करिअरच्या माळेतील अंतरंगातील मोती!

cariar
cariar

ते लोक नशीबवान असतात, जे आपल्या व्यवसाय आपल्या आवडीच्या आधारावर निवडतात. केवळ दबावापोटी किंवा महत्त्वाकांक्षेपोटी घडविलेल्या करिअरमधून काम सार्थ केलेल्या तृप्तीचा आनंद मिळू शकेल का? ज्या कामात खरोखर आवड आहे, त्या कामाच्या श्रमाचे कधीही ओझे वाटत नाही आणि न आवडणाऱ्या कामाचे सतत ओझे बाळगून व्यवसाय करणाऱ्यांना यशाची गोडी कधीच चाखता येत नाही. म्हणूनच पालकांनो, आपल्या अपेक्षांचे आणि स्वप्नांचे दडपण मुलांवर आणू नका. त्यांची स्वप्ने त्यांच्या जीवनात फुलू द्या, त्यांना स्वाभाविकपणे आकार घेऊ द्या. 

केवळ परीक्षेतील गुणांच्या चढाओढीतून दिसते, तीच बुद्धिमत्ता हा गैरसमज आता दूर करायलाच हवा. आजच्या युगात बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोडीला त्या विषयात रुची असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मानसशास्त्रीय संज्ञोधनाने विविधांगी बुद्धिमत्ता ही संकल्पना आता आकार घेऊ लागली आहे. केवळ डॉक्‍टर, अभियंता तयार करणारी महाविद्यालये ही कल्पना लयास जाऊन विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास आणि त्यांची कौशल्ये विकसित करणे, हे आता मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. 

तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रांत लक्षणीय बदल होत आहेत. हे बदल जोपर्यंत अंगीकारले जात नाहीत, तोपर्यंत प्रगती कशी होणार? प्रत्येक क्षेत्रात कामाच्या आणि तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे, संशोधनांमुळे व्यवसायांचे स्वरूपही बदलत चालले आहे आणि अशावेळी उमेदवाराचे संभाषण कौशल्य, आपले मत ठामपणे समोरच्याला पटवून देणे, अशा गुणांना व कौशल्यांना अधिक महत्त्व दिले जाते. वाढत्या बाजारपेठांच्या आणि स्पर्धेच्या युगात "मार्केटिंग'चे कौशल्य असणे आवश्‍यक आहे. 

पूर्वी नोकरी देताना अनुभवाला प्राधान्य दिले जायचे. पण, आता कौशल्यांना प्राधान्य दिलेले दिसून येते. नवीन युगात कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात प्रचंड बदल झालेले दिसून येत आहेत. या बदलांनी आणि आधुनिक जगातील नव्या गरजांनी विविध व्यवसायांना जन्म दिला आहे. आपल्या कौशल्याशी निगडित व्यवसाय निवडणारा यशस्वी कसा होणार नाही? 

केवळ सामाजिक प्रतिष्ठेपायी आपल्या मुलांना त्यांचे आवडते करिअर निवडू न देणे, हे कितपत योग्य ठरते? पुढे या करिअरचे ओझे मन मारून मुलांना आयुष्यभर पेलावे लागते. प्रत्येक व्यक्‍तीमध्ये निसर्गाने बहाल केलेल्या काही विशेष क्षमता असतात. या क्षमतांचा आधार घेऊन जेव्हा करिअर निवडले जाते, ते कार्य आनंददायी ठरते. 

मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे धेय केवळ महिन्याचे वेतन किती आहे, त्यावर अवलंबून नसून, ते ध्येय त्यांच्या क्षमता म्हणजेच व्यावसायिक क्षेत्रात त्यांची रुची कितपत आहे, यावर अवलंबून आहे. 

रुची, क्षमता, कौशल्य या सर्वांबरोबरच आपले व्यक्‍तिमत्त्व कसे आहे, हा विचारही करिअर निवडीच्या प्रक्रियेत महत्त्वाचा आहे. व्यक्‍तिमत्त्व म्हणजे तुमचे अंगभूत गुण. माणसे जोडण्याचा तुमचा स्वभाव, तुमचा दृष्टिकोन, नम्र स्वभाव, ग्राहकाला आपले म्हणणे पटवून देण्याची हातोटी, या सर्व गुणांनाही तुमच्या करिअर घडविण्याच्या प्रक्रियेत तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे. या अंतरंगातल्या मोत्यांनी जीवन समृद्ध होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परिश्रमाच्या वेलीवरच यशाची फुले उमलतात. कठोर परिश्रमांना दुसरा कोणताही पर्याय नाही. अभिरुची घेऊन, आवड जोपासून, क्षमता ओळखून कौशल्याने पारखून, मनापासून रस घेऊन कार्याला परिश्रमाची जोड दिल्यास तुम्हाला यशाच्या मागे धावावे लागणार नाही, तर यश तुमच्यापाठी येईल, हे नक्‍की. 

(लेखक पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com