृहे, जिना, पायऱ्या आदी स्वच्छ व व्यवस्थित करून घेण्यासाठी "नॉन टीचिंग' कर्मचाऱ्यांची समिती तयार करता येईल व देखरेखीसाठी "वर्कलोड' कमी असणाऱ्या शिक्षकांची त्यावर नेमणूक करता येईल. 

4) दक्षता समिती ः दक्षता समिती तयार करून शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे बारकाईने निरीक्षण करणे. एखाद्या विद्यार्थ्याच्या आरोग्याबाबत काही संशयास्पद आढळल्यास त्याला बाजूला करून नंतर त्याचे तापमान तपासून योग्य ती कार्यवाही करावी लागेल. सर्व विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असेल. 

5) वर्ग भरण्याच्या वेळा ः सर्व विद्यार्थ्यांची शाळेत येण्यासाठी व शाळा सुटण्याच्या वेळेस एकत्रित गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक वर्ग भरण्याची व सुटण्याची वेळ चढत्या क्रमाने पाच मिनिटांच्या अंतराने ठेवावी. 

6) विद्यार्थ्यांसाठीचे शालेय साहित्य ः प्रत्येक विद्यार्थ्यासोबत उत्तम प्रतीचे मास्क, सॅनिटायझर बॉटल, स्वच्छ सुती हात रुमाल, स्वतःची पाण्याची बॉटल आदी गरजेच्या वस्तू असल्याबद्दलची खात्री करणे आवश्‍यक राहील. 

7) होमवर्क ः प्रत्येक विषयाचे जास्तीत जास्त "होमवर्क' विद्यार्थ्यांना देऊन त्यांना उरलेले पाच तास घरी कशाप्रकारे "एंगेज' करता येईल, त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे राहील. 
 

मित्रांनो, "कोरोना' महामारी कायम राहणार नाही, म्हणजेच वरील व्यवस्थापन हे कायमसाठी आपल्याला राबवावे लागणार नाही. काही काळासाठी विद्यार्थ्यांसाठी थोडा जास्तीचा त्रास आनंदाने स्वीकारून "कोरोना'ला हरवण्यासाठीच्या राष्ट्रीय युद्धात सामील होऊया. आपल्याला निश्‍चितपणे आत्मिक समाधान मिळेल. आपण सर्वमिळून "कोरोना'ची भीती न बाळगता, योग्य ती दक्षता घेऊन धैर्याने शाळा सुरू करू शकतो. आपण सारे शिक्षकसुद्धा "कोरोना योद्धा'च...! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com