"कोरोना'पासून हे शिका...

योगिता कोतकर-पाखले, चाळीसगाव
Saturday, 27 June 2020

"कोरोना' नामक विषाणू संपूर्ण मानवजातीवर राज्य करीत आहे. त्याने आम्हाला बरेच काही शिकविले आहे. आम्ही या काळात या सर्व गोष्टी आचरणात आणल्या, तरी पुरसे आहे. सकारात्मकरीत्या याकडे पाहणे गरजेचे आहे. केवळ आजाराचा बाऊ करून चालणार नाही. आमच्या अनेक वाईट सवयींवर या आजाराने "लॉकडाउन'च्या काळात आम्हाला मात करायला शिकविले. अर्थात, आम्ही हा धडा घेतला तर आगामी काळात हा आजार आमच्या आसपासही येणार नाही, यात शंका नाही.... 

अशा परिस्थितीत मानवाला आपल्या ज्या बुद्धीवर गर्व आहे, तीदेखील यापुढे निष्प्रभ झाली आहे. आज मुक्तपणे तो चार भिंतींच्या पलीकडे श्वास घेऊ शकत नाही. मानवाच्या स्वप्नांचे नव्हे; हे तर अहंकाराचे पंख छाटले गेले. पण, खरंच "कोरोना'ने आम्हाला काय दिले? जसे नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन परिणाम असतातच. सकारात्मक गोष्टींचा विचार केला, तर आम्ही कुटुंबासाठी वेळ द्यायला शिकलो. कामानिमित्त बाहेर राहणारे आम्ही एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नव्हतो. आता एकमेकांच्या जवळ आलो. घरातील मुलांसोबत लहान होऊन खेळू लागलो. घरातील लोकांच्या आवडीनिवडी समजायला लागल्या. 

प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कुठली ना कुठली कला असतेच. या "लॉकडाउन'च्या काळात आपल्यातील कलेला वाव मिळाला. कला जोपासू लागलो. कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती केली. कुणी चित्रकार, कवी, लेखक, गायक होऊ लागले. घरातील महिला व पुरुष दोघेही बाहेर मिळणारे नवनवीन पदार्थ शिकून बनवू लागले. त्यामुळे त्यांच्यातील पाककला बहरू लागली. 

शहरी जीवनाची आवड, क्रेझ आमची क्षणार्धात कमी झाली. "आपला गाव बरा गड्या' असे म्हणू लागलो. गांधीजींनी "खेड्यांकडे चला' हा संदेश एकेकाळी दिला होता, तो गरजेचा वाटू लागला व अनेकांनी तो अमलात आणला. बाहेर पडायचे नसल्याने घरचे सात्त्विक अन्नच खाऊ लागलो. हॉटेलिंग बंद झाले. त्यामुळे साहजिकच जिभेचे चोचले पुरविणाऱ्या खर्चावर नियंत्रण आले. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने होणारे आजार बंद झाले. त्यामुळे डॉक्‍टरांकडे दवाखान्यात होणारा खर्चही वाचला. घरातील उपलब्ध साधनसामग्रीवरही जगता येते, याची जाणीव झाली. अनावश्‍यक खरेदीवर आळा बसला. 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बरेच जण स्वावलंबन शिकले. घरात पाण्याचा ग्लासदेखील न उचलणारे स्वयंपाकघरात मदत करू लागले. घरात कामवाली बाई नसल्याने सर्व कामे स्वतः करू लागलो. मुलांना घरातील लोकांचे प्रेम व सहवास मिळू लागला. पाळणाघरातून सुटी मिळाली. नात्याचे अर्थ समजू लागले. एकमेकांची काळजी घेऊ लागलो आणि कदर करू लागलो. 

दूरचित्रवाणीवर सगळीकडेच पौराणिक, आध्यत्मिक, ऐतिहासिक मालिका सुरू झाल्या. त्यामुळे आपली भारतीय संस्कृती काय आहे? हे लहान मुलांना माहिती होऊ लागली, तसेच या इंटरनेटच्या युगातसुद्धा कालबाह्य होत चाललेले बैठेखेळ एक पिढी दुसऱ्या पिढीला शिकवू लागली; त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान सर्वच पिढ्यांतील लोक आत्मसात करू लागले; जसे, की "केजी'पासून महाविद्यालयीन विद्यार्थी "इ-लर्निंग'च्या माध्यमातून शिकू लागले. चांगल्या विचारांची देवाणघेवाणही व्याख्यान, मुलाखत, संवाद हे अनेक "ऍप'द्वारे एकमेकांपर्यंत पोचू लागले. 

आपल्या सर्वप्रकारच्या कलादेखील आपण यामार्फत लोकांपर्यंत कशा पोहोचविता येतील, हे शिकलो. एक मार्ग जर बंद झाला, तर दुसरा मार्ग आपोआप तयार होतो, हे यातून शिकायला मिळाले. पैशांचा माज दाखविणारे मोठमोठे कार्यक्रम, विवाह सोहळे आम्ही थोडक्‍यात करू लागलो. निसर्गात प्रकर्षाने बदल झाले. सरकार अनेक प्रयत्न करूनदेखील इतकी वर्षे गंगा नदी शुद्ध करू शकले नाही, ती दोन महिन्यांत शुद्ध झाली. वायू, ध्वनी, जल आणि इतर सर्वच प्रकारची प्रदूषणे फार कमी झाली. त्याचा परिणाम अनेक पशू, पक्षी, प्राण्यांच्या प्रजातींमध्ये मोठी वाढ झाली. अन्नसाखळी न तुटता निसर्गसंतुलन झाले. वेगवेगळ्या पक्ष्यांचे दुर्मिळ झालेले आवाज ऐकू येऊ लागले. 

पैशांमागे धावणारे आम्ही, कुठेतरी माणसाला थांबावे लागते, हे समजले. पैसा हे सर्वस्व नाही, हे पुन्हा एकदा "कोरोना' नामक परिस्थितीने दाखवून दिले. मी, माझे करता- करता दुसऱ्यांबद्दलही थोडा विचार करायला शिकलो. उदाहरण घ्यायचे, तर घरातील कामवाली. तिचा उदरनिर्वाह कसा चालेल, या विचाराने आम्ही तिला पगार देऊ लागलो. अनेक जण आपल्याला जमेल तशी मदत गरजूंना करू लागलो. 

अनेक काळाच्या पडद्याआड गेलेल्या भारतीय संस्कारांची आम्हाला आज नव्याने गरज भासू लागली. हे संस्कार वैज्ञानिक पायावर आधारित आहेत, कळून चुकले, हे मात्र नक्की. मुळात एखादे संकट, प्रतिकूल परिस्थिती येते, ती आपल्याला शिकवण्यासाठीच. म्हणून आपण त्यातून बोध घ्यायला हवा. नाण्याच्या दोन बाजू असतात, तसेच कोणत्याही गोष्टींचे फायदे अन्‌ तोटे असतातच. आपण त्यातून शिकून आता ही महामारी कायमची हद्दपार कशी होईल, यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. 

आजचे युद्ध हे श्रीकृष्णाच्या गोष्टीतील राक्षसासारखे आहे. "कोरोना'रूपी राक्षस हा जेवढे जास्त लोक एकत्र येतील, तेवढा तो मोठा- मोठा होत जातो आणि जर आपण श्रीकृष्णाप्रमाणे त्याच्यासमोर न जाता, गर्दी न करता घरात राहिलो, तर त्याचे सगळे वार निकामी होतील. मग हा राक्षस हळूहळू छोटा होईल आणि आटोक्‍यात येईल. आयुष्यात एक आठवण नक्की असेल, की "एक विषाणू आला अन्‌ आयुष्य बदलून गेला...' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi article jalgaon Learn this from "Corona" ...